" नावात काय आहे?"
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 17/9/2026
" नावात काय आहे?" हे प्रसिद्ध वाक्य विल्यम शेक्सपियरच्या 'रोमियो अँड ज्युलिएट' या अजरामर नाटकातील आहे. हे काही अंशी खरंय पण आणि काही अंशी खोट पण. सध्या आमचं आडनाव खरंच खूप गाजतय. ह्यातला फक्त डीजे च्या मुद्द्यासाठी ते आडनाव गाजलं ते पटलं सुद्धा मात्र बाकीचे मुद्दे मात्र अजिबातच न पट्या. ह्या आडनावावरून आठवल हे आडनांव ज्यांनी गाजवल, ह्या आडनावाच्या आमच्या एका साहित्यिक व्यक्तीचा आदर वाटतो, अभिमान वाटतो. ती व्यक्ती म्हणजे वसंत बापट. आज वसंत बापट ह्यांचा स्मृतिदिन.
वसंत बापट हे एक प्रतिभावंत मराठी कवी, लेखक व शिक्षणतज्ज्ञ होऊन गेले. साहित्य क्षेत्रातील ब्रह्मा , विष्णु आणि महेश म्हणजेच तिघे, वसंत बापट, विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर या कवींनी सतत चाळीस वर्षे बृहन्महाराष्ट्रात प्रवास करून आपल्या काव्यवाचनाने मुलुख गाजविला. त्या काळात त्यांच्या कवितांनी मराठी रसिकांना वेडे केले होते. ह्या तिघांचे एकत्रितपणे साहित्य क्षेत्रातील योगदान, तिघांची कामगिरी बघून त्रिमुखी दत्तात्रयाची आठवण होते.
बापटांचा जन्म 25 जुलै, इ.स. 1922 रोजी महाराष्ट्रातील कऱ्हाड येथे झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या स.प. महाविद्यालयात झाले. बापट तरुण वयातच भारताच्या स्वांतत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. इ.स. 1942 च्या चलेजाव चळवळीत त्यांचा सहभाग होता. ऑगस्ट 1943 पासून जानेवारी 1945 पर्यंत त्यांनी तुरुंगवास देखील भोगला.
पुढे ते 'नॅशनल कॉलेज ' आणि 'रामनारायण रुईया कॉलेज ' ह्या मुंबईतील महाविद्यालयांत मराठी व संस्कृत ह्या विषयांचे प्राध्यापक झाले. इ.स. 1947 ते इ.स. 1982 या काळात त्यांनी मुंबई विद्यापीठात अध्यापन केले. दरम्यान, इ.स. 1974 मध्ये ते मुंबई विद्यापीठातील गुरुदेव रवींद्रनाथ टागोर विभागाचे प्राध्यापक झाले. ते दिल्लीच्या साहित्य अकादमीचे सदस्य होते.
साने गुरूजींचा सहवास, आणि प्रभाव बापटांवर असल्याने ते संस्कार अत्युत्तमच असणार ही खात्रीच. 'बिजली' ह्या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर ह्या संस्कारांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. 'अकरावी दिशा', 'सकीना' आणि 'मानसी' हे त्यांचे ’बिजली’ नंतरचे काव्यसंग्रह होते. त्यांनी लहान मुलांसाठीही कविता लिहिल्या. वसंत बापट इ.स. 1983 ते इ.स. 1988 या काळात साधना नियतकालिकाचे संपादक होते.
अजून एक खास गोष्ट म्हणजे पौराणिक व ऐतिहासिक कथानकांवरची त्यांची नृत्यनाट्येही प्रभावी ठरली. ’केवळ माझा सह्यकडा' ही त्यांची कविता सर्वतोमुखी झाली. जनमानसातखूपलोकप्रियझालेले 'गगन सदन तेजोमय' सारखे अप्रतिम प्रार्थनागीत त्यांनी लिहिले. कालिदासाच्या विरही यक्षाची व्याकुळता त्यांनी मेघहृदयाच्या रूपाने मराठीत आणली. त्यांची ’सकीना’ उर्दूचा खास लहेजा घेऊन प्रकटली.
इ.स. 1999 मध्ये मुंबई येथे झालेल्या 72 व्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.युगोस्लोव्हियातील आंतरराष्ट्रीय कविसंमेलनात भारताचे अधिकृत प्रतिनिधी म्हणूनही ते सहभागी झाले. इ.स. 1977 व इ.स. 1993 मध्ये अमेरिकेत आणि इ.स. 1992 मध्ये आखाती देशांत त्यांचा काव्यदर्शन हा कार्यक्रम झाला. चंगा मंगा, अबडक तबडक, आम्ही गरगर गिरकी, फिरकी, फुलराणीच्या कविता आणि परीच्या राज्यात हे त्यांचे बालकवितासंग्रह आहेत, तर बालगोविंद हे बालनाट्य त्यांनी लिहिले. त्यांचे
अकरावी दिशा, अनामिकाचे अभंग आणि इतर कविता, अबडक तबडक , अहा, देश कसा छान,
आजची मराठी कविता, आम्हा गरगर गिरकी,
चंगा मंगा , ताणेबाणे , तेजसी, परीच्या राज्यात ,
प्रवासाच्या कविता, फिरकी ,फुलराणीच्या कविता ,
बिजली, मानसी, मेघहृदय, रसिया, राजसी, शततारका, शतकांच्या सुवर्णमुद्रा, शिंग फुंकिले रणी, शूर मर्दाचा पोवाडा, सेतू हे सुप्रसिद्ध काव्यसंग्रह. त्यांच्या गाजलेल्या कविता, गीतं पुढीलप्रमाणे, आभाळाची आम्ही लेकरे, उत्तुंग आमुची उत्तर सीमा,केवळ माझा सह्यकडा,
गगन सदय तेजोमय, देह मंदिर चित्त मंदिर, फुंकर,
बाभुळझाड, शतकानंत आज पाहिली, सदैव सैनिका पुढेच जायचे, सैन्य चालले पुढे, आणिअजूनही कितीतरी.
आजच्या दिवशी अजून एका सुप्रसिद्ध गीतकार व्यक्तींची आठवण होते. आपल्या सर्वांना माहित असलेले आणि सगळ्यांच्या आवडीचे गीतकार म्हणजे हसरत जयपुरी. आज त्यांचाही स्मृतिदिन.
ह्यांचा जन्म जयपूरचा. त्यांनी वयाच्या सुमारे विसाव्या वर्षी कविता लिहायला सुरुवात केली. त्यांचे खूप लोकप्रिय ठरलेले संगम चित्रपटातील प्रेमगीत, , 'ये मेरा प्रेमपत्र पढ कर के तुम नाराज ना होना' हे गीत आजही तितक्याच आवडीने तन्मयतेने ऐकले जाते. हीच त्यांच्या गीताची खासियत. आजही प्रत्येक लग्नात बँड वर वाजवले जाणारे लोकप्रिय गीत "बहारो फुल बरसाओ" हे त्यांचेच.
अगदी सुरवातीस म्हणजे साधारण 1940 मध्ये हसरत जयपुरी ह्यांनी बस कंडक्टर म्हणून नोकरी केली. अर्थातच गाण्याची आवड स्वस्थ बसू देत नव्हतीच आणि ह्या आवडीमुळेच नोकरी सुद्धा त्याच्या आड आली नाही. ते एका मुशायरात सहभागी झाले असताना पृथ्वीराज कपूर यांनी जयपूरीची कविता ऐकली आणि त्यांचा मुलगा राज कपूर यांच्याकडे त्यांची शिफारस केली. राज कपूर तेव्हा शंकर जयकिशनसोबत "बरसात" ह्या संगीतमय प्रेमकथा असलेल्या चित्रपटाची आखणी करीत होते. त्यासाठी जयपुरी यांनी ह्या चित्रपटासाठी पहिले गाणे लिहिले, "जिया बेकरार है." त्यांचे दुसरे गाणे "छोड गये बालम" हे होते.
शैलेंद्र यांच्यासोबत जयपुरी यांनी 1971 पर्यंत राज कपूर यांच्या सर्व चित्रपटांसाठी गाणी लिहिली. जयकिशन यांच्या मृत्यूनंतर आणि ' मेरा नाम जोकर' व 'कल आज और कल' या चित्रपटांच्या अपयशानंतर, राज कपूर यांनी इतर गीतकार आणि संगीत दिग्दर्शकांकडे मोर्चा वळवला. सुरुवातीला राज कपूर यांना ' प्रेम रोग' साठी त्यांना परत बोलवायचे होते , पण नंतर त्यांनी अमीर कझलबश या दुसऱ्या गीतकाराची निवड केली. अखेरीस कपूर यांनी त्यांना 'राम तेरी गंगा मैली' (१९८५) या चित्रपटासाठी गाणी लिहिण्यास सांगितले. नंतर, त्यांनी हसरत यांना " हीना" ह्या चित्रपटासाठी गाणी लिहिण्यासही आमंत्रित केले होते. त्यांची आजही तितक्याच आवडीने ऐकली जाणारी काही गीतं पुढीलप्रमाणे, बहारो फूल बरसाओ, आजा सनम मधुर चांदनी में , एहसान तेरा होगा मुझ पर , ये मेरा प्रेम पत्र पढ़कर, तेरी प्यारी प्यारी सूरत को, तुझे जीवन की डोर से ,बदन पे सितारे लपेटे हुए, आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे, आसमान से आया फरिश्ता, जाने कहां गए वो दिन , दिल के झरोखे में तुझको बिठाकर, जियें बेकरार है छाई बहार है , जिंदगी एक सफर है सुहाना , इचक दाना बीचक दाना, पंछी बनू उड़ती फिरूं , पर्दे में रहने दो वगैरे वगैरे.
खरंच अशी माणसे येती आणिक स्मृती ठेऊनी जाती. वसंत बापट आणि हसरत जयपुरी ह्यांना विनम्र अभिवादन!
कल्याणी बापट (केळकर)
9604947256
बडनेरा अमरावती
0 टिप्पण्या