जाने दिल को ही, क्या हो गया !
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 06/9/2026 :
मन भरकटलं असेल, वाईट संगत लागली असेल, आयुष्य वाया गेलं असेल तरी घाबरू नका. आतातरी उठा, देवाची प्रार्थना करा. उशीर झाला तरी देव माफ करेल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, "ऊठ गड्या अरुणोदय झाला, सद्गुरूच्या ज्ञानाचा | सोडा काम विकार बिछाना, नाश करा अज्ञानाचा ||" अरे माणसा, आयुष्यभर झोपलास, आतातरी जागा हो. तुला जागं करण्यासाठी सद्गुरू ज्ञानाचा सूर्य घेऊन आले आहेत. तुझ्या मनात जे काम, क्रोधाचे घाणेरडे अंथरून आहे ते फेकून दे आणि ज्ञानाने अज्ञानाचा अंधार संपवून टाक. आपण आयुष्यभर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या सहा विकारांच्या बिछान्यावर झोपलो आहोत. म्हणून संत आपल्याला जागं करतात.
जाने दिल को ही, क्या हो गया |
ऐसी गफलत मे मैने तो, आना न था ||धृ||
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, आज माझ्या मनाला काय झालंय. अशा बेसावधपणात, चुकून मी येथे यायला नको होतं. माणसच मन खूप चंचल असतं. आपल्याला माहित असतं की हे चुकीचं आहे, तरी मन तिकडेच जात. जसे- एखाद्या विद्यार्थाला माहित असतं की मोबाईलमुळे अभ्यास होत नाही, तरी त्याचा हात सारखा मोबाईलकडेच जातो. राष्ट्रसंत म्हणतात की, आज माझ्या मनाला काय झालं ते कळत नाही. मी अशा ठिकाणी आलो जिथे मला यायला नको होतं. माया, मोह माणसाला बुचकळ्यात पाडते. उदा- एखाद्या माणूस दारुच्या दुकाना पुढून जाताना विचार करतो, जायचं नाही पण गफलतीत आत जातोच. नंतर पश्चाताप होतो की येथे यायला नको होत.
शाम होने लगी, दिन समाने लगा |
प्रार्थना का समय, ठीक आने लगा |
मेरा तिरछा कदम क्यों गया?
मैने ये वख्त ऐसा, बहाना न था ||
जाने दिल को ही, क्या हो गया ||1||
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, दिवस मावळतो तसेच आपले आयुष्य संपत येते. संध्याकाळची वेळ आली की, सामुदायिक प्रार्थना केली पाहिजे. देवाचं नाव घेण्याची ही संधी सोडू नये. दिवसभर आपण कामात, पैसे कमवण्यात घालवतो आणि रात्री झोपायचे वेळी आठवतं की, अरे आज देवाच नाव, प्रार्थना केली नाही. तिरछा कदम म्हणजे वाकडं पाऊल, चुकीच्या मार्गांवर जाणे. माझं पाऊल सरळ देवाकडे जायला हवं होत, ते विषय, वासनेकडे, वाईट ठिकाणी का गेलं? उदा- दोन रस्ते दोन ठिकाणी जातात. एक ईश्वर भक्ती करण्याकरिता मंदिराकडे आणि दुसरा रस्ता जुगाराकडे, दारू दुकानाकडे जाणारा असतो. आपल्याला माहित असूनही पाऊल वाकड्या रस्त्याकडे जाऊ देऊ नये. सायंकाळची ही वेळ अशी वाया घालवायला नको होती. ती फुकट घालवू नये. मन चुकीच्या ठिकाणी जातं. वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्यापेक्षा आताच सावध झालं पाहिजे.
मित्र चाहे कहें, घुमने को चले |
वो क्यो जाने कि तुम, हाथ ही को मलो |
मोतिया बिन्द आँखो गया |
किसकी संगत से रंगत, गमाना न था ||
जाने दिल को ही, क्या हो गया ||2||
राष्ट्रसंत म्हणतात, मित्र जरी म्हणाले चला फिरायला जाऊ या. त्यांना काम माहित की तुम्ही फक्त हातच चोळत राहाल. चांगल्याच्या संगतीत जी रंगत आहे ती घालवायला नको होतं. जसे डोळ्यांना मोतीबिंदू झाल्यासारखं चांगल्याचे संगतीत जाणे का टाळतो. येथे मित्र म्हणजे आपले विषय-वासना, मोह, मनाचे खोटे मित्र. ते आपल्याला नेहमी म्हणतात, चला मजा करू या. फिरू या, हे करू या, ते करू या. व्यसनी मित्राचे मागे जाऊ नये. मित्र म्हणतात, "एकदा ट्राय कर, काय होतयं" तसं आपल मन आपल्याला संसाराच्या गर्तेमध्ये अडकवतं. हात चोळत बसणे म्हणजे पश्चाताप करणे, हताश होणे. त्या मित्रांना काय कळणार मला पश्चाताप झाला, ते तर मजा करून निघून जातील. येथे मला एकट्यालाच भोगावे लागेल. येथे डोळ्याचा मोतीबिंदू नाही तर डोळ्याला ज्ञानाचा मोतीबिंदू आहे. मायेमुळे आपल्या डोळ्यावर पडदा आला आहे. आपल्याला खरं-खोटं, चांगल वाईट दिसेनासं झालंय. मायेचा मोतीबिंदू झाल्यावर समोर देव असूनही, चांगली संधी असूनही आपल्याला दिसत नाही. ज्यांच्या संगतीने माझं तेज, माझी इज्जत, माझी भक्ती जाईल, अशा लोकांच्या संगतीत मी जायला नको होतं. चांगल्या माणसाच्या संगतीत आपण चांगलं होतो आणि वाईट माणसाच्या संगतीत आपली रंगत जाते. जसे- कोळश्याचे गोदामात गेल्यावर अंगावर काळा रंग लागतोच तसेच वाईट संगतीचा डाग लागतोच.
अब तो उठो चलो, प्रार्थना में चले |
चाहे देरी भयी तो भी, होंगे भले |
लाभ जितना भी हो, पायगा |
कहता तुकड्या ये गल्ली तो, होना न था ||
जाने दिल को ही, क्या हो गया ||3||
राष्ट्रसंत म्हणतात, आतातरी उठा, चला प्रार्थनेला जाऊ या. जरी उशीर झाला असला तरीही भलं होईल. जितका लाभ मिळेल तितका मिळवून घ्या. परत ही चुक पुन्हा व्हायला नको. खूप वेळ वाया गेला, मन भरकटलं पण आतातरी जागे व्हा. अजूनही वेळ गेलेली नाही. चला प्रार्थनेला जाऊ या. जसे- एखाद्या विद्यार्थी वर्षभर अभ्यास करत नाही आणि परीक्षा तोंडावर आली की त्याच्या मित्राला म्हणतो, "आतातरी उठ, आतातरी वाचायला बस" तसचं संत आपल्याला उठवत आहेत. आयुष्यभर मायेत चालवलं, आतातरी ईश्वराच्या नामाकडे वळा. देवाच्या दारात कधीच उशीर होत नाही. तुम्ही सकाळी 5 वाजता नाही आलात तरी 10 वाजता आलात तरी तो स्विकारतो. जसे- आईकडे मूल सकाळी जेवायला नाही आला दुपारी उशिरा आला तरी आई म्हणते, "ये बाळा, जेवून घे" आई रागावत नाही. तसा परमेश्वर आहे. वाल्या कोळी आयुष्यभर पाप करत होता पण शेवटी रामनाम घेऊन वाल्मिकी ऋषी झाला म्हणून उशीर झाला तरी भलचं होईल. आता पूर्ण आयुष्य नाही मिळालं तरी जेवढा वेळ मिळाला तेवढ्यात जेवढा लाभ मिळवता येईल तेवढा मिळवा. एक क्षणाची प्रार्थना सुद्धा वाया जात नाही. जसे- दुकान बंद व्हायला काही वेळ शिल्लक राहताना सामान घ्यायला आत जाऊन घेऊन येतोच ना. काहीच नाही मिळालं त्यापेक्षा थोडं तरी मिळालं. ही भावना. त्याचप्रमाणे एका मिनिटाचे नामस्मरण सुद्धा लाख मोलाचं आहे. शेवटी तुकडोजी महाराज म्हणतात, अरे आपण ही चुक करायला नको होती. वेळ वाया घालवायला नको. उदा- एखादा म्हातारा माणूस आपल्या नातवाला सांगतो. "बाळा मी आयुष्यभर पैशाच्या मागे लागलो, देवाचं नाव घेतलं नाही, ती चूक तू करु नकोस." तसाच हा संताचा उपदेश आहे.
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त
श्री गुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन 9970404180


0 टिप्पण्या