🎯 ॲलर्जी म्हणजे काय ?

 🎯 ॲलर्जी म्हणजे काय ?

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 22/9/2026 :

लाखो वर्षांच्या उत्क्रांतीत माणसाला निसर्गाकडून एक मोलाचं वरदान मिळालं रोगप्रतिकारक शक्ती, आपल्या श्वासोच्छवासाद्वारे किंवा जखमेद्वारे काही जिवाणू, विषाणू आपल्या शरीरात शिरू शकतात. हे शरीराबाहेरचे असल्यामुळे शरीर त्यांना शत्रू समजतं. यानंतर आपली रोगप्रतिकारक यंत्रणा खडबडून जागी होते आणि अँटीबॉडीज् (प्रतिपिंड) नावाची प्रथिनं तयार करते. या अँटीबॉडीज् शरीरात शिरलेला शत्रू ओळखतात आणि त्याला नाहीसा करण्याचा प्रयत्न करतात.

कधीकधी शरीराला अपाय करणार नाहीत असे फुलांमधले परागकण, प्राण्यांच्या किंवा पक्ष्यांच्या विष्ठेतले कण, बुरशी, हवेत मिसळलेल्या एखाद्या रसायनाचा सूक्ष्म थेंब असे निरुपद्रवी घटक शरीरात घुसले तर अँटीबॉडीज त्यांनाही शत्रू समजतात आणि ते घटक शरीराबाहेर टाकण्याचे प्रयत्न सुरू होतात. यावेळी आपली रोगप्रतिकारक यंत्रणा नेहमीपेक्षा तीव्र प्रतिसाद देते. अंगावर पुरळ उठणं, सतत शिंका येणं, सर्दी होणं, नाक वाहणं अशी लक्षणं दिसू लागतात. यालाच आपण ॲलर्जी असं म्हणतो.

माणसांना अगदी पुरातन काळापासून ॲलर्जीचा त्रास होत आला आहे; पण ॲलर्जी ही नक्की काय, याचा शोध योगायोगानं १९०६ साली ऑस्ट्रयन डॉक्टर डॉ. क्लेमेन्स यांना लागला. त्या काळात देवीची साथ आली की, लस न घेतलेल्या माणसांना लस देऊन त्याचा परिणाम होण्याइतका वेळ नसल्यामुळे घोड्याच्या शरीरात, अर्धमृत असे देवीचे विषाणू टोचून, त्या घोड्याच्या रक्तातून तयार केलेल्या सिरमचं इंजेक्शन दिलं जायचं. या सिरममध्ये देवीच्या विषाणूंशी मुकाबला करू शकतील अशा अँटीबॉडीज असल्यामुळे माणसांना देवीचा रोग होणार नाही, अशी अपेक्षा असायची.

डॉ. क्लेमेन्स यांच्या असं लक्षात आलं की, काही लोक डोस दिल्यावर बरे असतात, पण काही लोक मात्र खूप आजारी होतात. त्यावरून डॉ. क्लेमेन्सनी असा निष्कर्ष काढला की घोड्याच्या सिरममधून त्या माणसांच्या शरीरात असं काहीतरी गेलं की त्याला त्यांचं शरीर शत्रू समजलं, म्हणून ही माणसं आजारी पडली. त्या काहीतरीला त्यांनी ॲलर्जेन असं नाव दिलं. ॲलर्जेन म्हणजे ज्याची आपल्याला ॲलर्जी असते तो घटक. सगळ्या माणसांना एकाच प्रकारच्या ॲलर्जेनची ॲलर्जी येत नाही. ॲलर्जेनचा प्रकार माणसागणिक बदलतो आणि प्रत्येकाचा प्रतिसादही वेगळा असतो.

शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे गेल्या ५०-६० वर्षांत प्रदूषण खूप वाढलं आहे. हवेतून, अन्नातून, पाण्यातून अनेक नवे घटक आपल्या शरीरात जातात, जे आपल्या सवयीचे नसतात. त्यामुळेच हल्ली ॲलर्जीचा त्रास वाढला आहे. अँटी ॲलर्जिक औषधं घेऊन तो कमी करता येतो. असं असलं तरीही, प्रदूषणमुक्त नैसर्गिक वातावरणात राहणं हाच ॲलर्जीपासून वाचण्याचा सोपा उपाय आहे.

✍️ लेखक : डॉ.माधवी ठाकूरदेसाई,

➖➖➖➖➖➖➖➖➖

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या