तूच खरा मानवी घडे घडविणारा कुंभार
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 06/9/2026 :
लहान वयातच मुलांना प्रेमाचे तर कधी शिस्तीचे धोरण अवलंबून जबाबदार नागरिकांचे घडे घडवतो.आतून प्रेमाचा पण वरून शिस्तीचा कठोर हात थपडा मारण्यासाठी वापरून अतिशय संस्कारक्षम वयात स्वतःचे कसब वापरून सुंदर शिक्षण देतो.
किती महत्त्व असते आपल्या आयुष्यात शिक्षकांचे!!
प्रथम गुरु आई आणि वडील असतातच परंतु शिक्षकांची महती सर्वांनाच माहिती असते.
शाळेत तर आपण अतिशय संस्कारक्षम वयात जातो. अशावेळी शिक्षकांनी शिकवलेले शिक्षण आणि चांगले संस्कार आपले पुढील आयुष्यातील व्यक्तिमत्व घडवतात. मनापासून शिकवणारे शिक्षक मुलांच्या गळ्यातला ताईतच बनतात आणि त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट अगदी मनापासून आचरणात आणतात.
शाळेतून घरी आल्यावर *शाळा शाळा खेळणे* हा मुलांचा अतिशय आवडता खेळ सुरू हॊतो. यातच ते शाळेत काय शिकवले याची उजळणी करून घरातील वस्तूंना किंवा लोकांना शाळेतील शिकवण देत असतात.
थोडे मोठे झाल्यावर प्रत्येक शाळेमध्येच शिक्षक दिन 5 सप्टेंबरला साजरा करणे हे त्यांच्या आवडीचे काम बनते. त्या दिवशी नववीची मुले शिक्षकांप्रमाणे वेश परिधान करून आठवीपर्यंतच्या मुलांचे वर्ग घेतात. त्यासाठी स्वतः आधीपासून तयारी करून येतात आणि मग त्याप्रमाणे तासिका घेऊन मुलांना शिकविण्याचा प्रयत्न करतात. तसेच भाषण किंवा दोन शब्द शिक्षकांविषयी कृतज्ञता म्हणून बोलतात. शिक्षकांना छोट्या छोट्या वस्तू बक्षीस म्हणून स्वतः तर्फे देतात. दरवर्षी सर्व मुले या शिक्षक दिनाची वाटच पहात असतात. शिक्षकही आवडीने मुलांना याबद्दल मार्गदर्शन करतात. आठवी पर्यंतची मुलंही कोणी छान शिकवले याचे निरीक्षण करतात.
या उपक्रमामुळे पुढील आयुष्यात नुसते डॉक्टर इंजिनिअर न बनता प्रथीतयश शिक्षक बनावे असेही मुलांना वाटत राहते. जे आताच्या काळात खूप गरजेचे आहे.
माझी मुलगी ही शिक्षण घेत असताना कॉलेजमधील मोठ्या शिक्षकांनी 'तुम्हाला जसे चांगले प्रोफेसर मिळाल्यामुळे इंजिनीयर बनू शकला, तसेच तुमच्या पुढील विद्यार्थ्यांना असे चांगले शिक्षक मिळावे यासाठी शिक्षण क्षेत्रात या, असे आवाहन केले होते. ते मान्य करून माझी मुलगी आज एका प्रथीतयश कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे.
शिक्षकांचे शाळेत तसेच आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान असते. लहान मुलं आपल्या शिक्षकांना आदर्श मानून त्यांच्या शिकवणुकी प्रमाणे वागत असतात म्हणून त्यांचा मुलांच्या आयुष्यातील रोल अतिशय महत्त्वाचा ठरतो. अगदी नावडता विषयही एखाद्या शिक्षकाने उत्तम प्रकारे शिकवला तर सर्वांचे ते विषय आवडते होतात.
शिस्त, प्रसंगी कठोर वागून मुलांना चांगले वळण लावणे हे सर्व काम आई वडिलां इतकेच जबाबदारीने शिक्षक पार पाडत असतात. शिक्षक मुलांच्या आयुष्याचे शिल्पकारच असतात.
आज काल मुलांना मारणे, ओरडणे, शिक्षा करणे नियमात बसत नाही. त्यामुळे *छडी लागे छम छम विद्या येई घम घम* केव्हाच मागे पडले आहे. तरीही हाडाचा शिक्षक मोठ्या खुबीने लहान शिक्षा, अबोला असे मार्ग अनुसरून, करून छान बोधपर गोष्टी सांगून चांगले वळण मुलांना लावतातच.
छान बोलके चित्र सुविचारामधे काल आले, व शिक्षक दिनाविषयी आपणही लिहावे असे वाटले. कोणताही भेदभाव न करता शिक्षक आपल्याजवळचे उपयोगी ज्ञान विद्यार्थ्यांना वाटतात. त्याचा उपयोग किती आणि कसा करायचा हे पूर्णपणे आपल्यावर आहे. उत्तम नागरिक होण्यासाठी शिक्षण आणि संस्कार दोन्हीही महत्वाची भूमिका बजावतात. थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचे एक वचन सर्वांना सर्वश्रुत आहे.
*विद्ये विना मती गेली l मतिविना नीती गेलीl नीतीविना गती गेली l*
*गतीविना वित्त गेले l*
*इतके सारे अनर्थ एका अविद्येने केलेl*
अतिशय महत्वाचे वचन आहे हे! विद्येचे महत्व पटवून सांगायला आणखी दुसरे काही उदाहरण नको.
अतिशय महत्त्वाचे असे हे वचन आपण समजूनच घ्यायला हवे.
भारताचे दुसरे राष्ट्रपती, थोर शिक्षणतज्ञ व महान व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. त्यांनाही आजच्या दिवशी कोटी कोटी प्रणाम
विनया भट.
9167381012.
====================
🌹✍️

0 टिप्पण्या