महर्षि शंकरराव मोहिते प्रशालेत शालेय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

महर्षि शंकरराव मोहिते प्रशालेत  शालेय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 30/9/2026 :

प्रश्नातून जन्म घेते जिज्ञासा, जिज्ञासेतून उमलते कल्पना आणि कल्पनेतून साकारते विज्ञानाची नवी दिशा या विचाराला साक्षात् मूर्त रूप देत शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला, यशवंतनगर येथे शालेय विज्ञान प्रदर्शन 2026-27 अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाले.

कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी सूर्यकांत गोडसे (चिफ इंजिनिअर, सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी कारखाना मर्यादित शंकरनगर), परीक्षक सुधीर नाचणे (सेवानिवृत्त केंद्रप्रमुख), डॉक्टर अमोल बंडगर (प्राध्यापक चंद्रशेखर आगाशे महाविद्यालय श्रीपूर)  हे उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांचे स्वागत महर्षि बालवाद्य वृंदातील बालचमूंमार्फत स्वागत गीताने करण्यात आले.

 विज्ञान म्हणजे केवळ प्रयोगशाळेतील काचेच्या नळ्यांमध्ये बंदिस्त असलेले ज्ञान नव्हे, तर आपल्या अवतीभोवतीच्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक समस्येत आणि प्रत्येक प्रश्नात दडलेले उत्तर शोधण्याची दृष्टी, हे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून अधोरेखित केले. प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील व रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. प्रमुख मान्यवरांचा सत्कार समारंभ व्यासपीठावर संपन्न झाला. महर्षि शंकरराव मोहिते प्रशालेच्या खेळाडूंनी कुस्ती जुदो व बुद्धिबळ स्पर्धेत गरुड झेप घेतली असून सात विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

सोलापूर येथे झालेल्या विविध शालेय जिल्हास्तर क्रीडा स्पर्धेत विशेष यश संपादन केलेले खेळाडू सार्थक राऊत, वैष्णव देशमुख, विजय कांबळे, मयुरी काळे, शुभम जाधव, ओंकार नवसुपे, अभिजीत करे, शंभुराजे कारमकर,  क्रीडा मार्गदर्शक प्रदीप पांढरे यांचा सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाला.

     विद्यार्थ्यांनी साकारलेली तब्बल 200 वैज्ञानिक उपकरणे, प्रतिकृती व प्रयोग प्रदर्शनात होते. विद्यार्थ्यांच्या कल्पक हातांनी आकार घेतलेल्या  प्रयोगांमध्ये दैनंदिन जीवनातील विज्ञान, पर्यावरण संवर्धन, जलव्यवस्थापन, ऊर्जा बचत, शेती, आरोग्य, स्वच्छता, तंत्रज्ञान, पर्यायी ऊर्जा अशा विविध विषयांचा सुरेख आविष्कार पाहायला मिळाला. विज्ञान प्रदर्शनासाठी यशवंतनगर केंद्राचे केंद्रप्रमुख हुसेन बारसकर यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना भावी शास्त्रज्ञ बनण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

    आजचा जिज्ञासू विद्यार्थीच उद्याचा संशोधक घडवतो या विश्वासाची प्रचिती देणारे हे विज्ञान प्रदर्शन महर्षि शंकरराव मोहिते प्रशालेच्या शैक्षणिक वाटचालीतील एक संस्मरणीय पर्व ठरले असे मत केंद्रप्रमुख हुसेन बारसकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक असिफ झारेकरी, पर्यवेक्षक उमेश बोरावके, शिक्षक प्रतिनिधी राजाराम काळे, शिक्षिका प्रतिनिधी भाग्यश्री उरवणे व सर्व शिक्षक उपस्थित होते.

     विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठीविभाग प्रमुख रुक्साना नदाफ,स्नेहल एकतपुरे ,रूपाली दुरापे, सुनंदा वजाळे, सुनिता शिंदे, सर्व विज्ञान विषय शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाझिया मुल्ला यांनी केले तर आभार रुक्साना नदाफ यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या