ऑपरेशन सफेद सागर ची कहाणी
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 13/9/2026 :
कारगिलच्या आकाशात वायुसेनेचे पंख दोन आठवडे का बांधले होते? 'ऑपरेशन सफेद सागर' चे पडद्यामागचे अंगावर काटा आणणारे सत्य. २५ मे १९९९ ची ती संध्याकाळ. दिल्लीतल्या एका सरकारी बंगल्यातून एक जुनी 'अॅम्बेसिडर' कार बाहेर पडते. गाडीवर ना कोणता झेंडा, ना कोणती पाटी. आत बसलेल्या व्यक्तीने निळ्या रंगाचा फ्लाईंग ओव्हरऑल घातलाय आणि खांद्यावर विंग कमांडरच्या पट्ट्या आहेत. पण हा माणूस साधा विंग कमांडर नव्हता, तर ते होते भारतीय वायुसेनेचे तत्कालीन प्रमुख, एअर चीफ मार्शल ए.वाय. टिपणीस. आपल्या पत्नीलाही न सांगता, ड्रायव्हरला केवळ 'लहान गाडी काढ' एवढीच सूचना देऊन ते थेट पालम विमानतळावर पोहोचले. तिथे उभ्या असलेल्या 'एएन-३२' विमानाच्या पायलटलाही ते पाहून धक्का बसला. टिपणीस यांनी त्याला शांत करत थेट आदेश दिले, "विमानात मी आहे, हे कुणालाही समजता कामा नये."
दुसऱ्या दिवशी सकाळी भारतीय वायुसेनेचे एक निर्णायक आणि अत्यंत गुप्त ऑपरेशन सुरू होणार होते, ऑपरेशन सफेद सागर. पण कारगिलच्या शिखरांवर पाकिस्तानी फौज ठाण मांडून बसलेली असताना, भारतीय वायुसेनेला तिथे पोहोचायला तब्बल दोन आठवडे का लागले? हाच तो 'विषय हार्ड' आहे, ज्याच्या मुळाशी आपण आज जाणार आहोत. नेटफ्लिक्सच्या 'ऑपरेशन सफेद सागर' या सीरिज मध्ये जे दाखवले आहे, त्याही पेक्षा भयानक आणि गुंतागुंतीचे वास्तव दिल्लीच्या वातानुकूलित खोल्यात आणि कारगिलच्या उणे तापमानात घडत होते.
पाकिस्तानात १६ जानेवारी १९९९ रोजी एक गुप्त बैठक झाली होती. जनरल परवेझ मुशर्रफ, चीफ ऑफ स्टाफ जनरल अझीझ, १० कोअरचे जीओसी लेफ्टनंट जनरल महमूद आणि ब्रिगेडियर जावेद हसन, या 'गँग ऑफ फोर' ने कारगिलचा कट रचला होता. मुशर्रफ यांनी विचारले, "प्लॅन फेल झाला तर काय?" तेव्हा जावेद हसन म्हणाले, "हुजूर, माझी मान कापा." त्यावर मुशर्रफ म्हणाले, "शेवटी मान तर माझीच कापली जाईल."
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, याच वेळी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आले होते. एकीकडे फेब्रुवारीत अटल बिहारी वाजपेयी बस घेऊन लाहोरला गेले. मुशर्रफ यांनी त्यांना सॅल्यूट ठोकला, पण पाठीमागे खंजीर खुपसण्याची तयारी पूर्ण झाली होती. १७ मे रोजी आयएसआयच्या मुख्यालयात जेव्हा नवाझ शरीफ यांना या घुसखोरीचा नकाशा दाखवला गेला, तेव्हा त्यावर 'एलओसी' (नियंत्रण रेषा) आखलेलीच नव्हती. काश्मीर मिळवण्याच्या खोट्या स्वप्नांना भुलून शरीफ यांनी या फसवणुकीला मूकसंमती दिली. मुशर्रफ यांनी अत्यंत चलाखीने आपले सैन्य मुजाहिदीनच्या वेशात भारतात घुसवले होते. जेव्हा नवाझ शरीफांना सत्य समजले, तेव्हा वेळ निघून गेली होती आणि त्यांनी नाईलाजाने याला लष्करी कारवाईचा भाग मानले.
इकडे भारतात ३ मे ला काही गुराख्यांना आपला याक शोधताना पहिल्यांदा या घुसखोरांची चाहूल लागली. ५ मे ला लष्कराने याची पुष्टी केली आणि ८ मे रोजी जेव्हा वायुसेनेच्या 'चीता' हेलिकॉप्टरने तोलोलिंग वरून उड्डाण करून छायाचित्रे घेतली, तेव्हा पायाखालची जमीन सरकली. तिथे काही मूठभर अतिरेकी नव्हते, तर तब्बल १३० चौक्यांवर पाकिस्तानच्या नॉर्दन लाईट इन्फंट्रीचे दीड ते दोन हजार सैनिक अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह आणि सीमेपलीकडील १८ आर्टिलरी बॅटरींच्या पाठिंब्यासह ठाण मांडून बसले होते. ही साधी घुसखोरी नव्हती, तर एक अघोषित युद्ध होते.
खरी ठिणगी पडली ती दिल्लीत. लष्कराला या शिखरांवर बसलेल्या शत्रूला हुसकावण्यासाठी वायुसेनेचे लढाऊ हेलिकॉप्टर्स हवे होते. लष्कराने थेट 'एमआय-३५' या हेवी अटॅक हेलिकॉप्टर्सची मागणी केली. पण इथंच तांत्रिक आणि सामरिक पेच निर्माण झाला. हे हेलिकॉप्टर्स मैदानी प्रदेशासाठी बनले होते. १४ ते १६ हजार फुटांच्या विरळ हवेत, पूर्ण शस्त्रास्त्रांनिशी उड्डाण करणे त्यांच्यासाठी अशक्य होते.
लष्कराला हे तांत्रिक उत्तर रुचले नाही. त्यांनी साध्या 'चीता' हेलिकॉप्टरवर मशीनगन लावून हल्ला करण्याची तयारी सुरू केली. एअर चीफ टिपणीस यांनी याला कडाडून विरोध केला. "अंड्याच्या टरफला इतक्या नाजूक 'चीता'ला हल्ल्यासाठी पाठवणे म्हणजे एखाद्या कोंबडीला हलाल करायला पाठवण्यासारखे आहे," असे त्यांचे स्पष्ट मत होते. लष्कर आणि वायुसेनेत यावरून तीव्र मतभेद झाले.
टिपणीस यांचा मुद्दा रास्त होता, तोफेचा गोळा जमिनीवरून चालतो आणि पडतो, पण आकाशातून जेव्हा लढाऊ विमान उडते, तेव्हा त्याचे राजकीय आणि जागतिक पडसाद उमटतात. १९९८ मध्ये दोन्ही देशांनी अणुचाचण्या केल्या असल्यामुळे राजकीय परवानगी शिवाय वायुसेनेचा वापर करणे आत्मघातकी ठरू शकले असते. शिवाय, पाकिस्तानी सैन्याकडे उष्णतेचा मागोवा घेणारी 'स्टिंगर' क्षेपणास्त्रे होती, जी कोणत्याही हेलिकॉप्टरला लांबूनच अचूक टिपू शकत होती.
१६ आणि १७ मे रोजी झालेल्या बैठकांमध्ये वायुसेनेच्या वापरास नकार देण्यात आला. १८ मे रोजी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या (CCS) बैठकीत परराष्ट्र मंत्रालयाने भीती व्यक्त केली की, हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर जाईल. त्यामुळे लष्कराला कारवाईची सूट मिळाली, पण वायुसेनेला नाही. पण २१ मे ला सगळं चित्रच बदललं.
वायुसेनेचे एक जुने 'कॅनबेरा' विमान रेकी करण्यासाठी गेले असता त्याच्या इंजिनला शत्रूने 'स्टिंगर' क्षेपणास्त्र मारले. पायलटने शिताफीने विमान सुरक्षित उतरवले आणि फुटेजही आणले. आता हे स्पष्ट झाले की शत्रू नुसत्या रायफल्स घेऊन आलेला नाही, तर त्यांच्याकडे आकाशातील विमाने पाडण्याची ताकद आहे. अखेर २४ मे ला लष्करप्रमुख जनरल व्ही.पी. मलिक आणि टिपणीस यांच्यात पुन्हा खडाजंगी झाली. लष्करप्रमुख संतप्त होऊन "मी एकटाच हा विषय हाताळतो" असे म्हणून बैठक सोडून जाऊ लागले. तेव्हा दोन दलांमधील संबंध वाचवण्यासाठी टिपणीस यांनी त्यांच्यामागे जाऊन आपल्या व्यावसायिक निर्णयाच्या विरोधात जाऊन हेलिकॉप्टर्स देण्यास होकार दिला.
२५ मे ला पुन्हा बैठक झाली आणि अखेर पंतप्रधान वाजपेयींनी आपल्या शांत पण खंबीर आवाजात ऐतिहासिक आदेश दिला, "उद्या सकाळपासून सुरू करा." पण टिपणीस यांनी जेव्हा हल्ल्यासाठी वळताना थोडी एलओसी ओलांडण्याची परवानगी मागितली, तेव्हा वाजपेयी आपल्या जागेवरून उठले आणि ठणकावून म्हणाले, "नाही, तुम्ही एलओसी पार करणार नाही." या एका वाक्याने वायुसेनेच्या वैमानिकांचे हात पुढचे पन्नास दिवस बांधले गेले. त्यांना शत्रूवर हल्ला करायचा होता, पण ज्या बाजूने हल्ला करणे सोपे होते, ती नियंत्रण रेषा ओलांडायची नव्हती. हा निर्णय कठीण होता, पण जागतिक मुत्सद्देगिरीत तो भारताचा सर्वात मोठा मास्टरस्ट्रोक ठरला.
२६ मे च्या सकाळी 'ऑपरेशन सफेद सागर' सुरू झाले. मिग-२१, मिग-२३, मिग-२७ आणि एमआय-१७ हेलिकॉप्टर्सनी मृत्यूच्या छायेत उड्डाण केले. १४ ते १८ हजार फूट उंचीवर, काळ्या खडकांमध्ये आणि पांढऱ्या बर्फात लपलेले शत्रूचे तंबू शोधणे हे अक्षरशः भुश्यातून सुई शोधण्यासारखे होते. विरळ हवेमुळे बॉम्बचा वेग आणि दिशा बदलत होती, त्यातच एलओसी पार करायची नसल्याने चुकीच्या कोनातून हल्ला करावा लागत होता. २७ मे ला याची मोठी किंमत चुकवावी लागली.
बटालिक सेक्टर मध्ये हल्ला करताना एका मिग-२७ च्या इंजिनने विरळ हवेमुळे पेट घेतला आणि फ्लाईट लेफ्टनंट के. नचिकेता यांना शत्रूच्या हद्दीत इजेक्ट करावे लागले. त्याच वेळी तिथून उडणारे मिग-२१ चे वैमानिक, स्क्वॉड्रन लीडर अजय आहुजा यांनी नचिकेताचा रेडिओ कॉल ऐकला. नेटफ्लिक्सच्या सीरिज मध्ये दाखवल्या प्रमाणे ते दोघे एकाच स्क्वॉड्रनचे नव्हते, पण एका भारतीय भावासाठी आहुजा यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला. त्यांनी आपला मूळ आदेश बाजूला ठेवून स्वतःचे विमान धोकादायक पातळीवर खाली आणले आणि ते 'स्टिंगर' मिसाइलचे शिकार झाले.
आहुजा यांना पाकिस्तानी सैन्याने पकडून क्रूरपणे गोळ्या घालून मारले, पण तत्पूर्वी त्यांनी दिलेल्या अचूक माहितीमुळे नचिकेता जिवंत असल्याचे जगासमोर आले आणि पाकिस्तानला ३ जून रोजी त्यांना सोडावेच लागले. या हौतात्म्यासाठी आहुजा यांना मरणोत्तर वीर चक्र देण्यात आले. दुसऱ्याच दिवशी, २८ मे ला 'नुब्रा' फॉर्मेशन मधील एक एमआय-१७ हेलिकॉप्टर 'फ्लेअर डिस्पेन्सर' (क्षेपणास्त्रांना चकवा देणारी उष्णतेचे गोळे सोडणारी यंत्रणा) नसल्यामुळे पाडण्यात आले आणि चार जवानांना वीरमरण आले.
केवळ तीन दिवसात तीन विमाने आणि पाच जीव गमावल्यानंतर वायुसेनेने आपली रणनीती पूर्णपणे बदलली. अटॅक रोलसाठी हेलिकॉप्टर्सचा वापर तत्काळ थांबवण्यात आला. प्रत्येक लढाऊ विमानाला शिखरांच्या ६ ते ८ हजार फूट वरूनच उड्डाण करण्याचे आणि प्रत्येकाकडे 'फ्लेअर डिस्पेन्सर' असण्याचे सक्त आदेश दिले गेले. या अचूक निर्णयानंतर पाकिस्तानने शंभरहून अधिक क्षेपणास्त्रे डागली, पण भारतीय वायुसेनेचे एकही विमान ते पाडू शकले नाहीत. पण मग एवढ्या उंचीवरून, न दिसणाऱ्या शत्रूवर अचूक मारा कसा करायचा? याचे उत्तर इस्रायल, बाजारातील एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानातून आणलेले 'सोनी'चे उपकरण आणि एका तरुण वैमानिकाच्या कल्पकतेत दडलेले होते, ज्याने युद्धाचे पारडे कायमचे फिरवले. ती रोमहर्षक कहाणी नक्कीच पुढे कधीतरी जाणून घेण्यासारखी आहे.
कारगिल युद्ध आणि 'ऑपरेशन सफेद सागर' ही केवळ सैनिकी शौर्याची गाथा नाही, तर राजकीय संयम, दोन सेनादलांमधील संघर्ष आणि देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरवीरांची एक धगधगती कहाणी आहे. जेव्हा तुम्ही मोकळ्या आकाशात एखादे लढाऊ विमान पाहता, तेव्हा त्यामागे अजय आहुजा सारख्या वीरांचे रक्त आणि टिपणीस यांच्या सारख्या अधिकाऱ्यांची मुत्सद्देगिरी दडलेली असते, हे कधीही विसरू नका.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
सौजन्य : विषय हार्ड *━═━═━═━═━═━═━═━═━═━═*

0 टिप्पण्या