सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘हरित ऊर्जा, विद्युत सुरक्षा व ऊर्जा संवर्धन’ विषयावर व्याख्यान संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 17/9/2026
शंकरनगर-अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च येथे महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या वतीने दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी 'हरित ऊर्जा, विद्युत सुरक्षा व ऊर्जा संवर्धन या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिव्हिल सेमिनार हॉल येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी एम. एस. ई. डी. सी. एल. अकलूजचे उपकार्यकारी अभियंता स्वानंद शंकरराव शिंदे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना हरित ऊर्जेचे महत्त्व, विद्युत सुरक्षेची आवश्यकता, ऊर्जा संवर्धनाच्या विविध उपाययोजना तसेच वीज क्षेत्रातील बदलते तंत्रज्ञान याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच आजच्या काळात सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यांसारख्या अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वाढता वापर, ऊर्जा बचतीची गरज आणि विद्युत उपकरणे हाताळताना घ्यावयाची काळजी याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी वीज वितरण क्षेत्रामध्ये उपलब्ध असलेल्या विविध संधी आणि व्यावसायिक कौशल्यांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.‘ऊर्जा वाचवा, पर्यावरणाचे संरक्षण करा आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्या’ हा संदेश या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. विद्यार्थ्यांनी व्याख्यानादरम्यान विविध प्रश्न विचारून तज्ज्ञ मार्गदर्शकांसी संवाद साधला.
उपकार्यकारी अभियंता स्वानंद शंकरराव शिंदे यांच्यासह सहायक अभियंता संकेत लोखंडे, सुहास शिंदे, नागेश साळुंखे, कुणाल पाटील व महेश एकतपुरे यांनी कार्यक्रमास विशेष सहकार्य केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. प्रथमेश कुलकर्णी व प्रा. प्रमोद टेकळे यांनी काम पाहिले.


0 टिप्पण्या