‼️ जगातील सर्वात विषारी पक्षी ‼️

 

‼️ जगातील सर्वात विषारी पक्षी ‼️ 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 20/9/2026

विज्ञानाला ज्ञात असलेल्या पहिल्या विषारी पक्ष्याचा शोध १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात पक्षीशास्त्रज्ञ जॅक डम्बाचर यांनी फील्डवर्क करताना लावला.

अनेक प्राण्यांच्या प्रजाती नैसर्गिकरीत्या रासायनिक विषारी पदार्थ तयार करतात. शिकार करण्यासाठी, स्वरक्षणासाठी किंवा भक्षकांपासून बचाव करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. विविध प्रजातींचे साप, बेडूक, काही कीटक, मासे विषारी असतात. मात्र, न्यू गिनी मध्ये आढळणारा हुडेड पिटोहुई हा जगातील सर्वाधिक विषारी पक्षी आहे. या पक्ष्यांना हाताळताना डम्बाचर यांना त्यात काहीतरी विचित्र जाणवले. पक्ष्याच्या चोचीला व डोळ्यांना स्पर्श केल्यानंतर सतत अस्वस्थ वाटत असे. कालांतराने त्यांच्या लक्षात आले की, पक्ष्याच्या पंखांना किंवा त्वचेला स्पर्श केल्यास मुंग्या येणे, सुन्न होणे आणि जळजळ होत आहे. या पक्ष्याच्या त्वचेत आणि पंखात बॅट्राकोटॉक्सिन नावाचे न्यूरोटॉक्सिन असते, जे विषारी बेडकात आढळते.

बॅट्राकोटॉक्सिन हे एक अत्यंत शक्तिशाली न्यूरोटॉक्सिन आहे, जे मज्जासंस्थेवर परिणाम करू शकते. दक्षिण अमेरिकेतील विषारी बेडकात आणि काही कीटकात ते आढळते. या विषाचा त्वचेला स्पर्श झाल्यास किंवा शरीरात गेल्यास स्नायूंना तात्काळ त्रास होऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. मानवात या रसायनाचा थोड्या प्रमाणात संपर्क आल्यास सामान्यतः सुन्नपणा, मुंग्या येणे आणि जळजळ होण्याची शक्यता असते. अधिक प्रमाणात या विषाचा संपर्क झाल्यास पक्षाघातही येऊ शकतो. मात्र महत्त्वाचा फरक म्हणजे विषारी साप किंवा कीटकांप्रमाणे हा पक्षी डंख मारत नाही. केवळ त्याच्या संपर्कात आल्या नंतरच विषाचे परिणाम दिसून येतात.

पिटोहुई स्वतःहून बॅट्राकोटॉक्सिनचे संश्लेषण करत नाहीत. हे विष आहाराद्वारे, सिक्वेस्ट्रेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रक्रियेद्वारे प्राप्त होते. विषारी किड्यांना खाऊन हा पक्षी हे विष मिळवतो. मेलिरीड बीटल (कोरेसिन) हा भृंग प्रकारातील किडा हा पिटोहुईचा विषाचा मुख्य स्रोत आहे. या किड्यात बॅट्राकोटॉक्सिन असतात आणि पिटोहुई ते नियमितपणे खातात.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण ━═━═━═━═━═━═━═━═━═━═

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या