खरंच ते शिक्षक होते!

 खरंच ते शिक्षक होते!

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 06/9/2026 :

आज पुन्हा एकदा कॅलेंडरच्या पानावर ५ सप्टेंबर पाहिला आणि मनाच्या एका कोपऱ्यात शाळेची ती जुनी, ओळखीची घंटा वाजू लागली…..

त्या काळातले शिक्षक आठवले की एक अनामिक हुरहूर दाटून येते. तेव्हा हातात छडी असायची, त्या छडीची भीतीही प्रचंड वाटायची, वर्गात एखादी छोटीशी चूक झाली की सर लगेच रागावायचे. कधी कधी भरदुपारी वर्गाच्या बाहेर उन्हात उभं केलं जायचं, तर कधी कानाला हात लावून बाकावर उठाबशा काढाव्या लागायच्या. आजच्या आधुनिक काळात हे सगळं कदाचित खूप कठोर किंवा टोकाचं वाटेल.

पण, खरं सांगायचं तर…

त्या शिक्षकांना मुलांना कुठलीही शिक्षा देऊन त्रास द्यायचा नव्हता, त्यांना कुठल्याही किंमतीत मुलांना घडवायचं होतं!

विद्यार्थ्याने अभ्यास केला नाही, तर त्यांना स्वतःला अस्वस्थता वाटायची. गृहपाठ अपूर्ण राहिला की त्यामागचं कारण शोधायचं. वर्गात काही गडबड केली की वेळीच समज द्यायची. आणि एखादा मुलगा वारंवार हलगर्जीपणा करत असेल, तर सरांचा तो ठरलेला एकच सज्जड दम असायचा,

“उद्या तुझ्या आई-वडिलांना शाळेत घेऊनच ये!”

त्या एकाच वाक्याने आमच्या अर्ध्या अधिक चुका जागच्या जागी थांबायच्या! कारण तेव्हा शिक्षक आणि पालक यांच्यात एक अतिशय पवित्र, अदृश्य धागा होता. प्रत्येकाला मुलाच्या भविष्याची खरी चिंता होती.

त्या सुवर्णकाळात ना कसले स्मार्ट बोर्ड होते, ना डिजिटल क्लासरूम्सची झगमगाट, ना मोबाईलवर पीडीएफ नोट्स मिळायच्या, ना कुठले रेकॉर्डेड ऑनलाइन लेक्चर्स असायचे.

होता तो फक्त, एक काळा फळा… पांढरा खडू… हातातील कपड्याचा डस्टर… आणि समोर उभे असलेले निस्सीम प्रामाणिक शिक्षक!

फळ्यावर खडूने गिरवलेला प्रत्येक कठीण प्रश्न, आणि डस्टरने हलकेच पुसून टाकलेलं प्रत्येक उत्तर… आजही डोळ्यांसमोर अगदी जसंचं तसं उभं राहतं. प्रत्येक विषयाचा वेगळा तास, त्या तासाला लागलीच होणारी उजळणी, अभ्यासातून होणाऱ्या छोट्या-चाचण्या, त्या चाचण्यांमधल्या चुका, आणि त्या चुका प्रेमाने पुन्हा समजावून सांगणारे गुरुजी!

तेव्हा कदाचित शाळा आकाराने छोट्या होत्या, पण तिथे शिकवणारे शिक्षक विचारांनी आणि मनाने खूप मोठे होते.

आज काळ बदलला आहे. शिक्षण खूप आधुनिक आणि हाय-टेक झालं आहे.

आज मुलांच्या हातात टॅब आणि स्क्रीन आहेत. भव्यमोठ्या इमारतींच्या शाळा आहेत. स्मार्ट बोर्डवर पाठांचे थ्रीडी व्हिज्युअल्स दिसतात. एका क्लिकवर जगाभराचं ज्ञान आज मुठीत आहे.

पण या सगळ्या झगमगाटातही एक गोष्ट मात्र तशीच आहे,

शिक्षकाशिवाय शाळा आजही अपूर्णच आहे,

कारण तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं, तरी ते मुलाच्या मनातील निशब्द अस्वस्थता ओळखू शकतं का?

ऑनलाइन वर्ग सुंदर धडा शिकवू शकतो, पण मुलाच्या उतरलेल्या चेहऱ्याकडे पाहून, डोळ्यात डोळे घालून “काय रे? आज तू असा शांत का आहेस?” अशी विचारपूस करू शकतो का?

मोबाईल प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सेकंदात देऊ शकतो, पण खऱ्या आयुष्यात बरोबर आणि चूक यातील सूक्ष्म फरक अनुभवातून जगायला कोण शिकवणार?

म्हणूनच, आज शिक्षक दिनानिमित्त त्या जुन्या, लाडक्या शिक्षकांची पावलोपावली आठवण येते.

शाळेच्या त्या छोट्या बाकावर वर बसून सरांना दिलेले फुलांचे ते छोटे-छोटे गुच्छ आठवतात. शिक्षक दिनी  वर्गाच्या बाहेर काढलेली रांगोळी आणि सरांच्या हातात प्रेमाने दिलेलं एक साधं फूल आजही मनाच्या पाटीवर कोरलेलं आहे. आणि त्याहूनही जास्त आठवते ती त्यांची आपल्यावर असलेली करडी, पण तितकीच मायाळू नजर,

“वडिलांची सही घेऊन ये.”

“उद्या आईला सोबत घेऊन ये.”

“तुला काल सांगितलं होतं ना, मग अभ्यास का केला नाहीस?”

“तू नक्कीच करू शकतोस, पण तू स्वतः प्रयत्नच करत नाहीस!”

त्यांच्या त्या शब्दांत वरवर पाहता कडक राग होता, पण त्या रागाच्या मुळाशी विद्यार्थ्यासाठी असलेलं अथांग प्रेम आणि आपलेपणा होता.

कदाचित त्या काळात आजच्यासारखी आधुनिक साधनं नसतील…

पण माणसाला माणसात आणणारी विचारांची खरी आधुनिकता तेव्हाच होती!

मुलाने शिकावं, स्वतःच्या हिमतीवर पायावर उभं राहावं, एक सुसंस्कृत माणूस व्हावं आणि या जगाच्या रंगमंचावर ताठ मानेने जगावं, हीच शिक्षकांची एकमेव आणि अंतिम इच्छा असायची.

आज काळ बदलला, शाळा बदलल्या, शिकवण्याच्या पद्धतीही बदलल्या.

पण एका खऱ्या शिक्षणाचं मूळ प्रयोजन आजही तेवढंच खरं आहे,

मुलाला फक्त परीक्षा पास करण्यासाठी तयार करणं नाही, तर संपूर्ण आयुष्यासाठी खऱ्या अर्थाने सक्षम करणं!

आज या पवित्र शिक्षक दिनी त्या जुन्या, वात्सल्याची मूर्ती असलेल्या शिक्षकांच्या आठवणींना मनापासून आणि अत्यंत आदराने नमस्कार…

ज्यांच्या छडीची कधीकाळी हुडहुडी भरवायची, पण त्यांच्याच संस्कारांची आणि शब्दांची शीतल सावली आयुष्यभर पाठीशी उभी राहिली!खरंच…ते शिक्षक होते!आणि म्हणूनच आजही मन आतुरतेने सांगतं,शाळा कितीही आधुनिक होऊ दे, तंत्रज्ञान कितीही पुढारू दे, पण प्रत्येक मुलाला माणूस म्हणून घडवणारा एक मनापासूनचा, अस्सल शिक्षक नेहमीच हवासा वाटतो.

🌷शिक्षक दिनाच्या  सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

सौ तृप्ती देव

भिलाई छत्तीसगड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या