यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने मंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन

 

यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने मंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन

वृत्त एकसत्ता न्यूज

 दिनांक 03/09/2026 :

कोल्हापूर :- शेतकरी मेंढपाळ पशुपालक यांच्या पाळीव जनारांचा   मृत्यू झाल्यास त्याची नुकसान भरपाई मिळावी  या उद्देशाने केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत पशुधन विमा योजनेतील शेळ्या मेंढ्यांची संख्या १० वरून सरासरी ५० ते १०० करावी व विमा संरक्षित रक्कम ही ७ हजार रुपये ऐवजी १२ हजार ते १५ हजार रुपये करावी. अशा मागणीचे निवेदन यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  व मेंढपाळ चराई कुरण समितीचे राज्यपाल नियुक्त सदस्य  संजय वाघमोडे यांनी  राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री पंकजाताई मुंडे यांना दिले. निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे, पालकमंत्री प्रकाश अबिटकर, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास खात्याचे सचिव रामास्वामी एन, पशुसंवर्धन उपायुक्त कोल्हापूर यांनाही देण्यात आलेल्या आहेत.

 निवेदनात पुढे म्हटले आहे कि     

     नैसर्गिक आपत्ती, रोगराई, विषबाधा, सर्पदंश, दूषित पाणी, गंभीर अपघात, तसेच विविध संसर्गजन्य व साथीच्या रोगामुळे पशुधन दगावल्यास पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. अशा परिस्थितीमध्ये विमा संरक्षणाच्या माध्यमातून पशुपालकांना त्वरित आर्थिक नुकसान भरपाई उपलब्ध करून देणे त्यांचे आर्थिक स्थैर्य कायम राखणे तसेच त्यांना कर्जबाजारी होण्यापासून वाचवणे या उद्देशाने राज्यात पशुसंवर्धन विभागामार्फत पशुधन विमा योजना १५% लाभार्थी स्वहिस्सा व ८५ %  शासन अनुदान तत्त्वावर राबवण्यात येत आहे. सदर योजनेतील निकषांमध्ये प्रति कुटुंब कमाल पशुधन मर्यादा ही १० शेळ्या-मेंढ्या आहे (एखाद्या लाभार्थ्याकडे दहापेक्षा जास्त पशुधन असल्यास व सदर पशुधनासाठी विमा कवच घेण्यास पशुपालक इच्छुक असल्यास दहापेक्षा जास्त असलेल्या पशुधनासाठी विमा हप्त्याची पूर्ण रक्कम पशुपालकाने भरणे आवश्यक राहील). तसेच कमाल विमा संरक्षित रक्कम प्रति शेळी मेंढी रक्कम रुपये ७०००/-  इतकी आहे. परंतु शेळ्या मेंढपाळाकडे सरासरी ५० ते १०० शेळ्या मेंढ्या असतात. व रोगराई विषय बाधा, रस्त्यावरील अपघात काही वेळा मेंढपाळाचा  कळपातील सर्व शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू झाल्यामुळे मेंढपाळ कर्जबाजारी होऊन त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. शेळ्या मेंढ्यांच्या बाबतीत सदर योजनेच्या निकषांमध्ये बदल करणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून जास्तीत जास्त शेळी मेंढी पालक या योजनेचा लाभ घेऊ शकतील. या योजनेमध्ये खाली नमूद केल्याप्रमाणे बदल करणे अपेक्षित आहे.

    विमा अनुदान अनुद्नेय प्रती कुटुंब कमाल शेळी मेंढी यांची संख्या १० वरून ५० ते १०० नग करण्यात यावी. 

     मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेमध्ये शेळी मेंढीची प्रति नगाची किंमत ही मादी साठी १२ हजार रुपये  व नरांसाठी १५ हजार रुपये आहे. परंतु पशुधन विमा योजनेमध्ये शेळी मेंढी यांच्यातील नर व मादी यांच्याकरिता सरसकट कमाल विमा संरक्षित रक्कम ही ७ हजार रुपये इतकी ठेवण्यात आलेली आहे. सदर रक्कम अत्यंत तोकड्या स्वरूपाची असल्याने मेंढपाळाचे झालेले नुकसान भरपाई होऊ शकत नाही. त्यामुळे सदर रकमेत बदल करून ती मादी शेळी किंवा मेंढी करिता १२ हजार रुपये व बोकड किंवा नर मेंढा करिता १५ हजार रुपये करण्यात यावी हि विनंती. 

        पंकजा मुंडे यांच्या बरोबर झालेल्या चर्चेनंतर शेळ्या मेंढ्यांची संख्या व विमा रक्कमेत वाढ करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल  असे आश्वासन पंकजा मुंडे यांनी दिले असल्याचे श्री वाघमोडे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या