नवी दिल्ली येथे सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचा सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार बहाल
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 22/9/2026 :
सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना लि., शंकरनगर अकलूज या साखर कारखान्यास सन २०२५-२६ या गळीत हंगामात ऊस विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राष्ट्रीय साखर कारखाना महासंघ, नवी दिल्ली या संस्थेने ऊस विकासाकरिता उच्च साखर उतारा विभागातून सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना राष्ट्रीय कार्यक्षमता तृतीय पुरस्काराने मंगळवार दिनांक २२/०९/२०२६ रोजी नवी दिल्ली येथे सन्मानित केले.
सदर पुरस्कार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नामदार नितीन गडकरी, महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील, गुजरात राज्याचे सहकार मंत्री नामदार गुरजर, हरियाणा राज्याचे मंत्री डॉ.अरविंद कुमार शर्मा, राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते कारखान्याच्या संचालिका कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील, कु.इशिता धैर्यशील मोहिते-पाटील, व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख, संचालक नानासाहेब मुंडफणे, विजयकुमार पवार, संचालिका सौ.सुजाता शिंदे, कार्यकारी संचालक सुहास यादव व मुख्य शेतकी अधिकारी रविराज चव्हाण यांनी पुरस्कार स्वीकारला.
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची वाटचाल प्रगतीपथावर असून सदर पुरस्काराने कारखान्याच्या नावलौकिकात भर पडली आहे, कारखान्याचे संचालक मंडळ, सभासद व कामगार यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

0 टिप्पण्या