बघताबघता श्रावण संपलाही

 बघताबघता श्रावण संपलाही 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 12/9/2026 :

 गुरुवारी बैलपोळा आणि काल शुक्रवारी तान्हापोळा होता. काळ खूप लौकर बदललाय. पूर्वी रस्त्यावर पोळ्याच्या दिवशी सजवलेल्या बैलजोड्या जास्त आणि माणसे कमी असं दृश्य असायचं. रस्त्याने जाताना बैलांना वाट देताना भीती वाटायची. आता बैलांची संख्या कमी आणि माणसे जास्त त्यामुळे पोळ्याच्या दिवशी रस्त्याने जाताना बैल बुजाडतात. असो कालाय तस्मै नमः. 

    आता वेध गौरीगणपतींचे. जरा थोडसं नापिकी, पाऊस कमी झालाय, पिकांची काळजीजन्य स्थिती ह्याच सावट ह्यावर्षीच्या पोळ्यावर आलंय खरं.          

       प्रचंड महागाई वाढलीय. एकुणच सगळीच अर्थव्यवस्था डळमळीत झालेली आहे.भारत कृषीप्रधान देश असल्याने आपली जवळपास बरीचशी मदार ही शेती, पीकपाणी ह्यावर अवलंबून असते. आता आर्थिक डोलारा सावरायचा तर नुसती वरवर डागडुजी करुन काही उपयोग नाही. वरवरच्या डागडुजी ने काही काळ संकट टळल्यासारखं वाटेल पण वास्तविक पाहता ते संकट टळणार तर अजिबातच नाही जास्त काय तर ते फार फार तर ते संकट येणं लांबेल. 

    तेव्हा मुळात आमूलाग्र बदलाची, विकासाची सुरवात खरतरं आधी शेतीपासूनच करायला हवी. शेती पिकली तर आर्थिक संकट टळून नक्कीच नवीन प्रगतीची दिशा गवसेल, मार्ग सापडेल. आणि त्यामुळेच देशाला खऱ्या अर्थाने ऊर्जितावस्था येईल. तोवर मनाला अच्छे दिन आले आहेत असेच समजवायचे.         

      परवा पोळा झाला आणि काल तान्हापोळा. ग्रामीण भागातील त्यातल्या त्यात विदर्भातील गामीण भागातील खूप महत्त्वाचा सण. जणू खेडोपाड्यातील मिनी दिवाळीच समजा. हा पोळ्याचा उत्सव साधारण अडीच दिवस चालतो. मुख्य दिवस म्हणजे पोळ्याचा दिवस, त्याच्या आधीचा अर्धा दिवस खानमळणी आणि पोळ्याच्या नंतरचा दिवस म्हणजे बच्चेकंपनीचा पोळा, तान्हापोळा.            

   पोळ्याची खरी मजा बघायची असेल, त्याचा खराखुरा आनंद लुटायचा असेल तर हा सण एखाद्या खेड्यावर जाऊन बघायला हवा. शहरात फक्त मिरवणूक निघाल्यासारख्या सजलेल्या बैलांच्या दोन तीन जोड्या आणि बाजारपेठा फुलतात.       

      खेड्यावर आधल्या दिवशी दुपारपासूनच पोळ्याचे वेध लागतात. आधल्या दिवशी बैलांना "आवतन" म्हणजेच आमंत्रण दिलं जातं. बैलांच्या खाद्यांना लोणी लावून, अगत्याने प्रेमाने त्याची मालीश करतात. कारण पूर्ण वर्षभर हेच बैल आपली सेवा करुन शेतीत राबराब राबतात. ह्या दिवसालाच "खानमळणी" म्हणतात. खानमळणी च्या दिवशी वाफवलेले कणीक वा ज्वारीच्या पिळाची फळे, साधवरण, तूप आणि तांबड्या भोपळ्याची ज्याला विदर्भात "कोहळं"म्हणतात त्याची मस्त चमचमीत तिखट बाकरभाजी असा फक्कड बेत जेवायला असतो.  

  दुसऱ्या दिवशी म्हणजे प्रत्यक्ष पोळ्याच्या दिवशी बैलांना पूर्णपणे विश्रांती दिली जाते. त्यांना कोणत्याही कामास जुंपले जात नाही. बैलांना सकाळी मस्त गावातील पाणवठ्यावर नेऊन स्वच्छ आंघोळ घालतात. वर्षभर खूप प्रेमाने, कष्टाने सेवा देणा-या बैलांना मालक स्वतःच्या हातांनी मालीश करुन न्हाऊमाखू घालतो.   

  नंतर प्रत्येक शेतकरी आपल्या आर्थिक कुवतीनुसार आणि स्वभावातील हौशीनुसार बैलांना सजवितात. त्यांना रंगविणे, बाशिंग बांधणे, झूल पांघरणे ह्या सजावटीत घरातील पुरुष आणि बच्चेकंपनी मनापासून लागतात. घरचा महिलावर्ग ह्या दिवशी घरकाम आणि स्वयंपाक ह्यात खूप गर्क असतो. सगळ्या पक्वान्नाचा राजा, अगदी अस्सल खानदानी वाटावा असा गोड पदार्थ म्हणजे पूरण. म्हणून घरोघरी पूरणपोळी केल्या जाते. गरीबातल्या गरीब घरीही खेड्यावर आजच्या दिवशी पुरणपोळीचाच बेत असतो.      

  बैलांना पुरणपोळी, भजी, क्षार, कुरडया पापड्या असा सगळा साग्रसंगीत नैवद्य असतो. बैलाने घास घेतल्याखेरीज घरची कुठलीही व्यक्ती अन्नग्रहण करीत नाही. संध्याकाळी गावातील सगळ्या बैलांना सजवून गावठाणातील चौकात एकत्र आणले जाते. ह्यालाच "पोळा भरणं"असं म्हंटल्या जातं. बैलांच्या सजावटीला गृहीत धरून गावातील बैलांमधून उत्कृष्ट बैलजोडी निवडल्या जाते. त्यांना पारितोषिक दिल्या जातं. उत्कृष्ट बैलजोडीचा निकष म्हणून त्यांची तब्येत सजावट ह्या गोष्टी ग्राह्य धरल्या जातात. त्याच मैदानावर छोट्या बालगोपालांसाठी खेळण्यांची दुकाने पण सजतात.    

      पोळ्यानंतरचा दुसरा दिवस "तान्हापोळा". ह्या दिवशी घराघरातील बालगोपाल आपापली मातीची वा लाकडी बैलजोडीच्या मूर्ती सजवितात. त्यांना पूजेसाठी व दर्शनासाठी घरोघरी नेतात. वडीलमंडळी त्यांना कौतुकाने खाऊसाठी पैसे देतात.      

      भावनिकदृष्ट्या शेतक-यांसाठी हा सण खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे आमची स्वतःची शेती असल्याकारणाने ह्या सणाबद्दल अजूनही तेवढीच आत्मियता वाटते.आणि हा सण साजरा करतांना शेतकरी असल्याचा अभिमान पण वाटतो.

       शेवटी "वावर है तो पाँवर है" आणि हे वावर सुजलाम सुफलाम पिकतील तेव्हाच देशाची पॉवर वाढेल हे मात्र खरं.

कल्याणी बापट (केळकर)                                  9604947256 

बडनेरा, अमरावती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या