विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 13/9/2026 :
आपण मंदिरात किंवा घरात देवाची कोणतीही मूर्ती पाहिली, तरी आपले मन क्षणात प्रसन्न होते. ती मूर्ती धातूची असो, संगमरवरी दगडाची असो किंवा मातीची; त्यावरील मनमोहक कलाकुसर आणि सुबक रंगसंगती मनाला निखळ आनंद देते.
खरे तर *'टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही'* अशी आपल्याकडे एक अत्यंत सार्थ म्हण आहे. कुशल मूर्तिकार छन्नी-हातोड्याने दगडातील नको असलेला भाग तासून काढतो, तेव्हाच त्या साध्या दगडात लपलेली सुंदर मूर्ती प्रकट होते आणि आपल्याला एका अलौकिक देवरूपाचे दर्शन घडते.
मुलांनो, अगदी याच पद्धतीने आपले जीवन आणि व्यक्तिमत्त्व घडत असते. आपले शिक्षक व पालक आपल्यावर उत्तम संस्कार करण्यासाठी चांगल्या गोष्टी शिकवतात, चुका सुधारतात आणि वेळप्रसंगी रागावून शिक्षाही करतात. ते आपल्यातील दुर्गुणांवर घाव घालून आपले व्यक्तिमत्त्व सुंदर घडवत असतात.
आपले पालक आणि शिक्षक हे नेहमीच वंदनीय आहेत; आपण त्यांच्याप्रती सदैव कृतज्ञ राहिले पाहिजे!
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या