वसुंधरा राजेंचा बालेकिल्ला ढासळला! राजस्थान निवडणुकीत भाजपला मोठा धक्का, काँग्रेसची जोरदार मुसंडी!
वृत्त एकसत्ता न्यूज
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
जयपूर : राजस्थानमध्ये पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सत्ताधारी भाजप आणि विरोधातील काँग्रेसमध्ये चुरशीची लढत सुरू असल्याचे दिसत आहे. या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मोठा उलटफेर झाला असल्याचे दिसून येत आहे.
भाजपला या निवडणुकीत मोठा धक्का बसला असून बालेकिल्ल्यात काँग्रेसने मुसंडी मारली आहे, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या झालावाड नगर परिषदेत भाजपचा दारूण पराभव झाला आहे. काँग्रेसने भाजपचा हा मजबूत गड उद्ध्वस्त करत स्पष्ट बहुमत मिळवले आहे.
झालावाड जिल्ह्यातील एकूण आठ स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी चार ठिकाणी काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. झालावाड नगर परिषदेव्यतिरिक्त भवानी मंडी, खानपूर आणि डग येथे काँग्रेसने विजय मिळवला आहे. दुसरीकडे, भाजपला केवळ झालरापाटन, अकलेरा आणि मनोहरथाना या तीनच ठिकाणी सत्ता टिकवता आली आहे. तर पिडावा नगरपालिकेत स्पष्ट बहुमत न मिळाल्याने 'आम आदमी पार्टी' (AAP) किंगमेकरच्या भूमिकेत आली आहे.
*झालावाड नगर परिषदेत काँग्रेसची मुसंडी*
झालावाड नगर परिषदेच्या एकूण ४५ वॉर्डपैकी काँग्रेसने २९ जागांवर दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. येथे भाजपला अवघ्या १३ जागा जिंकण्यास यश मिळाले आहे. त्याशिवाय एक जागा आम आदमी पार्टीने तर दोन जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या आहेत. यापूर्वी येथे भाजपची सत्ता होती. आता काँग्रेसने ही सत्ता खेचून आणली आहे. झालावाड-बारां हा लोकसभा मतदारसंघ वसुंधरा राजे यांच्या घराण्याचा मानला जातो. राजे यांच्या पाठोपाठ त्यांचे सुपुत्र दुष्यंत सिंह हे येथून सलग पाच वेळा खासदार राहिले आहेत.
*भाजपच्या खात्यात फक्त तीन पालिका*
वसुंधरा राजे झालावाड जिल्ह्यातील झालरापाटन विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. झालरापाटन नगरपालिकेत भाजपला २५ पैकी २२ जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेसला ८ आणि 'आप'ला ५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. याशिवाय अकलेरा नगरपालिकेत भाजपने २५ जागा जिंकल्या असून काँग्रेसला ८ तर अपक्षांना २ जागा मिळाल्या आहेत. मनोहरथाना पालिकेत भाजपने २० पैकी ११ जागांवर कब्जा केला, तर काँग्रेसला ६ आणि अपक्षांना ३ जागा मिळाल्या.
*भवानी मंडी, डग आणि खानपूरमध्ये काँग्रेसचा झेंडा*
भवानी मंडी नगरपालिकेत काँग्रेसने २६, भाजपने १३ आणि अपक्षाने १ जागा जिंकली आहे. खानपूर नगरपालिकेत काँग्रेसला १८ तर भाजपला अवघ्या ७ जागा मिळाल्या. डग नगरपालिकेत काँग्रेसने १४ जागांवर विजय मिळवला असून भाजपला ६ जागांवर रोखले. पिडावा नगरपालिकेत काँग्रेसला ८, भाजपला ६, 'आप'ला ५ आणि अपक्षाला १ जागा मिळाली आहे. कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने येथे ५ जागा जिंकणारी आम आदमी पार्टी किंग मेकर झाली आहे.

0 टिप्पण्या