इराणच्या समर्थनार्थ वंचितचा १ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा; ॲड. आंबेडकर यांची घोषणा

 इराणच्या समर्थनार्थ वंचितचा १ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा; ॲड. आंबेडकर यांची घोषणा 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 24/9/2026 :

 पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने १ ऑक्टोबर रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात होणाऱ्या या मोर्चात राज्यातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केले. 'भारत सरकार इराणसोबत आहे, हे स्पष्ट झाले पाहिजे,' अशी मागणीही त्यांनी केली.

भारतावर जेव्हा जेव्हा संकट आले, तेव्हा इराण भारतासोबत उभा राहिला. 'त्यामुळे आता इराण अडचणीत असताना भारतानेही त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे,' अशी भूमिका आंबेडकर यांनी मांडली. केंद्र सरकारने इस्रायलच्या समर्थनाची भूमिका घेण्याऐवजी भारताच्या आर्थिक हिताला प्राधान्य द्यावे, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी ब्रिक्समध्ये नेमके कोणते निर्णय झाले, हे देशासमोर स्पष्ट करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

सीजेपीसोबत जाण्याचा प्रश्नच नाही

सीजेपीचे प्रमुख अभिजित दिपके यांच्या संदर्भात बोलताना, ज्यांनी अद्याप राजकीय भूमिका स्वीकारलेली नाही, त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच नाही. आम्ही सध्या अस्तित्वात असलेल्या राजकीय पक्षांसोबत जाऊ, अशी भूमिका अॅड. आंबेडकर यांनी स्पष्ट केली.

देशातील विरोधी पक्ष 'कोमात'

देशातील विरोधी पक्ष सध्या 'कोमात' गेल्याची टीका आंबेडकर यांनी केली. जागतिक तसेच प्रादेशिक प्रश्नांवर विरोधक जाणीवपूर्वक भूमिका घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला. धर्म आणि जातीच्या चौकटीत सामान्य माणसाला अडकवून ठेवण्याऐवजी राष्ट्र आणि कुटुंबाच्या आर्थिक हिताचा विचार करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

शेतकऱ्यांनी जात सोडून मतदान करावे

दुष्काळाच्या प्रश्नावर बोलताना शेतकऱ्यांनी जातीय समीकरणांपलीकडे जाऊन मतदान करण्याची गरज अॅड. आंबेडकर यांनी व्यक्त केली. सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांवर परिस्थिती ओढवते; मात्र, निवडून दिलेल्या प्रतिनिधींकडून काय अपेक्षा करावी, याचा विचार शेतकऱ्यांनी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी विद्यार्थ्यांनी डीबीटीमुळे येणाऱ्या अडचणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या; मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. धोरण बदलायचे असेल तर सरकार बदलावे लागेल, असेही आंबेडकर म्हणाले.ल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या