जीने में भी तोबा और मरने में भी तोबा !
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 13/9/2026 :
संसारी माणसाने दुनियेचे हात सोडून सद्गुरूचे हात पकडावे. कारण तिथे जगण्यात ही समाधान आणि मरण्यात ही समाधान लाभते. "मरना हक्क का बाना है, जीना उधार आना है" आपलं मरण हे हक्काच आहे ते कोणीही हिरावून घेत नाही. जगणं हे उधारीचं आहे. उधार म्हणजे उसने घेतलेलं. या उधारीच्या वस्तूवर आपला हक्क नसतो. मालक जेव्हा परत मागेल तेव्हा ते द्यावे लागते. कसेही जीवन जगले तरी लोक आपल्याला पागल ठरवितात. या दुनियेत जगणंच कठीण झालं आहे. तुम्ही देवाकडे जा, संसाराचा मार्ग धरा, इमानदारीने वागा तरी लोकं तुम्हाला जगूच देत नाही, नाव ठेवतील. लोक काय म्हणतील याचा विचार करु नका. या दुनियेचा न्यायचं उलटा आहे. अशा दुनियेत माणसाने जगायचं कसं? श्रीमंतांना शिव्या, गरीबांना शिव्या, निर्भयाला शिरजोर, सरळाला अडाणी म्हणतात. चारित्र्यवान स्रीला वेडी म्हणायला लोकं मागेपुढे पाहत नाही. मायेतून बाहेर या. लोक काय म्हणतील याचा विचार सोडून द्या. तीर्थ, काबा बाहेर नाही तर मन स्वच्छ करण्यात आहे. मन स्वच्छ झालं की सगळीकडे तीर्थ आहे. "मन की तरंग मारले, बस हो गया भजन | आदत बुरी सुधारले बस हो गया भजन |" समुद्रात जशा लाटा येतात तशा मनात सारख्या लाटा येतात. या तरंगांना थांबवणं, मारणं हेच खरं भजन आहे. एक वाईट सवय सुधारली की समजा तुमचं मोठं भजन झालं.
कहाँ हाथ पकडोंगे, दुनिया का बाबा |
जीने में भी तोबा और मरने में भी तोबा ||धृ||
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, अरे संसारी माणसा ! तू कोणाकोणाचा हात धरशील? येथे जगणं ही अवघड आहे आणि मरणं ही अवघड आहे. दुनिया का बाबा म्हणजे संसारी माणूस, जो फक्त दुनिया, पैसा, नाती यांच्याच मागे लागलेला असतो. उदा- एखादा माणूस नोकरीसाठी साहेबाचे पाय धरतो, साहेब गेला की दुसऱ्या साहेबाकडे जातो. कधी मुलाचा आधार, कधी पत्नीचा आधार घेतो पण हा आधार कायमचा नसतो. आज जे आहे ते उद्या नाही. मग किती जणांचे हात धरत फिरणार? "संत सांगती ते ऐकत नाही, दुर्जनाचे ऐकतो" सगळ्यांचे हात धरण्यापेक्षा एका देवाचे, संताचे, सत्पुरुषाचे हात धर. म्हणजे सगळे प्रश्न सुटतील. जीवनापेक्षा मरणं तर त्याहून अवघड. जगतांना तर त्रास होताच पण मरताना काय घेऊन जाणार? मुलांची चिंता, पैशाची चिंता, पाप-पुण्याची भिती. मरताना सुद्धा शांतता नाही. उदा- सकाळी उठल्यापासून तोबा सुरु होते. दुध आलं नाही, लाईट गेला, मुलगा ऐकत नाही. रोजचं जगणंच एक तोबा आहे. श्रीमंत माणूस मरताना सुद्धा विचार करतो की, माझ्या जमिनीचे काय होणार, माझ्या पैशाचे काय होणार?
जरा कुछ भी बोलो तो, पागल कहेंगे |
कुछ ना करो तो भी, लूटे चलेंगे |
दोनो तरफ से भी, होती है शोभा ||
जीने में भी तोबा, मरने मे, भी तोबा ||1||
राष्ट्रसंत संसारी माणसाची अडचण सांगत आहेत की तो "इकडे आड तिकडे विहीर" अशा अवस्थेत तू अडकलेला आहेस. या दुनियेत तुम्ही खरं बोलायला गेलात, चांगल ज्ञान सांगायला गेलात तर लोक तुम्हाला वेडा ठरवतात. संत तुकाराम, संत कबिर यांनी लोकांना सत्य सांगितलं म्हणून लोकांनी त्यांना वेडा म्हटल, नको तो त्रास दिला. जर तुम्ही काहीच बोलले नाही, गप्प बसाल तर ही दुनिया तुम्हाला लुटून खाईल. तुमच्या साधेपणाचा फायदा घेईल. तुम्ही दुकानात गेले तेथे काहीच बोलले नाही, वस्तूचा भाव केला नाही तर दुकानदार तुम्हाला लुटतो. बोललो नाही तरी पंचाईत आणि बोललो तरी पंचाईत. दोन्ही बाजूंनी आपलीच शोभा होते. म्हणजे आपलीच बदनामी, आपलचं नुकसान होत.
पहनी हो माला तो, बोलेंगे ढोंगी |
खाली रहो तो वो, होता है भोगी |
सच्चे रहो तो वो, कर देंगे लंबा ||
जीने में भी तोबा, मरनेमें भी तोबा ||2||
तुम्ही देवाचं नाव घ्यायला लागलात, गळ्यात माळ घातली, टिळा लावला, भजन करायला लागला तर ही दुनिया तुम्हाला ढोंगी म्हणेल. उदा- एखादा तरुण गळ्यात तुळशीची माळ घालून मंदिरात जाऊ लागला तर त्याचे मित्र म्हणतात, "काय रे, फार मोठा साधू झाला का?" जर तुम्ही माळ नाही घातली, देवाचं काहीच केलं नाही, संसारातच राहिला तर लोक म्हणतील, हा तर भोगी आहे, त्याला देवधर्म काहीच नाही. जर तुम्ही खरं खरं, सत्याने वागायला गेलात, खरं बोलायला गेलात तर ही सारी दुनिया तुम्हाला आपल्यापासून लांब करेल, आपणास एकटं पाडेल. कारण खरा माणूस खोट्या लोकांना नको असतं.
गाडी को जाता, चलती को गाडी |
निर्भय को शिरजोर, सीदा अनाडी |
सतियों को पागल, जारण को रंभा ||
जीने में भी तोबा, मरनेमें भी तोबा ||3||
राष्ट्रसंत म्हणतात, ज्याच्याकडे पैसा आहे, गाडी बंगला आहे, श्रीमंत आहे त्याला लोक मागून शिव्या देतात. एखादा श्रीमंत माणूस गाडीतून गेला तर लोक जळून म्हणतात, "बघा किती माज आलाय" आणि गरीब पायी चालत असेल तर म्हणतात, "अरे हो बाजूला" या दुनियेत श्रीमंताला आणि गरीबाला सुख नाही. दुनिया शिव्याच देतात. जो माणूस कोणाला घाबरत नाही, सत्यासाठी सदैव उभा राहतो त्यालाही दुनिया शिरजोर म्हणते आणि जो सरळ, साधा, भोळाभाबडा कोणाच्या भानगडीत पडत नाही त्याला अडाणी, वेडा म्हणतात. जी स्त्री सती आहे, चारित्र्यवान आहे, नवऱ्यावर प्रेम करणारी आहे तिला लोक वेडी म्हणतील. "हिला काय कळतं?" आणि जी स्त्री वाईट मार्गावर आहे, जारण व्यभिचारी आहे तिला लोक रंभा, अप्सरा, माँडर्न म्हणतील. उदा- जी स्त्री साधे कपडे नेसून घर सांभाळते तिला लोक जुन्या विचाराची वेडी म्हणतात आणि जी बाहेर भडक मेकअप करून, वाईट वागते तिचं लोक कौतुक करतात. एका अर्थी या दुनियेत चांगल्या चारित्र्याची किंमतच राहिली नाही.
ऐसे जमाने को, किसने बनाया |
मुझको है लगता, यही पर है माया |
तुकड्या कहे उसको, तीरथ न काबा ||
जीने मे भी तोबा, मरनेमे भी तोबा ||4||
राष्ट्रसंत म्हणतात, हा उलटा जमाना कोणी बनवला? जिथे खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं म्हटलं जात. देवाने तर चांगली दुनिया बनवली होती. पण माणसाने ती अशी विचित्र करुन टाकली. लोभ, स्वार्थ, द्वेष आपल्यातच आहे ना. संत स्वतःच उत्तर देतात आणि म्हणतात, हीच माया आहे. हा सगळा भ्रम आहे. जे दिसत ते खरं नाही. लोकांच बोलण, निंदा, स्तुती ही सगळी मायाच आहे. उदा- सिनेमांत दिसत ते खरं नसतं. तो फक्त पडद्यावरचा प्रकाश असते, पण आपण त्याला खरं समजून रडतो, हसतो. ही दुनिया एक सिनेमा आहे. जसे- आरशात बघतो तेव्हा आपल्याला वाटतं. आरश्यात दुसरा माणूस आहे पण ते आपलच प्रतिबिंब आहे. तशीच ही दुनिया आहे. तीर्थ म्हणजे हिंदूचे पवित्र स्थान, काबा म्हणजे मुस्लिमांचे पवित्र स्थान. राष्ट्रसंत सर्व धर्मांना एकत्र करुन सांगतात, जो माणूस या मायेत, निंदा - स्तुतीत अडकून राहिला. लोकांचा विचार करीत नाही त्याला कोणतेही तीर्थ, कोणतेही यात्रा, कोणताही काबा पावन करु शकत नाही. उदा- एखादा माणूस लोकांना फसवतो, खोटं बोलतो आणि पंढरपूरची वारी करतो किंवा हजला जातो. तर देव त्याला पावन करेल का? मुळीच नाही. कारण त्याने मनातली, माया, स्वार्थ, द्वेष सोडलाच नाही. तो फक्त शरीराने तीर्थाला गेला पण मनाने नाही.
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त
श्री गुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन 9970404180


0 टिप्पण्या