🔰लेकीच्या शिक्षणासाठी रमाबाई रणवीर अनवानी पायाने धावल्या; माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला, 🟪 बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडूनही ५० हजारांचा धनादेश सुपूर्द; मदतीचा ओघही वाढला

🔰लेकीच्या शिक्षणासाठी रमाबाई रणवीर अनवानी पायाने धावल्या; माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला, 

🟪 बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडूनही ५० हजारांचा धनादेश सुपूर्द; मदतीचा ओघही वाढला

वृत्त एक सत्ता न्यूज

बीड / प्रतिनिधी : अंगावर साधी साडी, पायात तुटकी स्लीपर आणि डोळ्यांत मुलीच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने… अशा बिकट परिस्थितीत ४७ वर्षीय रमाबाई रणवीर यांनी बीडमधील धावण्याची स्पर्धा जिंकून नवा इतिहास रचला.

तरण्याबांड धावपटूंना मागे टाकत रमाबाईंनी आपल्या लेकीच्या शिक्षणासाठी जिद्दीने प्रथम क्रमांक पटकावला. एका आईच्या या अथांग संघर्षाची कहाणी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी स्वतः ही स्टोरी शेअर केल्यानंतर रमाबाई रातोरात प्रकाशझोतात आल्या. रमाबाईंचा हा प्रेरणादायी लढा समोर येताच संपूर्ण देशातून त्यांच्यावर कौतुकाचा आणि मदतीचा वर्षाव सुरू झाला. थेट क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने त्यांच्या पायाच्या बुटाची साईज विचारून त्यांना दर्जेदार रनिंग शूज पाठवण्याचा निर्णय घेतला. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ भेट घेत रमाबाईंना ५० हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. आधी बँक खातेही नसलेल्या रमाबाईंचे तातडीने खाते उघडण्यात आले आणि अवघ्या आठवडाभरात देशभरातील दानशूर नागरिकांनी त्यांच्या खात्यात दीड लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा केली.

रमाबाई या इतरांच्या घरी धुणीभांडी आणि घरकाम करून महिन्याला अवघे ९ हजार रुपये कमावत होत्या. त्या तुटपुंज्या उत्पन्नात दोन मुलींचे शिक्षण आणि कुटुंबाचा गाडा हाकणे त्यांच्यासाठी तारेवरची कसरत ठरत होते. मात्र, परिस्थितीसमोर हात न टेकता त्यांनी थेट मॅरेथॉनच्या मैदानात उडी घेतली. एका गरीब आईच्या या अफाट धैर्याचे आता संपूर्ण महाराष्ट्रातून आणि विविध सामाजिक संस्थांकडून कौतुक केले जात आहे. आपल्या भावना व्यक्त करताना रमाबाई म्हणाल्या,    

  *“माझी धाकटी मुलगी आरती अभ्यासात खूप हुशार आहे. ती गेल्या दोन आठवड्यांपासून एमपीएससीच्या पुस्तकांसाठी हट्ट करत होती. पुस्तकांचे ३२०० रुपये जमवता न आल्याने ती आठ दिवस माझ्याशी बोलली नाही. मी पूर्णपणे हताश झाले होते. रविवारी ३ किलोमीटर धावण्याची स्पर्धा असून ३००० रुपयांचे बक्षीस आहे, हे कळताच मी नाव नोंदवले. फक्त पोरीची पुस्तके आणायची या एकाच विचाराने मी जिवाच्या आकांताने धावले*- *रमाबाई रणवीर*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या