‼️ BMW ची कहाणी ‼️

 

‼️  BMW ची कहाणी ‼️ 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 20/9/2026

त्याला डोळ्यांनी दिसत नव्हतं, पण डोळ्या समोर कंपनीचं भविष्य दिसत होतं. कंपनी बुडतेय, कारखाने अर्धे रिकामे आहेत, तिजोरीत पैसे नाहीत आणि बँकरांचा सल्ला स्पष्ट आहे, कंपनी विकून टाका. अशा वेळी कुणी वेगळं काय करणार? पण १९५९ मध्ये एका माणसाने नेमकं उलट केलं. त्याने संकटात सापडलेली कंपनी विकत घेतली. कंपनी होती जर्मनीची BMW.

आज BMW म्हटलं की आलिशान गाड्या, निळा पांढरा लोगो आणि किंमत ऐकून आपल्या बँक खात्याला आलेली भोवळ आठवते. पण १९५९ मध्ये परिस्थिती अगदी वेगळी होती. कंपनी आर्थिक संकटात होती, कारखाने पूर्ण क्षमतेने चालत नव्हते आणि बँकर्सच्या मते पुढे पैसा ओतण्यात काही अर्थ नव्हता. त्यामुळे BMW विकण्याचा निर्णय झाला. आणि संभाव्य खरेदीदार? Mercedes-Benz. म्हणजे BMW आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्याच्या हातात जाणार होती.

९ डिसेंबर १९५९ रोजी भागधारकांची बैठक झाली. व्यवस्थापन आणि बँकर्सना निर्णय जवळ जवळ निश्चित वाटत होता. पण बाहेर कामगार आणि छोटे भागधारक मोठ्या संख्येने जमले होते. त्यांचा संताप होता, आपली कंपनी प्रतिस्पर्ध्याला का द्यायची? बैठकीत मतदान सुरू झालं. एकेक संचालक आपलं मत देत होता. आणि मग नाव पुकारलं गेलं, हर्बर्ट क्वांट. काही क्षण ते शांत राहिले. समोर बॅलन्स शीट होती. बँकर्सचा सल्ला होता. कंपनीची बिकट अवस्था होती. तरीही त्यांचं उत्तर आलं, नाही. तो केवळ विक्रीला दिलेला नकार नव्हता. तो त्या वेळच्या सर्वसाधारण निष्कर्षालाच दिलेला नकार होता. आणि मग क्वांट यांनी स्वतःचे पैसे BMW मध्ये गुंतवले. इतरांना ती बुडणारी होडी वाटत होती; त्यांनी मात्र तिच्यात स्वतःची संपत्ती घेऊन प्रवेश केला. आजच्या काळात एखाद्या शेअरचा भाव दोन टक्के खाली आला तरी आपण चार्ट पुन्हा पुन्हा पाहतो. क्वांट यांनी मात्र संकटात सापडलेल्या संपूर्ण कंपनीवर मोठी पैज लावली. का? कारण त्यांना तिच्यात संधी दिसत होती. आणि इथे या कथेचा सर्वांत विलक्षण भाग आहे.

हर्बर्ट क्वांट यांची दृष्टी बालपणीच म्हणजे नऊ वर्षांचे असताना गेली होती. ते जवळ जवळ अंध झाले होते. ज्याला जग स्पष्ट दिसत नव्हतं, त्यालाच त्या दिवशी BMW चं भविष्य स्पष्ट दिसत होतं. बाकीच्यांना दिसत होते; तोटे, रिकामे कारखाने आणि धोका. क्वांट यांना दिसत होती, क्षमता.

पुढे BMW सावरली. तिचं पुनरागमन झालं आणि ती जगातील प्रतिष्ठित मोटार कंपन्या पैकी एक बनली. क्वांट कुटुंबासाठीही ही गुंतवणूक अफाट यशस्वी ठरली. पण या कथेचा खरा अर्थ BMW च्या यशा पेक्षा मोठा आहे. 

दृष्टी म्हणजे फक्त डोळ्यांनी दिसणं नव्हे. संकटाच्या वेळी बहुतेकांना वर्तमान दिसतं; दूरदृष्टी असणाऱ्यांना त्यातून उभं राहणारं भविष्य दिसतं. म्हणून पुढच्या वेळी सगळे जण एखाद्या गोष्टी बद्दल म्हणत असतील, हे संपलंय;  तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा, खरंच संपलंय, की मला फक्त आजचं दिसतंय? कारण कधी कधी, डोळे असणारे लोक परिस्थिती पाहतात; दूरदृष्टी असलेले लोक शक्यता पाहतात. हर्बर्ट क्वांट यांना जग कमी दिसत होतं. पण BMW चं भविष्य, ते त्यांना स्पष्ट दिसत होतं.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

©️ बोभाटा

═━═━═━═━═━═━═━═━═━═━═

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या