रेल्वेत रात्री उशिरा लाइट लावण्याची परवानगी असते की नाही? रेल्वेतून प्रवासाआधी माहीत असावेत 'हे' नियम
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 18/9/2026
वेगाने धावणारी रेल्वे आणि खिडकींमधून बाहेरचा दिसणारा एक एक वेगळा नजारा काही वेगळाच आनंद देऊन जातो. जास्तीत जास्त लोक रेल्वेने प्रवास करतात. मग तो लांबचा असो वा जवळचा. आपणही अनेकदा रेल्वेने रात्री प्रवास केला असेलच. अशात रात्री झोपेत असताना अचानक कुणी वरचा मोठा लाइट लावला तर रागही आला असेल. रात्री उशिरा लावल्या जाणाऱ्या लाइटमुळे अनेकदा प्रवाशांमध्ये मोठे वादही होतात. अशात वाद होऊ नये म्हणून आपल्याला रेल्वे विभागाकडून लाइटसंबंधी केलेले नियम माहीत असणं महत्वाचं ठरतं.
रात्री किती वाजता मेन लाइट बंद करावा?
रेल्वेच्या नियमांनुसार, रात्री १० वाजता ते सकाळी ६ वाजेपर्यंत रेल्वे कोचमधील सगळे मेन लाइट बंद असावेत. यादरम्यान रात्री कोचमध्ये केवळ 'नाइट बल्ब' किंवा निळा लाइट सुरू ठेवता येतो. याचा स्पष्ट उद्देश हा आहे की, जे लोक झोपलेले आहेत त्यांची झोपमोड होऊ नये आणि त्यांना आरामात प्रवास करता यावा.
रात्री काही वाचायचं असेल किंवा काम असेल तर काय?
बऱ्याच लोकांना रात्री प्रवासादरम्यान वाचन करण्याची आवड असते. काही लोक रात्री उशिरा जेवण करतात किंवा कुणाला काही काही काम निघतं. अशात या लोकांनी काय करावं? तर यासाठी रेल्वे सीटजवळ एक छोटा रीडिंग लाइट लावलेला असतो. या लाइटमध्ये आपण आपलं काम करू शकता. याचा प्रकाश केवळ आपल्या सीटपर्यंतच असतो, ज्यामुळे इतरांना काही अडचण होत नाही.
मोठ्याने बोलणं, गाणी ऐकण्याबाबत नियम
रात्री प्रवास आरामदायक व्हावा यासाठी केवळ लाइटच नाही तर आवाजाबाबतही काही नियम आहेत. रात्री १० वाजतानंतर आपण मोबाइलवर हेडफोन न लावता मोठ्या आवाजात व्हिडीओ बघू शकत नाहीत. इतकंच नाही तर जोरजोरात फोनवर बोलूही शकत नाहीत. असं कुणी करत असेल तर प्रवासी रेल्वे हेल्पलाइनवर तक्रार करू शकतात. त्यांना दंडही भरावा लागू शकतो.
टीटीईसाठी सुद्धा नियम
अनेकांना हेही माहीत नसतं की, रात्री १० वाजेपासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत टीटीई सुद्धा आपलं तिकीट चेक करू शकत नाही. या वेळेत झोपेतून उठवून ते आपल्याकडे तिकीटाची मागणी करू शकत नाहीत. मात्र, जर आपण रात्री १० वाजतानंतर एखाद्या स्टेशनहून गाडीत बसले असाल तर आपलं तिकीट चेक केलं जाऊ शकतं.
0 टिप्पण्या