कर्करोग उपचारांत वरदान ठरू शकणारी ‘प्रोटॉन थेरपी’ काय आहे?

 🩺हेल्थ मंत्रा| आरोग्य मंत्र|🩺

कर्करोग उपचारांत वरदान ठरू शकणारी ‘प्रोटॉन थेरपी’ काय आहे? 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 23/9/2026 :

कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराविरुद्धच्या लढ्यात ‘प्रोटॉन थेरपी’ वरदान ठरत आहे. या उपचार पद्धतीची नवी आवृत्ती बाजारात आली असल्याने उपचारांचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. येत्या पाच वर्षांत ही थेरपी देशभरात सहज उपलब्ध होईल, असा विश्वास कर्करोग तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

प्रोटॉन थेरपी म्हणजे काय?

प्रोटॉन थेरपी हा रेडिएशन थेरपीचाच एक प्रकार आहे, जो अतिशय अचूकपणे केवळ कर्करोगाच्या पेशींवर मारा करून त्यांना नष्ट करतो. परंतु, कर्करोगाच्या प्रकारानुसार आणि रुग्णाच्या शारीरिक स्थितीनुसार प्रोटॉन थेरपीबरोबरच शस्त्रक्रिया किंवा केमोथेरपीसारख्या इतर पूरक उपचारांची आवश्यकता भासू शकते. यामुळे कर्करोग मुळापासून नष्ट करणे अधिक सोपे आणि परिणामकारक होते. पारंपरिक रेडिएशनच्या तुलनेत प्रोटॉन पद्धतीत बरे होण्याचा दर जास्त आहे. विशेषतः लहान मुलांमधील कर्करोग आणि पुन्हा उद्भवणाऱ्या कर्करोगाच्या उपचारांमध्ये ही पद्धत अत्यंत प्रभावी ठरते. तथापि, ९९ टक्के सामान्य रुग्णांसाठी नेहमीचे रेडिएशनदेखील पुरेसे ठरते.

महागडी यंत्रसामग्री आणि जागेची अट

उपकरणाची प्रचंड किंमत आणि त्याला लागणारी जागा यामुळे ‘प्रोटॉन थेरपी’ ही सुविधा अजूनही देशभरात सर्वत्र सहज उपलब्ध होऊ शकलेली नाही. सध्या वापरात असलेल्या प्रोटॉन यंत्राची किंमत सुमारे ४०० कोटी रुपयांच्या घरात आहे, ज्यामुळे ती उभारणे अनेक मोठ्या रुग्णालयांच्याही आवाक्याबाहेर आहे. हे केंद्र उभारण्यासाठी किमान दोन एकरांहून अधिक जागेची आवश्यकता असते. याशिवाय, या थेरपीसाठी स्वतःचा ‘सायक्लोट्रॉन’ (Cyclotron) तयार करावा लागतो, ज्याद्वारे एका विशिष्ट पदार्थातून प्रोटॉनचे कण तयार केले जातात आणि ते तत्काळ उपचारांसाठी वापरले जातात. ही सर्व यंत्रसामग्री आकाराने अत्यंत विशाल असल्याने आणि तिच्या सुरक्षेची व देखभालीची चक्रे अत्यंत गुंतागुंतीची असल्याने, भारतात सध्या तरी ही सुविधा केवळ मोजक्याच ठिकाणी, उदाहरणार्थ, मुंबईतील टाटा ॲक्ट्रॅक – मर्यादित राहिली आहे.

लहान मुलांवरील उपचारांत सर्वाधिक फायदेशीर

प्रोटॉन थेरेपी प्रामुख्याने ट्युमरवर (गाठी) प्रभावी ठरते. प्रोटॉन थेरपीमध्ये प्रोटॉनचे कण ज्या ठिकाणी पोहोचतात, तोच त्यांचा अंतिम बिंदू बनतो आणि तेथून ते पुढे जात नाहीत. या अचूकतेचा सर्वांत मोठा फायदा लहान मुलांमधील कर्करोग उपचारांमध्ये होतो. लहान मुलांमध्ये कर्करोग पूर्णपणे बरा होण्याचा दर अत्यंत चांगला असतो. पारंपरिक रेडिएशनमुळे त्यांच्या शरीरातील इतर नाजूक अवयवांवर किंवा निरोगी पेशींवर परिणाम झाला, तर त्यांना आयुष्यभर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात किंवा भविष्यात पुन्हा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. प्रोटॉन थेरपीमुळे इतर निरोगी पेशींचे संरक्षण होत असल्याने बरा झालेल्या मुलाला भविष्यात शक्यतो इतर कोणताही आजार उद्भवत नाही.

नव्या आवृत्तीची वैशिष्ट्ये काय आहेत?

प्रोटॉन थेरपी तंत्रज्ञानाची नवी आवृत्ती बाजारात आली आहे. ही नवीन आवृत्ती आकाराने अतिशय छोटी, आटोपशीर आणि वापरण्यास सोपी आहे. नव्या यंत्राचा खर्च २०० कोटी ते २५० कोटी रुपयांपर्यंत आला आहे. आकाराने लहान आणि किमतीने तुलनेने कमी असल्याने रुग्णालयांना ती स्वतःकडे बसवणे आर्थिकदृष्ट्या शक्य होणार आहे. यामुळे पुढील २ ते ३ वर्षांत अनेक मोठी रुग्णालये हे तंत्रज्ञान वेगाने आत्मसात करतील.

वैद्यकीय साक्षरता आणि भारतीय डॉक्टरांचे कौशल्य

प्रोटॉन थेरपी हे अत्यंत आधुनिक आणि नवे तंत्रज्ञान असल्याने भारतीय डॉक्टर ते किती वेगाने आत्मसात करतील, असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र, भारतातील वैद्यकीय शिक्षण प्रणाली बऱ्याच वर्षांपासून अत्यंत नियमबद्ध आणि उच्च दर्जाची आहे. आपल्याकडील सुपर-स्पेशॅलिटी पदव्यांचा दर्जा जागतिक असल्याने भारतीय डॉक्टरांसाठी नवे तंत्रज्ञान शिकणे कठीण नाही. हे तंत्रज्ञान शिकण्यासाठी आणि ते योग्य रीतीने हाताळण्यासाठी वैद्यकीय परिषदा आणि प्रात्यक्षिकांचे आयोजन केले जाते.

♻️                                ♻️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या