"दहीहंडी की देहहंडी?"

 संपादकीय..............✍️

 "दहीहंडी की देहहंडी?"

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 14/9/2026 :

दै.मुंबई मित्र (१२सप्टेंबर) मध्ये ज्येष्ठ पत्रकार, समूह संपादक अभिजीत राणे यांचा  "दहीहंडी की देहहंडी?" या शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेला विशेष संपादकीय अग्रलेख वाचला.या विचारप्रवर्तक अग्रलेखाचा सुसूत्र, सविस्तर गोषवारा असा:—

  बालकृष्णाची लीला, गोपाळांचे संघटन,साहस, परस्परविश्वास आणि एकमेकांच्या खांद्यावर उभे राहून लक्ष्य गाठण्याचा उत्सव म्हणजे " दहीहंडी "! या उत्सवाचे राजकारणाने आधी व्यापारीकरण केले.लाखोंची बक्षिसे आली.मग सेलिब्रिटी आले.त्यानंतर कान फोडणारे डीजे आले. आता गर्दी खेचण्यासाठी लैंगिक उत्तेजक नृत्यही आले आहे.'तरूणांची मागणी आहे 'हा बचाव तर अधिकच संतापजनक आहे. एकंदरीतच या उत्सवाचे टप्प्याटप्याने विकृत होत असलेले स्वरूप पाहता धार्मिक उत्सव आणि नाइट क्लब यांच्यातील उरलेली सीमारेषाही पुसून टाकणारी या उत्सवाची पुढची पायरी ठरेल का? असा प्रश्र्न आता सुज्ञांना भेडसावू लागला आहे.

राजकीय दहीहंडी कार्यक्रमांमध्ये डान्स-शो आणि मनोरंजनाचे कार्यक्रम झाले;काही ठिकाणच्या दृश्यांवरून  त्यांच्या अश्लीतेबद्दल तीत्र आक्षेप घेतले गेले.प्रश्र्न नृत्य करणार्‍या स्रियांच्या व्यक्तिगत चारित्र्याचा अजिबात नाही.प्रश्र्न त्यांना बोलावणार्‍या आयोजकांच्या सांस्कृतिक चारित्र्याचा आहे.कृष्णजन्माच्या मंगल दिवशी,दहीहंडीच्या नावाखाली हजारो तरूणांची गर्दी खेचण्यासाठी स्रीदेहाचे लैंगिकीकृत प्रदर्शन वापरावेसे वाटणे ही आधुनिकता नाही ही राजकारणाची सांस्कृतिक दिवाळखोरी आहे. अधिक संतापजनक बाब म्हणजे अशा कार्यक्रमांच्या व्यासपीठावर आमदार, खासदार,मंत्री आणि पक्षांचे पदाधिकारी बसलेले दिसतात. ज्यांच्या उपस्थितीला सामाजिक प्रतिष्ठा आहे,तेच जर समोर चालणार्‍या कार्यक्रमाचे मूक प्रेक्षक झाले तर कार्यक्रमाला अप्रत्यक्ष राजमान्यताच मिळते.नेता म्हणवून घ्यायचे,समाजाने आपल्याला हारतुरे घालायचे,पोलिसांनी बदोबस्त द्यायचा आणि त्याच समाजातील किशोरवयीन मुलांसमोर काय दाखवले जाते याची जबाबदारी मात्र आयोजकांची म्हणून हात झटकायचे हे नेतृत्व नाही.ही राजकीय निर्लज्जता आहे.तरूणांना काय आवडते ते पुरवणारा नेता नसतो;तो तरूणांना काय योग्य आहे याची जाणीव करून देणारा असतो. पण लोकानुनय आणि नेतृत्व यातील मूलभूत फरकच राजकारणी विसरले आहेत.ज्या दिवशी नेता गर्दीच्या सर्वांत खालच्या अभिरूचीचा पुरवठादार बनतो,त्या दिवशी समाजाचा नेता मरतो आणि मतांचा दलाल जन्माला येतो.

            कला आणि स्रीदेहाचे वस्तूकरण यात जमीन- अस्मानाचा फरक आहे.स्रीला तिच्या कलेपेक्षा पुरूषांच्या लैंगिक उत्तेजनेचे साधन बनवून हजारोंच्या गर्दीसमोर मांडणे हे स्रीस्वातंत्र्याचे प्रतीक नाही.स्रीच्या शरीराला गर्दी खेचणारे बनवून त्यावर राजकीय प्रसिद्धीची दुकानदारी करणे म्हणजे स्रीचा सन्मान नव्हे;तिच्या देहाचे व्यावसायिक वस्तूकरण आहे. याच ठिकाणी मानसशास्रीय प्रश्र्न सुरू होतो. लैंगिकीकृत माध्यमसामग्रीच्या सततच्या संपर्कामुळे स्रीकडे स्वतंत्र व्यक्तीपेक्षा लैंगिक वस्तू म्हणून पाहण्याच्या दृष्टिकोनाला बळ मिळू शकते.कारण किशोरवयात समाज मुलाला स्रीबद्दल कोणता संदेश देतो याला महत्त्व असते. एका बाजूला शाळेत मुलांना स्रीचा आदर करा असे शिकवले जात असताना दुसर्‍या बाजूला त्याच मुलांच्या परिसरातील राजकीय नेता हजारोंची गर्दी जमवून स्रीदेहाला पुरूषांच्या सामूहिक उत्तेजनेचे साधन म्हणून प्रस्तुत करणार्‍या कार्यक्रमाला प्रतिष्ठा देत असेल तर त्या मुलांनी शाळेचा धडा घ्यायचा का व्यासपीठावरचा धडा घ्यायचा हा खरा प्रश्र्न पडतो.म्हणूनच आयोजकांना प्रश्र्न विचारला पाहिजे की तुम्ही हजारो किशोरवयीन मुलांना नेमकी कोणती स्रीप्रतिमा विकत आहात?

   कार्यक्रमाला परवानगी देणारे प्रशासन या नव्या सांस्कृतिक विकृतीबद्दल बोलायला का तयार नाही,आणि हिंदुत्ववादी संघटना मौन का धारण करून बसल्या आहेत हा प्रश्र्न पडतो. संस्कृतीरक्षणाची तलवार फक्त विरोधकांसाठी म्यानातून येत असेल आणि स्वकीयांसमोर म्यानात जात असेल, तर ते संस्कृतीरक्षण नसते;तो राजकीय ढोंगीपणा असतो. माध्यमांची स्थितीही फारशी वेगळी नाही. एखाद्या अभिनेत्रीच्या कपड्यावर पॅनेल बसते,कोणत्या नेत्याने कोणाला काय टोला लगावला यावर 

तासंतास चर्चा होते. पण हजारो तरूणांसमोर सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमाची अभिरूची कुठे गेली जात आहे यावर चर्चा करण्याची हिंमत होत नाही.कारण राजकीय आयोजक मोठे जाहिरातदार आहेत,सत्ता मोठी आहे आणि व्हायरल व्हिडिओ स्वतः 'टीआरपी'चे खाद्य आहेत. माध्यमांनी सत्तेसमोर प्रश्र्न विचारण्याचे स्वातंत्र्य आणि विचारवंतांनी राजकीय निष्ठेपुढे विवेक गहाण ठेवला की समाजाच्या संवेदना बोथट होणे अपरिहार्य असते.

  सार्वजनिक कार्यक्रमांसाठी स्पष्ट आचारसंहिता असली पाहिजे. गर्दी जमवणे म्हणजे संस्कृती घडवणे नव्हे हे राजकीय पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले पाहिजे. कृष्णाने गोवर्धन उचलला होता तो समाजाच्या रक्षणासाठी.आज त्याच कृष्णाच्या जन्मोत्सवात काही राजकारणी गर्दीच्या सर्वांत खालच्या अभिरूचीला आपल्या खांद्यावर उचलून नाचवत असतील,तर त्याला उत्सव म्हणणेही त्या उत्सवाचा अपमान आहे.दहीहंडीची उंची दरवर्षी वाढते आहे; पण राजकीय नेतृत्वाची सांस्कृतिक उंची दरवर्षी कमी होत असेल,तर एक दिवस हंडी आकाशात असेल आणि महाराष्ट्राची अभिरूची गटारात त्या दिवशी दोष नृत्य करणार्‍या स्रीचा नसेल दोष तिला त्या व्यासपीठावर आणणार्‍या नेत्याचा, त्याच्यासमोर मौन बसलेल्या सत्तेचा आणि हे सारे पाहूनही गप्प राहिलेल्या आपल्या समाजाचा असेल.ज्येष्ठ पत्रकार, संपादक अभिजीत राणे यांनी आपल्या विशेष संपादकीय अग्रलेखात विदारक वास्तवावर टाकलेला हा अभ्यासपूर्ण प्रकाशझोत व केलेले विवेचन-विश्लेषण खरोखरच उल्लेखनीय,विचारप्रवर्तक व संबंधित तमाम जबाबदार घटकांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरते हे मात्र तितकेच खरे!

पत्रकार अरूण दीक्षित.

८१६०१०५९४०/९४२२६९४६६६

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या