अदृश्य' महिला शास्त्रज्ञा.. डॉ. शुभा व्यंकटेश अय्यंगार !

 

अदृश्य' महिला शास्त्रज्ञा.. डॉ. शुभा व्यंकटेश अय्यंगार !

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 20/9/2026

समजा, विमानतळावर दाट धुक्याचं साम्राज्य पसरलं आहे, रनवेचा एक कोपराही डोळ्यांना दिसत नाही, पण कॉकपिट मध्ये बसलेल्या वैमानिकाच्या स्क्रीनवर अचूक माहिती संख्येच्या माध्यमातून चमकते आणि  हजारो टन वजनाचं विमान सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरतं. अशा प्रत्येक लँडिंगच्या मागे ४६ वर्षांची तपश्चर्या आणि एका भारतीय महिलेची जिद्द उभी असते.

त्या वैमानिकाला रस्ता दाखवणारी ती दृष्टी डॉ. शुभा व्यंकटेश अय्यंगार यांनी तयार केली होती. नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज (NAL) मध्ये १९७४ साली रुजू झालेल्या या शास्त्रज्ञाने भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राचा चेहरामोहरा बदलून टाकला.

२०११ पर्यंत भारताला विमानतळांवरील दृश्यमानता मोजणारी उपकरणं परदेशातून आयात करावी लागत होती. ही यंत्रं प्रचंड महागडी होती आणि त्यांची देखभाल करणं हा एक मोठा आर्थिक भार होता. डॉ. अय्यंगार यांनी आपल्या टीमसह 'दृष्टी' नावाचं स्वदेशी ट्रान्समिसोमीटर विकसित केलं, म्हणजे प्रकाशाला 'दूत' बनवून हवा किंवा पाण्याची पारदर्शकता मोजणारे उपकरण. याचा वापर विमानतळांवर धुक्यामुळे दृश्यमानता (visibility) किती आहे हे मोजण्यासाठी केला जातो. आज हेच उपकरण भारताच्या सर्व प्रमुख विमानतळांवर तैनात आहे. यामागचं कारण केवळ तांत्रिक नाही, तर आर्थिकही आहे. या स्वदेशी तंत्रज्ञानामुळे भारताचे कोट्यवधी रुपये वाचले आहेत.

डॉ. शुभा व्यंकटेश अय्यंगार यांच्या अभ्यासाची कमाल केवळ विमानतळापुरती मर्यादित नाही. भारताच्या अण्वस्त्रवाहू 'अग्नी' क्षेपणास्त्रात एकदा एक गंभीर तांत्रिक अडथळा निर्माण झाला. क्षेपणास्त्र हे देशाच्या संरक्षणाचे कवच असते, त्यामुळे तिथे चूक व्हायला वाव नव्हता. डॉ. अय्यंगार यांनी या समस्येवर तोडगा काढला आणि अग्नी क्षेपणास्त्राला अधिक अचूक बनवलं.

त्यांच्या नावावर ९० वैज्ञानिक शोधनिबंध आहेत. विशेष म्हणजे त्यातील तीन शोधनिबंध थेट अमेरिकेच्या नासा (NASA) ने प्रसिद्ध केले आहेत. जागतिक स्तरावर भारतीय बुद्धिमत्तेचा हा डंका त्यांनी शांतपणे वाजवला. तरीही डॉ. अय्यंगार यांच्याकडे ना इन्स्टाग्राम अकाउंट आहे, ना लिंकडइनवर हजारो फॉलोअर्स.

त्या कोणत्याही स्टार्टअपच्या फाऊंडर नाहीत किंवा अब्जाधीश उद्योजिका नाहीत. त्या फक्त एक कर्तव्यनिष्ठ भारतीय महिला आहेत, ज्यांनी पडद्यामागे राहून देशाला स्वावलंबी बनवलं. त्यांच्या या ४६ वर्षांच्या सेवेची दखल घेत केंद्र सरकारने २०२६ मध्ये त्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित केलं.

आज जेव्हा तुम्ही धुक्यातून प्रवास करताना विमानाने सुरक्षित लँडिंग करता, तेव्हा लक्षात ठेवा की कुणीतरी 'अदृश्य' महिला शास्त्रज्ञ तुमच्यासाठी काम करते आहे. प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहून देशाची सुरक्षा आणि प्रगती साधणाऱ्या अशा शास्त्रज्ञांना आपण किती ओळखतो?

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

©️ बोभाटा ━═━═━═━═━═━═━═━═━═━═

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या