चाकाचा शोध : मानवाच्या इतिहासातील एक क्रांतिकारी शोध

 

चाकाचा शोध : मानवाच्या इतिहासातील एक क्रांतिकारी शोध   

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 28/9/2026 :

मानवाच्या इतिहासातील सर्वांत क्रांतिकारी शोधांपैकी एक म्हणजे चाकाचा शोध. विशेष म्हणजे, इतिहासातील अनेक महत्त्वाच्या शोधांमागे निसर्गातून मिळालेली प्रेरणा दिसून येते. उदाहरणार्थ, आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांकडून प्रेरणा घेऊन मानवाने विमानाच्या संकल्पनेचा विकास केला. मात्र चाकाच्या बाबतीत परिस्थिती काहीशी वेगळी होती. चाकाप्रमाणे सतत फिरत राहणारी आणि वाहतुकीसाठी उपयोगी पडणारी कोणतीही नैसर्गिक वस्तू मानवासमोर प्रत्यक्ष नमुना म्हणून उपलब्ध नव्हती.

धोक्याच्या वेळी शरीर गोलाकार करून घरंगळणारे काही प्राणी किंवा कीटक ही त्याच्या जवळची नैसर्गिक उदाहरणे मानली जाऊ शकतात. पुरातत्त्वीय पुराव्यांनुसार, सुमारे ५५०० वर्षांपूर्वी मेसोपोटेमिया प्रदेशात चाकाचा वापर झाल्याचे पुरावे आढळतात. सुरुवातीला चाकाचा वापर वाहतुकी पेक्षा मातीची भांडी बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कुंभाराच्या चाकासाठी करण्यात आला असावा. मात्र चाकाचा शोध हा मानवाचा पहिलाच महत्त्वाचा शोध नव्हता. त्याआधीच मानवाने शेती, मातीची भांडी, सुई, शिवलेले कपडे, दोरी, होडी आणि बासरी यांसारख्या अनेक तंत्रांचा विकास केला होता.

चाकाच्या इतिहासात खरा आमूलाग्र बदल झाला तो त्याचा दळणवळणासाठी वापर सुरू झाल्यानंतर. चाकांना धुरा (axle) आणि त्यावर आधार देणाऱ्या रचनेशी जोडून मानवाने सुरुवातीच्या गाड्यांची निर्मिती केली. त्यामुळे जड वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे तुलनेने सोपे झाले आणि मानवी वाहतूक व व्यापाराच्या इतिहासाला नवी दिशा मिळाली.

सुरुवातीच्या काळात चाकाचा वापर प्रामुख्याने कुंभारकामासाठी होत होता, नंतर त्याचा वापर वाहतुकीसाठी होऊ लागला. प्राचीन मेसोपोटेमिया आणि युरेशियातील इतर प्रदेशात चाकांच्या वाहनांचे पुरावे आढळतात. चीन मध्येही प्राचीन काळापासून चाकांच्या वाहनांचा विकास झाल्याचे पुरावे आहेत. प्राचीन ग्रीस मध्येही चाकावर आधारित विविध उपकरणे आणि वाहने विकसित झाली. पुढे चाक, धुरा आणि वाहन रचनेतील सुधारणा होत गेल्या आणि त्यातून मानवी वाहतुकीत मोठी क्रांती घडली. ब्रोनोसाईस, पोलंड येथे सापडलेल्या प्राचीन मातीच्या भांड्यावर चाक आणि धुरावर आधारित वाहनाचे चित्र आढळते. हे चाकाच्या वापराच्या इतिहासातील महत्त्वाचे पुरातत्त्वीय पुराव्यांपैकी एक मानले जाते.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

संदर्भ : फेसबुक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या