दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासकीय जमिनीवर चारा पिकांची लागवड करा; खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासकीय जमिनीवर चारा पिकांची लागवड करा; खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 30/9/2026 :

महाराष्ट्र राज्याच्या अनेक भागांमध्ये अपुरा व खंडित पाऊस झाल्याने शेती व पशुधनावर गंभीर परिणाम होत असून, सद्यस्थितीचा विचार करता आगामी काळात चारा व पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालकांसाठी पशुधन हा त्यांच्या उपजीविकेचा महत्त्वाचा आधार असल्याने, दुष्काळाच्या परिस्थितीत पशुधनाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी शासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी मागणी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

शेती महामंडळ, वन विभाग तसेच शासनाच्या ताब्यात असणाऱ्या विविध जमिनी उपलब्ध असून, राज्यातील मोठ्या देवस्थानांकडे असणाऱ्या जमिनीचा योग्य वापर करून चारा पिकांची लागवड केल्यास पशुपालकांना मोठा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे उपलब्ध शासकीय तसेच निमशासकीय आणि देवस्थानांच्या जमिनीची पाहणी करून योग्य जमिनीवर चारा पिकांची लागवड करण्याची कार्यवाही तातडीने हाती घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तसेच, दुष्काळाच्या कालावधीत शेळी, मेंढी, गाय, म्हैस व इतर पशुधनासाठी शासनाच्या ताब्यातील योग्य व उपलब्ध जमिनीवर नियंत्रित पद्धतीने चारा चरण्यासाठी परवानगी देण्यात यावी. यामुळे पशुपालकांना त्यांच्या पशुधनासाठी आवश्यक चारा उपलब्ध होऊन पशुधनाचे संरक्षण करण्यास मदत होईल.शासनाकडे उपलब्ध असलेल्या अधिकृत पशुधन गणनेच्या आकडेवारीनुसार प्रत्येक गावनिहाय/तालुकानिहाय पशुधनाची संख्या निश्चित करून, प्रति जनावर आवश्यक असलेला चारा व पाण्यासाठी पशुपालकांना थेट आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात यावे. सदर आर्थिक सहाय्य पात्र पशुपालक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने जमा करण्यात यावे.

तसेच, दुष्काळाच्या परिस्थितीत दूध उत्पादक शेतकरी व पशुपालकांना आर्थिक स्थैर्य मिळावे आणि पशुधनाची विक्री करण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये, यासाठी दूध उत्पादकांना प्रतिलिटर दूध उत्पादनावर विशेष अनुदान देण्याबाबतही शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा. यापूर्वी ज्या पद्धतीने दूध उत्पादकांना प्रतिलिटर रु. ५/- अनुदान देण्यात आले होते, त्याच धर्तीवर सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करून पात्र दूध उत्पादकांना प्रतिलिटर रु. ५/- अनुदानाची योजना तातडीने लागू करण्यात यावी. सदर अनुदानाची रक्कम पात्र दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर DBT पद्धतीने जमा करण्याची कार्यवाही करण्यात यावी.

दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हातातील पशुधन टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चारा व पाण्याअभावी पशुधनाची विक्री करण्याची वेळ पशुपालकांवर येऊ नये, तसेच दूध उत्पादन घट होऊन त्यांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी शासनाने तातडीने व प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

तरी, संपूर्ण राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून शासनाच्या ताब्यातील उपलब्ध जमिनीचा चारा उत्पादनासाठी वापर, पशुधनासाठी नियंत्रित चराईची सुविधा उपलब्ध करून देणे, पशुधनाच्या संख्येनुसार चारा व पाण्यासाठी थेट आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे आणि पूर्वीप्रमाणे पात्र दूध उत्पादकांना प्रतिलिटर रु. ५/- दूध अनुदान देणे, याबाबत तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित विभागांना द्यावेत, अशी मागणी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या