🔹 फडणवीसांना रोखणं दिल्लीलाही जमत नाही आणि सत्तेच्या सारीपाटावर निष्ठावंतांचा बळी जातोय!

 

🔹 फडणवीसांना रोखणं दिल्लीलाही जमत नाही आणि सत्तेच्या सारीपाटावर निष्ठावंतांचा बळी जातोय!

माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 17/9/2026

राजकारणाच्या या अत्यंत क्रूर आणि गुंतागुंतीच्या खेळात जेव्हा मी उभा राहून आजूबाजूला पाहतो, तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, इथे तत्त्वे ही फक्त भाषणांपुरती उरली आहेत. सत्तेची भूक हीच आता एकमेव प्रेरणा बनली आहे. आज मी माझे स्पष्ट विचार तुमच्यासमोर मांडणार आहे, कारण सत्तेच्या या सारीपाटावर वर्षानुवर्षे सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांचा कसा बळी जातोय आणि आयारामांना कशा पायघड्या घातल्या जात आहेत, याचा पर्दाफाश करणे मला अत्यंत गरजेचे वाटते.

 गणेशोत्सवाच्या काळात विद्याधर बापट यांचे एक वाक्य खूप व्हायरल झाले होते, 'माणूस हा स्खलनशील प्राणी आहे'. अगदी तसेच, जेव्हा राजकीय पक्ष सत्तेत येतात, तेव्हा भ्रष्टाचाराकडे आणि नैतिकतेच्या घसरणीकडे त्यांची पावले आपोआप वळू लागतात. भारतीय जनता पक्षाने १२ वर्षे सत्ता उपभोगली आहे आणि या काळात पक्षातील 'पार्टी विथ डिफरन्स' हा आदर्शवाद कसा पातळ होत गेलाय, याची ही आतली गोष्ट आहे.

मला स्पष्टपणे सांगू द्या की, आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देऊ शकेल, असा दुसरा कोणताही नेता भारतीय जनता पक्षाकडे नाही. त्यांचे पक्ष आणि सरकार या दोन्हीवर एकहाती वर्चस्व आहे. याचे एक ज्वलंत उदाहरण मी तुम्हाला देतो. नुकतीच पुण्यात भाजपची राज्य कार्यकारिणीची मोठी बैठक पार पडली. तिथे राज्याचे पक्षाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे सकाळी भाषण झाले आणि संध्याकाळी फडणवीसांचे. पण माध्यमांमध्ये आणि बातम्यांमध्ये तुम्हाला फक्त फडणवीस दिसले, रवींद्र चव्हाण कुठे कोपऱ्यातही दिसले नाहीत. पूर्वी काँग्रेसच्या काळात एक पद्धत होती; राज्यात जर ताकदवान मुख्यमंत्री असेल, तर दिल्लीचे हायकमांड मुद्दाम असा प्रदेशाध्यक्ष नेमायचे जो मुख्यमंत्र्यांवर अंकुश ठेवेल. पण आज नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे फडणवीसांवर अंकुश ठेवेल अशी कुठलीही यंत्रणा किंवा दुसरा नेता राज्यात उपलब्धच नाहीये.

मग या एकाधिकारशाहीतून आणि सत्तेच्या गणितातून काय होतं? तर बाहेरच्या नेत्यांची पक्षात खोगीरभरती सुरू होते. तुम्हीच विचार करा, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार भक्कम असताना अजित पवारांना सत्तेत घेण्याची काय गरज होती? यामागे फक्त एकच गणित होते; ते म्हणजे शरद पवारांना कमकुवत करणे. पण याचा फटका कोणाला बसला? तर एकनाथ शिंदेंसारख्या नेत्याला, जे स्वतः माजी मुख्यमंत्री होते. दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या प्रवेशामुळे शिंदे काही काळ एकाकी पडल्यासारखे वाटले. अर्थात, आज मराठा समाजाचा सर्वात मोठा आणि एकमुखी नेता म्हणून एकनाथ शिंदे स्वतःला सिद्ध करू शकतात. कारण शरद पवारांच्या पक्षात रोहित पवार, जयंत पाटील किंवा शशिकांत शिंदे हे शिंदेंइतके मोठे मराठा नेते नाहीत. सुनेत्रा पवारांच्या गटात किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतही शिंदेंना आव्हान देईल असा मराठा चेहरा सध्या तरी दिसत नाही.

फक्त अजित पवारच नाही, तर आदर्श घोटाळ्याचा थेट आरोप असलेल्या अशोक चव्हाणांना भाजपने पक्षात घेतले. इथे नैतिकतेचा प्रश्नच उरत नाही. मराठवाड्यात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एका बाजूला असताना, संभाजीनगर (औरंगाबाद) सारख्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ताकद वाढवण्यासाठी अशोक चव्हाणांची गरज पक्षाला वाटली. पण या सगळ्या आयात नेत्यांमुळे मूळ निष्ठावंतांचे काय? सातारा-सोलापूरच्या पट्ट्यात जयकुमार गोरे यांच्यासारखा बाहेरचा माणूस मंत्री बनतो आणि वर्षानुवर्षे पक्षाचे काम करणारे विजय देशमुख आणि सुभाष देशमुख नाराज होतात. भंडाऱ्यासारख्या जनसंघाच्या काळापासूनच्या बालेकिल्ल्यात परिणय फुकेंना ताकद दिली जाते आणि जुने लोक अस्वस्थ होतात. अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंना हनुमान चालिसावरून आव्हान देणाऱ्या रवी राणा आणि नवनीत राणा यांना डोक्यावर घेतले जाते आणि प्रवीण पोटे यांच्यासारखा स्थानिक निष्ठावंत नेता बाजूला पडतो. प्रशासनातही हेच चालते, डीजे बंदीच्या निर्णयात फडणवीसांचे निष्ठावान मानले जाणारे विश्वास नांगरे पाटील आणि जोशी यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची भूमिका आपण पाहिलीच आहे.

मला तुम्हाला शरद पवारांच्या ताकदीचे वास्तवही सांगायचे आहे. कागदावर पवार साहेब खूप मोठे नेते वाटत असले तरी, त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या २५ वर्षांत कधीही ७१ च्या वर आमदार आणि ८ च्या वर खासदार निवडून आणले नाहीत. म्हणजे विधानसभेत कमाल २५% आणि लोकसभेत १६% हीच त्यांची खरी ताकद. दुसरीकडे, भाजपने लागोपाठ तीन निवडणुकांमध्ये १०० हून अधिक आमदार आणले आहेत. तरीही त्यांना १४५ चा जादुई आकडा स्वबळावर गाठता येत नाही. पुण्याच्या कसबा पेठेत सलग २५ वर्षे गिरीश बापट यांचा बालेकिल्ला होता. पण मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आणि काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी भाजपला अस्मान दाखवले. याचाच अर्थ, कुठलाही मतदारसंघ खिशात आहे, या भ्रमात राहता येत नाही. म्हणूनच विजयाची खात्री देणारे बाहेरचे लोक भाजपला घ्यावेच लागतात. पण या प्रक्रियेत संघाच्या विचारांचे, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत प्रशिक्षण घेतलेले कार्यकर्ते फरफटत जातात. जशी शेकोटीत सुक्या पानांसोबत ओली पाने टाकली की शेकोटी विझू लागते, तसेच सत्तेसाठी आलेल्या बाहेरच्या ओल्या पानांमुळे पक्षाचा उजवा विचार आणि आदर्शवाद आता विझू लागला आहे.

काँग्रेस संपली का? हा प्रश्न अनेकांना पडतो. पण मला वाटतं, काँग्रेस म्हणजे 'नारबाची वाडी' या चित्रपटातल्या 'नारबा'सारखी आहे. दोन पिढ्या संपल्या तरी तो वाडीत असतोच, तशी काँग्रेस मरणार नाही. आज ते सत्तेबाहेर असल्याने मरगळलेले आहेत. विलासराव देशमुख गेले, सुशीलकुमार शिंदे आजारी किंवा वयोमानामुळे बाजूला आहेत. पण पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा सक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिलाय. दिल्लीत शिक्षण झालेले, आनंदराव चव्हाण यांच्यासारख्या नेत्याचा वारसा लाभलेले पृथ्वीराज चव्हाण अत्यंत हुशार राजकीय व्यक्तिमत्त्व आहे. आज फडणवीस ज्या 'जलयुक्त शिवार' योजनेचा डंका पिटतात, ती मूळ संकल्पना पृथ्वीराज चव्हाणांच्या 'जलयुक्त गाव अभियानाची' होती. त्यांनी ३५० कोटींत पश्चिम महाराष्ट्रात ८ टीएमसी पाणी साठवून दाखवले होते. पण आज पृथ्वीराज चव्हाण एकाकी आहेत आणि नाना पटोले, माणिकराव ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांचा सावळागोंधळ आपण पाहतोय. पण लक्षात ठेवा, उद्या जर २०२९ मध्ये लाट फिरली आणि राहुल गांधी पंतप्रधान झाले, तर हेच मीडियावाले त्यांना 'जीनियस' ठरवायला मोकळे होतील. उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची ही जगाची रीत आहे.

शेवटी मला एवढंच सांगायचंय की, सत्तेचे हे राजकारण अत्यंत क्रूर आहे. इथे तत्त्व आणि व्यवहार यांच्यात जेव्हा संघर्ष होतो, तेव्हा नेहमी व्यवहार जिंकतो आणि तत्त्वे हरतात. तळागाळातील कार्यकर्ता केवळ सतरंज्याच उचलत राहतो. 

साभार - विषय हार्ड 

*━═━═━═━═━═━═━═━═━═━═*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या