गौरी, महालक्ष्मी
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 18/9/2026
काल गौरी, महालक्ष्मी ह्यांच आगमन झालं . घराघरात गणपतीमुळे निर्माण झालेले चैतन्य, उत्साह गौरींच्या आगमनाने अजूनच द्विगुणित झाला. मस्त सोहळा साजरा होतो घरोघरी.
बहुतेक कोकणस्थ मंडळींकडे खड्यांच्या गौरी असतात आणि देशस्थ मंडळींकडे उभ्या महालक्ष्म्या. विदर्भातील कोकणस्थ हे विदर्भात राहिल्याने सवयी, राहणीमान, बोलीभाषा आणि आवडीनिवडी, ह्यामध्ये ब-यापैकी देशस्थ मंडळींसारखं वागतात तर बरीचशी कोकण, पुणे,भागात रहाणारी देशस्थ मंडळी ही वरील बाबतीत कोकणस्थ मंडळींसारखं वागतात.
यवतमाळ ला कोकणस्थ मंडळी अगदी मोजकी तर देशस्थ मंडळींचं प्रमाण भरपूर. त्यामुळे आमच्याकडे गौरींचे आगमन होत असे तर गावातील जास्तीत जास्त लोकांकडे उभ्या महालक्ष्म्या असतं. अगदी लहानपणी हा महालक्ष्मी चा सण घरच्या गौरींपेक्षाही जास्त आवडायचा.कारण होतं ह्या वाजतगाजत येणाऱ्या माहेरवाशिणी जेष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी त्यावेळी केली जाणारी सजावट त्यांची वेषभुषा, त्यांच्या शालुशेल्यासारख्या साड्या, ते भरगच्च दागिने, चेहऱ्यावरील सात्विक सौंदर्याचं ते तेज, ते समोर ऐटीत उभे असलेले झोले ( बाळं ), सणाच्या निमित्ताने एकत्र येणारी पाहुणेमंडळी, ते भरमसाठ नैवेद्यासाठी करावयाचे चविष्ट विविध पदार्थ, प्रसादासाठी घरी घडणाऱ्या जेवणावळी , पंगती, आग्रहाआग्रहाने वाढली जाणारी आंबील, कथली,त्या सोळा प्रकारच्या निरनिराळ्या भाज्यांनी बनलेली ती मिश्रभाजी, भजी, वडे ह्यांच ते तळण, ते खमंग पुरण घालून केलेल्या पुरणपोळ्या, फुलोऱ्यासाठी केलेल्या करंज्या, लाडू, पाती, वडाभातावर चरचरीत फोडणी आणि त्यावर मस्त खडाहिंगाचं पाणी, जेवल्यानंतर हात धुण्यासाठी केलेली पवित्र गंगाविहीर, पूजेनंतर तो गळ्यात घालायचा पिवळा तातू ह्या सगळ्यामुळे हा महालक्ष्मी चा सण गौरींपेक्षा खूप दणदणीत वाटायचा.
त्यामानाने आमच्या घरच्या गौरी अगदी साध्या, जेवणासाठी सुद्धा सवाष्ण, ब्राह्मण असली की भागायचं, नैवेद्य सुद्धा त्यामानाने सहज सोपा. असा सुटसुटीत सण घरी साजरा होत असतांना तो भव्य महालक्ष्मींचा सण आठवायचा आणि मग मनं जरा खट्टू व्हायचं
तसही कोकणस्थांच्या कडील साधे, सरळ, सुटसुटीत सणवार हा एक चेष्टेचा विषय असतो लहानपणीच हा विषय मनात घोळत असतांना माझ्या आजोबांनी माझ्या मनातील विभ्रम जाणला. मग एक दिवस आजोबांनी जवळ बसविलं. आजोबांचं आणि माझं मेतकूटच. त्यामुळे त्यांनी मला एकदा खूप छान समजावून सांगितले. त्यांनी सांगितले,"कुठलिही व्यक्ती, कुठलिही घटना, कुठल्याही रुढी परंपरा घडतात तेव्हा त्या मागे खूप मोठं काहीतरी कारणं असतं. आलेली परिस्थिती तसेच माणसाची मानसिकता ही अनुभवांच्या शिदोरी वर घडतं असते. आम्हां कोकणस्थांच्या गौरींची मूळ स्थान म्हणजे कोकण. पुढे काही कारणांमुळे कोकणवासी हे विदर्भात स्थलांतरित झाले. त्यामुळे आमच्या गौरी सुद्धा आमच्या पुर्वजांबरोबर कोकणातून विदर्भात आल्यात. कोकणात असतांना समुद्रीमार्गाने येणारे चाचे लोक आमच्या पूर्वजांना त्रास देणे, सणांची व देवदेवतांची विटंबना करणे, नुकसान करणे ह्या पद्धतीचा उपद्रव देत असंत त्यामुळे आमचे पूर्वज खूप लपूनछपून, त्यांच्या दृष्टीस आमचे देव पडणार नाहीत ह्याकडे कटाक्षाने लक्ष देऊन, अतिशय साधेपणाने, कुठलाही थाटमाट त्या चाचेलोकांच्या दृष्टीस पडणार नाही ह्याची खबरदारी घेऊन साजरा करीत. तेव्हा कोकणी माणूस निसर्गाच्या लहरीपणामुळे देखील खूप कठीण परिस्थितीतून जात असे . त्यामुळे अशा वेळी जो कायम त्याच्या घरात उपलब्ध असेल असा ओला नारळं आणि तांदूळ ह्यांच्यापासून बनलेले "घावनघाटलं" हा नैवेद्य म्हणून करायचे. ह्या सगळ्या विपरीत परिस्थितींना तोंड देत कोकणी माणूस हे सणवार यथायोग्य साजरे करण्याचा प्रयत्न करायचा. खरचं तेव्हा उमगलं परिस्थिती सगळं शिकविते, घडविते माणसाला. त्या मानाने विदर्भ हा सुरक्षित, सधन प्रांत त्यामुळे इकडील सणवार कुठलही संकट न येता, सुरळीत पार पडायचे. कोणत्याही व्यक्ती ह्या प्राप्त परिस्थिती नुसार घडतात. त्यांचे अनुभव त्यांचा स्वभाव घडवायला कारणीभूत ठरतात. कोकणात कायम
नैसर्गिक आपत्ती यायच्या. कमाई पण अगदीच बेतास बात. पण माणसं मोठी टुकीनं राहणारी, परिस्थितीचे चटके सहन करावे लागल्याने जरा फटकळ, कडवट झालेली. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानणारी, ऋण म्हणजेच कर्ज निषिद्ध मानणारी ही मंडळी आपसूकच सणवार व समारंभ आटोपशीर, थोडक्यात हात आखडता घेऊन पण रितीरिवाज मात्र अगदी साग्रसंगीत पाळणारी. कोकणात अन्नधान्याची टंचाई म्हणून कोकणी माणूस कधीच त्या अन्नाचे महत्त्व, किंमत जाणून शक्यतोवर कुणाकडूनही पानात अन्न वाया जाणार नाही ह्याची खबरदारी घेणारे असतात. ह्या उलट व-हाडातील वैदर्भीय मंडळी जरा ऐसपैस, आर्थिक परिस्थिती ने समृद्ध, जमीनजुमला शेतीवाडी जमवलेली त्यामुळे सणवार करतांना अघळपघळ करणार, भरपूर सगळी संपन्नता बघितलेली असल्या कारणाने लोकांना जोडून ठेवणारी, आग्रह करुन करून लोकांना खाऊ घालणारी असतात. त्यामुळे सगळ्यांची वागणी,त्यांच्या सवयी ही त्यांची जशी जडणघडण होते तश्या आपोआप बनतात. आपापल्या परिने सगळ्यांची वागणी स्वानुभवातून बरोबरच असतात.
आमच्या कोकणस्थांच्या गौरी म्हणजे खड्याच्या गौरी, सात खडे म्हणजे ह्याचे प्रतीक. खरच आपल्या पुढील पिढीने ह्याचे उत्तरदायित्व अशा चांगल्या प्रकारे सांभाळणे म्हणजे एक आगळेवेगळे सुखच.
शेवटी काय तर सगळ्यात जास्त महत्त्वाचे मनातील भाव,भक्ती. ती कोकणातील मंडळींची गौरी़ंप्रती असो वा वैदर्भीय मंडळींची महालक्ष्मींप्रती असो, दोन्हीही सारख्याच. तेव्हा पासून जो उल्हास, जे भक्तीभाव ,महालक्ष्मीं प्रती प्रकट होतात तोच विश्वास, तेच भक्तीभाव हे गौरींप्रती पण आपोआप प्रकट व्हायला लागलेत ते आजतागायत जसेच्या तसे कायम आहेत आणि यापुढेही.
कल्याणी बापट(केळकर)
9604947256
बडनेरा, अमरावती *━═━═━═━═━═━═━═━═━═━═*
0 टिप्पण्या