गुगलचे 'हे' भन्नाट फीचर माहीत आहे का? ९९% लोकांना कळत नाही या 'जादुई' टूलचा वापर!
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 22/9/2026 :
गुगलकडे असे अनेक भन्नाट फीचर्स आहेत जे आपल्या दैनंदिन कामांना अत्यंत सोपे बनवू शकतात, परंतु योग्य माहितीच्या अभावामुळे अनेक युजर्स याचा वापर करत नाहीत. असेच एक अत्यंत उपयुक्त आणि बहुउद्देशीय फिचर म्हणजे 'गुगल लेन्स' होय. फोनच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे फिचर केवळ फोटो काढण्यापुरते मर्यादित नाही, तर कोणत्याही वस्तूची ओळख पटवणे, मजकूर वाचणे आणि त्याबद्दल सविस्तर माहिती मिळवणे यासाठी कमालीचे उपयोगी ठरते.
समजा, तुम्ही प्रवासात आहात आणि रस्त्यात तुम्हाला एखादी अनोळखी वनस्पती, प्राणी, एखादे उत्पादन किंवा कोणतीही अशी वस्तू दिसली ज्याबद्दल तुम्हाला काहीही माहिती नाही. अशा वेळी गुगल लेन्स तुमची मदत करू शकते. कॅमेरा उघडून त्या वस्तूवर लेन्सचा वापर केल्यास गुगल त्यासंबंधित सर्व माहिती आणि अगदी तंतोतंत मिळजुळते फोटो तुमच्यासमोर आणून ठेवते. म्हणजेच, ज्या गोष्टीचे नाव तुम्हाला माहीत नाही, त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्ही मोबाईलच्या कॅमेऱ्याने काही सेकंदात मिळवू शकता.
गुगल लेन्सचे आणखी एक अत्यंत महत्त्वाचे फिचर म्हणजे फोटोमध्ये असलेला मजकूर ओळखणे. जर एखाद्या पुस्तकात, पोस्टरवर, डॉक्युमेंटवर किंवा बोर्डवर काहीतरी लिहिले असेल, तर ते पुन्हा मोबाईलमध्ये टाईप करण्याची गरज नाही. लेन्स तो मजकूर स्कॅन करून युजर्सना तो थेट कॉपी करण्याचा पर्याय देतो. मोबाईल नंबर, पत्ता, नोट्स किंवा एखाद्या कागदपत्रातील महत्त्वाची माहिती गोळा करण्यासाठी या फिचरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाऊ शकतो.
जर तुम्हाला एखाद्या दुसऱ्या भाषेत लिहिलेला मजकूर अजिबात समजत नसेल, तर गुगल लेन्स येथेही तुमचा धावून येतो. कॅमेऱ्याच्या मदतीने मजकूर स्कॅन करून तुम्ही त्याचे थेट भाषांतर पाहू शकता. विशेषतः परदेशात प्रवास करताना किंवा नवीन शहरात फिरताना तिथले साईनबोर्ड्स, हॉटेलचे मेनू कार्ड्स किंवा इतर भाषेतील माहिती समजून घेण्यासाठी हे फिचर अत्यंत वरदान ठरते.
ऑनलाईन शॉपिंग करतानाही गुगल लेन्सचा भन्नाट वापर केला जाऊ शकतो. एखाद्या आवडीच्या वस्तूचा फोटो काढून तुम्ही इंटरनेटवर त्यासारख्याच किंवा अगदी तशाच वस्तू शोधू शकता. यामुळे वस्तूचे अचूक नाव माहीत नसले तरीही त्याबद्दलची ऑनलाइन माहिती, किंमत आणि खरेदीचे पर्याय शोधणे खूप सोपे होते.
तुमच्या माहितीसाठी सांगायचे तर, बहुतांश अँड्रॉइडफोनमध्ये गुगल लेन्स थेट गुगल ॲप किंवा कॅमेरा ॲपच्या माध्यमातून उपलब्ध असते. गुगल ॲप उघडल्यानंतर सर्च बारजवळ लेन्सचे आयकॉन दिसते. काही डिव्हाइसमध्ये थेट कॅमेरा ॲपच्या आतही लेन्सचा पर्याय मिळतो. अर्थात, फोनचा ब्रँड, मॉडेल आणि सॉफ्टवेअरनुसार या फिचरचे इंटरफेस थोडेफार वेगळे असू शकते.
0 टिप्पण्या