सकाळी रिकाम्या पोटी धन्याचं पाणी प्यायल्यास शरीरात नेमकं काय घडतं? जाणून घ्या धणे आरोग्यासाठी का आहेत फायदेशीर…

 

सकाळी रिकाम्या पोटी धन्याचं पाणी प्यायल्यास शरीरात नेमकं काय घडतं? जाणून घ्या धणे आरोग्यासाठी का आहेत फायदेशीर… 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 29/9/2026 :

Coriander Water Benefits: सकाळी रिकाम्या पोटी धन्याचं पाणी पिणे पचनसंस्थेसाठी फायदेशीर ठरू शकतं, असे आयुर्वेदिक तज्ज्ञांचे मत आहे.

*Coriander Water Benefits:* सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी काहीतरी आरोग्यदायी पिण्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षांत चांगलाच लोकप्रिय झाला आहे. कधी लिंबूपाणी, कधी जिऱ्याचं पाणी, तर आता धन्याचं पाणी अनेकांच्या मॉर्निंग रुटीनचा भाग बनलं आहे. स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेले धणे पारंपरिक आहारात आणि आयुर्वेदातही मोठ्या प्रमाणात वापरलं जातं.

आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मुरलीधर आर. बल्लाळ यांच्या मते, धन्याचा वापर पारंपरिक उपचार पद्धतींमध्ये पचनाशी संबंधित समस्यांसह विविध कारणांसाठी केला जातो. आयुर्वेदात धन्याला शरीराला थंडावा देणाऱ्या गुणधर्मासाठी ओळखलं जातं. मात्र, पारंपरिक वापर आणि एखाद्या पदार्थाच्या वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेल्या परिणामांमध्ये फरक असतो. त्यामुळे धन्याचं पाणी फायदेशीर ठरू शकतं, पण ते कोणत्याही आजारावर उपचार म्हणून पाहू नये.

*पोटाची जळजळ आणि ‘बॉडी हीट’साठी धन्याचं पाणी?*

सकाळी उठल्यावर पोटात जळजळ, अ‍ॅसिडिटी किंवा शरीरात उष्णता जाणवत असेल, तर काही लोक धन्याचं पाणी घेतात. आयुर्वेदिक दृष्टिकोनातून धन्याला शरीराला थंडावा देणारा पदार्थ मानलं जातं. धन्यामध्ये लिनालूलसारखे जैवसक्रिय घटक आढळतात. या घटकांवर पचनसंस्थेतील संबंधित काही संशोधन झालं आहे. त्यामुळे धन्याचं पाणी पचनासाठी आणि पोटाच्या अस्वस्थेसाठी उपयोगी ठरू शकतं, असं मानलं जातं. मात्र, ॲसिडिटी किंवा पोटाची जळजळ वारंवार होत असेल तर केवळ धन्याच्या पाण्यावर अवलंबून राहण्याऐवजी त्यामागचं कारण तपासणी महत्वाचं आहे. 

*धन्यामध्ये नेमकं काय असतं?*

धणे फक्त पदार्थाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी वापरले जात नाहीत. त्यामध्ये विविध जैवसक्रिय संयुगे आढळतात. 

*लिनालूल*

धन्याच्या सुगंधी तेलामध्ये लिनालूल प्रमुख घटक असतो. पचनसंस्थेतील स्नायूंची संबंधित त्याच्या संभाव्य परिणामांचा अभ्यास करण्यात आला आहे. 

*फ्लेव्होनाॅइड्स आणि फेनोलिक ॲसिड*

धन्यामध्ये क्वेर्सेटिन, एपिजेनिन आणि कॅफिन ॲसिड यांसारखी संयुगे आढळतात. या घटकांमध्ये ॲंटिऑक्सिडंट गुणधर्म असल्याचे प्रयोगशाळा आणि प्रायोगिक संशोधनातून दिसून आले आहे. 

*खनिजे*

धन्यामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि लोह यांसारखी खनिजेही आढळतात. मात्र, धन्याचं पाणी प्यायल्याने या खनिजांची मोठ्या प्रमाणात पूर्तता होते, असं समजणं योग्य नाही. 

*सकाळी गॅस, पोटफुगी कमी करण्यासाठी उपयोगी?*

सकाळी उठल्यावर गॅस, पोट फुगणे किंवा पोट जड वाटणे अशी समस्या काही जणांना जाणवते. धन्यामधील लिनालूल आणि इतर सुगंधी संयुगांचा पचनसंस्थेवर संभाव्य परिणाम असल्याचेही संशोधनात तपासले गेले आहे. पारंपरिक वापरामध्ये धन्याला पचनास मदत करणारा आणि गॅस कमी करण्यास सहाय्य करणारा पदार्थ मानलं जातं. त्यामुळे धन्याचं पाणी काही लोकांना पचनाच्या दृष्टीने आराम देऊ शकतं. मात्र, सतत पोट फुगणे, तीव्र ॲसिडिटी, पोटदुखी किंवा वजन कमी होणे अशी लक्षणे असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. 

*ब्लड शुगरवरही परिणाम होतो?*

धन्याच्या संभाव्य ब्लड शुगर-कमी करणाऱ्या गुणधर्मांवर काही प्रायोगिक संशोधन झालं आहे. काही अभ्यासांमध्ये धन्याच्या अर्काचा इन्सुलिन आणि ग्लुकोज मेटाबाॅलिझमशी संबंधित प्रक्रियांवर परिणाम तपासण्यात आला आहे. पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या ती म्हणजे धन्याचं साधं भिजवलेलं पाणी आणि संशोधनात वापरलेला केंद्रित अर्क एकसारखे नसतात.‌

त्यामुळे धन्याचं पाणी प्यायल्याने ब्लड शुगर निश्चितच कमी होईल, असा दावा करता येत नाही. डायबिटीजची औषधं घेणाऱ्या व्यक्तींनी अशा घरगुती उपायांचा अतिरेक टाळावा. 

*'डिटाॅक्स वाॅटर' म्हणून किती खरं?*

धन्याचं पाणी 'डिटाॅक्स' करण्यासाठी उपयुक्त असल्याचं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सांगितलं जातं. मात्र, शरीरातील अपायकारक पदार्थ बाहेर काढण्याचं प्रमुख काम लिव्हर आणि किडनी यांसारखे अवयव करतात.‌

धन्यामध्ये लघवीचे प्रमाण वाढवण्यासाठी संभाव्य गुणधर्मांचा अभ्यास झाला आहे. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त पाणी आणि सोडियम बाहेर जाण्यास मदत होऊ शकते. मात्र, याला 'शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर काढणारा डिटाॅक्स' असं म्हणणं अतिशयोक्ती ठरु शकते. 

*धन्याचं पाणी बनवायचं कसं?*

जर तुम्हाला हे पेय आपल्या रुटीनमध्ये समाविष्ट करायचं असेल, तर साधी पध्दत वापरु शकता. 

- १. रात्री साधारण १ चमचा साबूत धणे हलकेच कुटून घ्या.

- २. ते सुमारे २५० मिली पाण्यात भिजत ठेवा. 

- ३. सकाळी हे पाणी धण्यांसह २-३ मिनिटं मंद आचेवर गरम करु शकता. 

- ४. पाणी गाळून कोमट असताना प्या. 

- ५. नाश्त्याच्या साधारण ३० मिनिटं आधी घेण्याची पध्दत काही ठिकाणी वापरली जाते. 

*रोज प्यायचं का?*

धन्याचं पाणी हे आरोग्यदायी आहाराचा पर्याय नाही, हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. संतुलित आहार, पुरेस पाणी, नियमित व्यायाम आणि योग्य झोप यांना पर्याय म्हणून कोणतंही 'हेल्थ डिंक' वापरता येत नाही. तसंच, तुम्हाला डायबिटीज, किडनीशी संबंधीत समस्या, वारंवार ॲसिडिटी किंवा इतर गंभीर आजार असल्यास नियमितपणे धान्याचं पाणी सुरू करण्यापूर्वी डॉक्टर किंवा पात्र आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला घ्या. 

धन्याचं पाणी पारंपरिक पद्धतीने पचनासाठी आणि शरीराला थंडावा देण्यासाठी वापरलं जातं. धन्यामधील काही जैवसक्रिय घटकांवर वैज्ञानिक संशोधनही झालं आहे. मात्र, त्याचे सर्व आरोग्यदावे अद्याप ठोसपणे सिद्ध झालेलेच नाहीत. त्यामुळे हे पेय चमत्कारी उपाय न मानता संतुलित आहाराचा एक साधा भाग म्हणून पाहणं योग्य ठरेल. 

संकलन : यशवंत वाघ

*************************

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या