विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 23/9/2026 :
कर्मवीर भाऊराव पाटील यांना विनम्र अभिवादन!
आज २२ सप्टेंबर! थोर शिक्षणतज्ज्ञ, द्रष्टे समाजसुधारक कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती! २२ सप्टेंबर १८८७ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी त्यांचा जन्म झाला. अंधश्रद्ध आणि अज्ञानी समाजाला ज्ञानी व स्वाभिमानी बनवण्यासाठी शिक्षणाची खरी गरज आहे, हे त्यांनी ओळखले.
इ.स. १९१९ मध्ये त्यांनी बहुजन समाजासाठी पहिली शाळा सुरू केली आणि ऐतिहासिक रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची उत्तम सोय केली. गोरगरिबांची मुले शिकून शहाणी व्हावीत व सामाजिक परिस्थितीत सकारात्मक बदल घडावा, यासाठी त्यांनी आयुष्य वेचले.
मुलांनो, 'कमवा आणि शिका' या क्रांतिकारी योजनेद्वारे असंख्य गरीब मुले उच्च शिक्षण घेऊन मोठी झाली आणि त्यांनी या संस्थेचा वटवृक्ष आणखी विस्तारला. भाऊरावांना सर्व जण आदराने 'आण्णा' म्हणत असत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आण्णांचे हे अलौकिक कार्य पाहून त्यांना 'कर्मवीर' ही सार्थ पदवी बहाल केली.
९ मे १९५९ रोजी कर्मवीर आण्णांचे देहावसान झाले आणि 'स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद' असा मूलमंत्र देणारी रयत शिक्षण संस्था पोरकी झाली.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या