🫀 हृदयविकार आणि अॅन्जिओप्लास्टी,
🫀समज आणि गैरसमज,
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 06/9/2026 :
हल्लीच्या काळात हृदयविकारावरच्या उपचारांमधला महत्त्वाचा भाग म्हणजे अॅन्जिओप्लास्टी. ती का करायची, ती कशी केली जाते, अॅन्जिओप्लास्टी केल्या नंतर काय होतं, काय काळजी घ्यायची असते याबद्दल आपल्याला माहीत असलंच पाहिजे.
कोरोनरी अॅन्जिओग्राफी या तपासणीत कोरोनरी आर्टरीला अवरोध (Block) असल्याचे निदर्शनास आले. या अवरोधाची ट्रीटमेंट म्हणजे प्रत्येक वेळी बायपास सर्जरीच करावी लागते, असे नाही. गेल्या १५ वर्षांपासून कमी त्रासदायक, कमी विच्छेदन लागणारी औषधोपचार पद्धती विकसित झाली असून तिचे नाव आहे ‘कोरोनरी अॅन्जिओप्लास्टी.’ १९७७ साली डॉ. ग्रुंझिग यांनी मनुष्याच्या कोरोनरी आर्टरीची अॅन्जिओप्लास्टी यशस्वीरीत्या करून दाखवली. त्यानंतर या पद्धतीचा वापर यशस्वीपणे मानवात होऊ लागला. भारतात सुद्धा १९८५ पासून या पद्धतीचा उपयोग करणे सुरू झाले, पण खऱ्या अर्थाने याचा भरपूर वापर १९९० च्या नंतरच सुरू झाला.
यामध्ये कोरोनरी अॅन्जिओग्राफी प्रमाणेच मांडीच्या धमनी मधून गाइडिंग कॅथेटर नामक नळी कोरोनरी आर्टरीच्या मुखाजवळ ठेवण्यात येते. या कॅथेटर मधून एक सूक्ष्म अशी गाइडिंग वायर पुढे सरकवतात. ही वायर अत्यंत सूक्ष्म, स्टील पासून बनलेली असून तिचा पृष्ठभाग गुळगुळीत केलेला असतो. तिचा व्यास ०.०१४ इंच इतका छोटा असतो. तिची लांबी १८० सेंमी असते आणि तिचा सुरुवातीचा भाग हा फारच लवचीक व आर्टरीला इजा न करणारा असतो.
वेगवेगळ्या गुणवत्तेच्या गायडिंग वायर उपलब्ध असून अवरोध प्रमाणे तिची निवड हृदयरोगतज्ञ करतात. या वायरची हालचाल एक्स-रे स्क्रीनिंग मशीन मध्ये व्यवस्थित दिसते आणि बाहेरून या वायरच्या सुरुवातीच्या भागाची हालचाल नियंत्रित करण्यात येते. अशाच नियंत्रित हालचाली करून ही वायर अवरोध असलेल्या आर्टरी मध्ये शेवट पर्यंत आत ढकलण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून ही वायर अवरोधा पलीकडे जाऊन स्थिरावेल. मग या वायरच्या साहाय्याने या वायरवरूनच डायलेटेशन कॅथेटरनामक एक छोटी नळी अवरोधा पर्यंत नेण्यात येते. या कॅथेटरच्या पुढील टोकास एक लांबूळका फुगा असतो. एक्स-रे स्क्रीनिंगच्या साहाय्याने समोरच्या मॉनिटरवर बघून हा बलून अवरोध जिथे आहे, त्या योग्य ठिकाणी ठेवून त्याला फुगवण्यात येते. काही वेळानंतर मग फुग्यातील दाब कमी करण्यात येतो. असे दोन तीन वेळा करण्यात येते.
अवरोध हा मुख्यत: चरबीने बनलेला असल्यामुळे या बलूनद्वारे दाबला जातो व आर्टरी पूर्ववत होऊ शकते. मग वायर, बलून कॅथेटर आणि गाइडिंग कॅथेटर काढून घेण्यात येतात. अवरोध हा कडक असेल, कॅल्शियमयुक्त असेल तर बलून जास्त दाबाने फुलवतात किंवा एक विशिष्ट पद्धतीचा बलून वापरतात, त्याला कटिंग बलून म्हणतात. याच्या पृष्ठभागावर सूक्ष्म असे ब्लेड लावण्यात आलेले असतात. जेव्हा हा बलून फुलवण्यात येतो तेव्हा या ब्लेडद्वारे कडक अवरोध कापला जातो आणि मग तेथे अॅन्जिओप्लास्टी केली जाते. वेगवेगळ्या साइजचे* आणि गुणवत्तेचे बलून उपलब्ध असून अवरोधानुसार डॉक्टर त्याची निवड करतात.
ज्या ठिकाणी आर्टरी मध्ये अवरोध आहे त्या ठिकाणी आधी बलून अॅन्जिओप्लास्टी केली जाते. त्यानंतर त्याच जागी अवरोधाच्या आकारमाना प्रमाणे स्टेंट निवडला जातो आणि बलून अॅन्जिओप्लास्टी प्रमाणेच त्या ठिकाणी स्टेंट बसवण्यात येतो. वेगवेगळ्या साइजचे स्टेंट्स उपलब्ध आहेत. हे स्टेंट्स बलून डायलेटेशन कॅथेटरच्या बलूनवर मशीनद्वारे फिट बसवलेला असतो. बलून फुलवला तर स्टेंट सुद्धा आकाराने मोठा होतो आणि जेव्हा बलून मधील दाब कमी करून बलून काढून टाकण्यात येतो. स्टेंट हा त्याच ठिकाणी फुललेल्या अवस्थेत आर्टरी मध्ये फिट बसतो कारण तो लवचीक पदार्थाने बनलेला नसतो आणि आर्टरी सुद्धा पुन्हा त्या ठिकाणी छोटी होऊ शकत नाही, कारण स्टेंट असे होऊ देत नाही म्हणजे त्या आर्टरी मध्ये पुन्हा आर्टरीच्या लवचीकतेमुळे अवरोध निर्माण होऊ शकत नाही. ही प्रक्रिया पण अत्यंत सुरक्षित असून फक्त अर्ध्या तासात पूर्ण होऊ शकते आणि रुग्णाला दोन दिवसात सुट्टी करण्यात येते.
*◼️स्टेंट अॅन्जिओप्लास्टीच्या मर्यादा*
स्टेंट हा मेटलचा बनला असल्यामुळे जेव्हा तो आर्टरीत बसवण्यात येतो तेव्हा रक्तातील रक्तपेशी त्याला चिकटतात आणि पुन्हा अवरोध होण्याची शक्यता १५-२० टक्के एवढी असते. तसेच बलून आणि स्टेंटच्या दाबामुळे रक्तवाहिन्याच्या आतील पापुद्र्याला भेगा किंवा छोटे काप पडू शकतात. त्या जखमांमुळे तेथे रक्तवाहिन्यांची पेशी वाढून पुन्हा अवरोध होऊ शकतो. त्यामुळे योग्य आकाराचा स्टेंट निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच बलूनमध्ये दाब सुद्धा योग्य असाच देणे अत्यावश्यक आहे. हे सर्व बघून शास्त्रज्ञांनी स्टेंट मध्ये पुन्हा सुधारणा केल्यात. या स्टेंटना मग काही विशिष्ट पदार्थाचा मुलामा देण्यात येतो. जेणे करून पुन्हा अवरोध होण्याचे प्रमाण कमी होईल. १० वर्षांपूर्वी एक नवीन प्रकारचा स्टेंट शोधण्यात आला आहे. यात स्टेंटवर काही औषधांचा मुलामा लावण्यात येतो. हे औषध मग कोरोनरी आर्टरीत हळूहळू प्रमाणात रिलीज होते, जेणे करून ज्या ठिकाणी स्टेंट बसविण्यात आला आहे, त्या ठिकाणी रक्तपेशी आणि रक्तवाहिन्यांच्या पेशींची वाढच होणार नाही आणि तेथे पुन्हा अवरोध होणार नाही. या स्टेंटचे पुन्हा ब्लॉक होण्याचे प्रमाण तीन ते चार इतके कमी आहे. या स्टेंटचा वापर भारतात सुद्धा सुरू करण्यात आला असून त्यांचे रिझल्ट चांगले आहेत. या स्टेंटवर सिरोलिमस नावाचे औषध लावलेले आहे. हे औषध कॅन्सर विरोधी म्हणून वापरण्यात येते. यामुळे पेशींची अनावश्यक वाढ होत नाही. जेव्हा हे औषध स्टेंट मधून कोरोनरी आर्टरीत झिरपते तेव्हा तेथील पेशींच्या अनावश्यक वाढीला आळा बसतो आणि पुन्हा अवरोध होत नाही.
*◼️मेडिकेटेड स्टेंट्सच्या मर्यादा.*
मेडिकेटेड स्टेंट्स मुळे जरी पुन्हा अवरोध होण्याचे प्रमाण ३-५ टक्क्यांवर आले असले तरी मेडिकेटेड स्टेंटचे सुद्धा काही तोटे आहेत.
◆ते धातूने बनलेले असल्यामुळे ते आयुष्यभर हृदयाच्या रोहिणीत राहतात.
◆अशा रुग्णांना आयुष्यभर रक्त पातळ करण्याच्या गोळ्या खाव्या लागतात. नाहीतर धातू असल्यामुळे रक्ताच्या गुठळ्या बसून स्टेंट बंद होऊ शकतो.
◆जर पुन्हा अवरोध निर्माण झाला आणि सर्जरीची आवश्यकता लागली तर स्टेंटच्या ठिकाणी ग्राफ्ट (नवीन रोहिणी) जोडणे शक्य होत नाही.
◆जगातील ५-८ टक्के लोकांना स्टेंटच्या धातूची अॅलर्जी असू शकते.
हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन शास्त्रज्ञांनी एक विरघळणारा स्टेंट Bioreabsorbable Vascular Scafold (BVS) निर्माण केला आहे. याचे संशोधन २००६ पासून सुरू झाले असून काही वर्षांपासून तो चलनात आला आहे. भारतात सुद्धा गेल्या काही महिन्यांपासून वापरात येतो आहे. BVS हा हृदयाचा रक्तवाहिनीचा अवरोध दूर करण्याचा अत्याधुनिक उपचार आहे. छोट्या धातूच्या जाळीच्या नळीसारखी BVS ची रचना असते. अवरोध असलेली रोहिणी मोकळी करून हृदयाच्या स्नायूकडे रक्तप्रवाह पुन्हा प्रस्थापित करण्याचे कार्य BVS करते. एकदा रोहिणी (Artery) स्वबळांवर उघडी राहायला लागली की BVS हळूहळू विरघळतो, संभवत: रक्तवाहिनी पुन्हा नैसर्गिकरीत्या काम करू लागते. BVS हा इतर वैद्यकीय साधनात वापरल्या जाणाऱ्या पदार्थापासून तयार केला जातो. BVS दोन वर्षांत विरघळून जातो आणि रोहिणीला नैसर्गिकरीत्या काम करता येते. BVS मुळे पुन्हा अवरोध होण्याचे प्रमाण १% पेक्षा कमी आहे. कारण यात धातू नसल्यामुळे धातूमुळे होणारे पुनर्वरोध टाळता येते. ज्याप्रमाणे मोडलेला हात प्लॅस्टर मध्ये बसवून त्याचे संरक्षण केले जाते आणि हाड जुळल्यानंतर प्लॅस्टर काढले जाते. त्याचप्रमाणे BVS तुमच्या रक्तवाहिनीला ती स्वत:हून खुली राहीपर्यंत आधार देतो आणि नंतर तो विरघळून जातो. BVS किंवा डिझॉल्व्हिंग कदाचित भविष्यात हृदयविकाराच्या रुग्णाला मिळालेले वरदान आहे.
*◼️अॅन्जिओप्लास्टीचे फायदे.*
◆अॅन्जिओप्लास्टी ही औषधोपचार पद्धती अत्यंत सुरक्षित व कमी वेळात होणारी आहे (अर्धा तास).
◆यात कुठेही चिरफाड करण्याची आवश्यकता नसते, ना भूल देण्याची आवश्यकता असते.
◆रुग्ण हा पूर्ण वेळ शुद्धीवर असतो, त्यामुळे जनरल अॅनेस्थेशिया देण्याचे जे धोके असतात ते टाळता येतात. मुख्यत: वयस्कर लोकात ही फारच उपयोगाची गोष्ट आहे.
◆ज्यांना हृदयविकारा सोबत बाकी आजार सुद्धा आहेत. उदा. दम्याचे विकार, किडनीचे आजार, हाडांचे आजार किंवा फार वयस्कर अशा लोकांना बायपास सर्जरीचा किंवा ४-६ तास अॅनेस्थेशियाचा त्रास होऊ शकतो. अशा रुग्णांना अॅन्जिओप्लास्टी वरदान ठरू शकते.
◆बायपास सर्जरीत लावण्यात आलेल्या ग्राफ्ट मध्ये जर अवरोध निर्माण झाला तरी त्याची सुद्धा अॅन्जिओप्लास्टी करता येते, त्याला ग्राफ्ट अॅन्जिओप्लास्टी म्हणतात.
◆जर रुग्ण फारच सीरिअस असेल, शॉक मध्ये असेल किंवा हार्ट अॅटॅकमुळे त्याचा रक्तदाब कमी झाला असेल, अशा वेळी जर ज्या आर्टरीमुळे हार्ट अॅटॅक आला आहे, त्या आर्टरीची अॅन्जिओप्लास्टी केल्यास रुग्ण वाचू शकतो किंवा त्याचा रक्तदाब स्थिर होऊ शकतो.
◆ज्यांना एक किंवा दोनच आर्टरी मध्ये मर्यादित अवरोध आहे त्यांना अॅन्जिओप्लास्टी फार उपयोगी असते.
◆तरुण रुग्णांवर सहसा अॅन्जिओप्लास्टी करण्यात येते. बायपास सर्जरी टाळता येत असल्यास टाळावी किंवा लांबवावी.
◆अॅन्जिओप्लास्टी दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा सुद्धा करता येते. परत परत केल्याने रुग्णाच्या जीविताला काही धोका होत नाही. पण परत परत जर बायपास सर्जरी करण्याचा प्रसंग आलाच तर धोका फार वाढतो.
◆यात रक्त देण्याची आवश्यकता नसते. रुग्णाला २-३ दिवसात सुट्टी करण्यात येते. बायपासच्या रुग्णाला कमीत कमी ८-१० दिवस हॉस्पिटल मध्ये ठेवावे लागते आणि ३-४ बाटल्या रक्तपण द्यावे लागते.
*◼️अॅन्जिओप्लास्टीचे इतर प्रकार.*
*१) Atherectomy Procedure (अॅथरेकटॉमी अॅन्जिओप्लास्टी).*
यामध्ये एक कॅथेटरवर बलूनच्या अर्ध्या जागी स्कूप बसवण्यात आलेला असतो आणि अर्ध्या भागावर बलून असतो. जेव्हा बलून फुलवला जातो तेव्हा त्याच्या विरुद्ध भागातील अवरोध हा स्कूप मध्ये अडकतो किंवा पकडला जातो आणि नंतर हा भाग कटरच्या साहाय्याने कापून टाकण्यात येतो. नंतर या कॅथेटरची दिशा बदलून उरलेला अवरोध हळूहळू खरवडून कापून टाकला जातो. कापलेले तुकडे हे कॅथेटरच्या एका विशिष्ट कप्प्यात जमा होतात. नंतर ही पूर्ण सिस्टीम काढून टाकण्यात येते. जर अवरोध फार कडक असतील तर या पद्धतीचा वापर करण्यात येतो.
*२) Rotablation Angioplasty (रोटाब्लेशन अॅन्जिओप्लास्टी).*
यामध्ये गाइडिंग कॅथेटरवरून एक छोटासा बर (भोवरा) अवरोध असलेल्या जागी नेतात. हा बर १.२५ मिमी ते २.५ मिमी आकाराचा असून त्यावर हिऱ्याचे सूक्ष्म तुकडे बसवलेले असतात. हा भोवरा आर्टरी मध्ये गाइडिंग वायरवर एका विशिष्ट मशीन द्वारे मिनिटाला एक लाख ते दीड लाख रोटेशन्स या वेगाने फिरवला जातो. या वेगाने आणि बर वर बसवलेल्या हिऱ्यांच्या टोकदार तुकड्यामुळे अवरोधाचे अत्यंत सूक्ष्म असे तुकडे होऊन अवरोध नाहीसा होतो. हे अवरोधाचे तुकडे इतके छोटे असतात की ते हृदयाच्या रक्तवाहिन्या मधून वाहत निघून जातात. हे तुकडे रक्तपेशींच्या आकारासारखे असल्यामुळे ते सहजतेने रक्तासोबत वाहून जातात. जे अवरोध कॅल्शियममुळे कडक झालेले असतात, अशा स्थितीत फारच उपयुक्त असते.
*३) अॅन्जिओप्लास्टी बद्दल गैरसमज.*
हार्ट अॅटॅक आल्याबरोबर अॅन्जिओप्लास्टी करू नये किंवा रुग्णाला काही काळ स्थिरावल्यावरच ही करावी. जितक्या लवकर अॅन्जिओप्लास्टी केली जाईल, तितक्या लवकर रुग्ण स्थिरावतो आणि त्याला या प्रक्रियेचा जास्तीत जास्त फायदा होतो. त्याच्या हृदयाची कार्यक्षमता वाढते. म्हणून हार्ट अॅटॅक आल्यानंतर पहिल्या काही तासात अॅन्जिओप्लास्टी करणे हृदयासाठी फायद्याचे आहे. या प्रक्रियेला प्रायमरी अॅन्जिओप्लास्टी म्हणतात. विदेशात, देशात पण ही प्रक्रिया नेहमीची झाली असून याद्वारे हृदयाची कार्यक्षमता नॉर्मल राहण्यास मदत होते आणि हृदयाला कमीत कमी क्षती होते.
अॅन्जिओप्लास्टी ही टेम्पररी प्रक्रिया आहे. पुढे बायपास करावीच लागते. ९०-९५ टक्के लोकात अॅन्जिओप्लास्टीचे यश हे आयुष्यभर राहते. उरलेल्या ५ ते १० टक्के लोकात जर पुन्हा अवरोध झाल्यास त्यासाठी पुन्हा अॅन्जिओप्लास्टी करता येते.
अॅन्जिओप्लास्टी ही फार सुरक्षित प्रक्रिया आहे. हृदयरोगतज्ञ ज्यांनी यात विशेष प्रावीण्य मिळवलेले आहे अशा तज्ञ यांच्या हातून या प्रक्रियाची रिस्क अर्धा टक्क्यापेक्षाही कमी असते आणि सर्व सुविधांनी सज्ज असलेल्या हॉस्पिटलात ही रिस्क शून्य टक्के असते. महत्त्वाचे म्हणजे योग्य रुग्णाची निवड, योग्य साहित्याची निवड, चांगल्या हॉस्पिटलची निवड आणि निष्णात डॉक्टर यांचा संगम म्हणजे यशस्वी अॅन्जिओप्लास्टी.
*◼️अॅन्जिओप्लास्टी झाल्या नंतर पुढे काय.?*
अॅन्जिओप्लास्टी नंतर दोन दिवसात रुग्णालयातून सुट्टी देण्यात येते. २-४ दिवस घरीच आराम केल्यानंतर अशा रुग्णाने आपल्या जीवनशैलीबद्दल विचार करावा आणि हृदयविकार का झाला, त्याची कारणमीमांसा करणे आवश्यक आहे. जी काही धोक्याची घटके आहेत त्यांना कमी करण्याचा प्रयत्न सुरू करावा.
◆दररोज सकाळी योग्य असा व्यायाम करावा. या व्यायामाचे स्वरूप हृदयरोगतज्ञ डॉक्टरकडून आखून घ्यावे. डॉक्टर रुग्णाच्या वयाप्रमाणे, वजनाप्रमाणे आणि हृदयाच्या कार्यक्षमतेवरून त्याच्या व्यायामाचे स्वरूप ठरवतात.
◆सकाळी उठून वेगाने चालण्याचा व्यायाम हा सर्व वयाच्या लोकांसाठी चांगला आहे.
◆शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करावा. वजन कमी करावे आणि कमरेचा घेर कमी करावा. यासाठी आहारात योग्य तो बदल करावा त्यासाठी हृदयरोगतज्ञ आणि आहारतज्ञ यांची मदत घ्यावी.
◆भरपूर फळे व भाज्या खाव्यात आणि आहारात कमी कॅलरीचे आणि कमी तेल तुपाच्या पदार्थाचा समावेश करावा. कडधान्ये, कोंड्या टरफलासह धान्य, डाळी खाव्यात. मासे, चरबी विरहित मांस थोडे आणि कधी कधी खाण्यास हरकत नाही. हिरव्या पालेभाज्या, लसूण, कांदा, काकडी, टोमॅटो, मुळा, बीट, गाजर यांचा भरपूर वापर जेवणात असावा.
◆छंद जोपासा, खेळा, तणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा. आनंदी राहा. मानसिक शांतता व स्थैर्य याचा उत्तम फायदा होतो. त्यासाठी ध्यानधारणा, योगा या गोष्टींचा उपयोग करावा.
◆शांत झोप शरीराला आवश्यक असते, म्हणून रात्री ७ ते ८ तास छान झोप घ्यावी.
◆धूम्रपान टाळा, तंबाखूचे सेवन बंद करा. मद्यपान टाळा, फास्ट फूड टाळा, चायनीज फूड टाळा.
◆जेवणात मिठाचे प्रमाण कमी करावे, मसाल्यांच्या पदार्थाचा वापर कमी करावा.
◆संताप, चिडचिड, वैताग, मत्सर, द्वेष, निराशा यांपासून दूर राहा. सामाजिक असहिष्णुता व एकाकी राहणे टाळावे. आनंदी राहा, समाधानी राहा.
◆मधुमेह नियंत्रणात ठेवावा.
©® डॉ. गजानन रत्नपारखी,
▣✥⊰༺☬༒☬༻⊱✥▣
0 टिप्पण्या