🩺हेल्थ मंत्रा |आरोग्य मंत्र |🩺
तोंडाला चटका बसेल इतकं गरम खाताय, चहा घेता? होऊ शकतो अन्ननलिकेच्या कॅन्सरचा धोका
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 18/9/2026
गरमागरम चहा, तव्यावरची पोळी, कढईतून काढलेली समोसा-कचोरी… भारतीयांच्या खाण्याच्या सवयींमध्ये गरम पदार्थांना विशेष स्थान आहे. अनेकांना तर पदार्थ इतका गरम हवा असतो की त्यातून वाफ निघत असेल तरच त्याची खरी मजा येते. पण तुमची हीच सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते का? नुकत्याच करण्यात आलेल्या मोठ्या अभ्यासातून अतिशय गरम पेये वारंवार पिणे आणि अन्ननलिकेच्या कर्करोगाच्या एका प्रकाराचा वाढलेला धोका यांच्यात संबंध असल्याचे आढळून आले आहे. याचा अर्थ चहा किंवा कॉफी थेट कर्करोगाला कारणीभूत ठरतात असा अजिबात नाही. मात्र, पेय किंवा अन्नाचे तापमान किती आहे, याकडे लक्ष देणे महत्त्वाचे असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.
तब्बल ९.७७ लाख लोकांच्या डेटाचा अभ्यास
या संशोधनात यूकेमधील दोन मोठ्या अभ्यासांमधील ९,७७,२८२ प्रौढ व्यक्तींच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आले. अभ्यासाच्या कालावधीत २,३४८ जणांना अन्ननलिकेचा कर्करोग झाल्याचे आढळले. ज्या लोकांना अतिशय गरम पेये पिण्याची सवय होती, त्यांच्यामध्ये अन्ननलिकेतील oesophageal squamous cell carcinoma या कर्करोगाच्या प्रकाराचा धोका, कोमट पेये पसंत करणाऱ्यांच्या तुलनेत तीन पटीहून अधिक असल्याचे आढळले. दिवसभरात सहा किंवा त्यापेक्षा जास्त गरम पेये घेणाऱ्यांमध्येही धोका अधिक असल्याचे संशोधनात दिसून आले.
मात्र, याचा अर्थ असा नाही की दररोज गरम चहा प्यायल्याने कर्करोग होतो. संशोधनातून मुख्यतः अतिशय उच्च तापमानाच्या पदार्थांशी किंवा पेयांशी वारंवार होणाऱ्या संपर्काचा संभाव्य धोका अधोरेखित होतो.
६५°C पेक्षा जास्त तापमानाबाबत सावध का?
जागतिक आरोग्य संघटनेची कर्करोग संशोधन संस्था IARC ६५°C पेक्षा जास्त तापमानात सेवन केलेल्या अत्यंत गरम पेयांना अन्ननलिकेच्या कर्करोगाच्या संदर्भात probably carcinogenic to humans या श्रेणीत ठेवते. इथे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चहा किंवा कॉफी हा पदार्थ नाही, तर त्याचे तापमान.
अतिशय गरम पदार्थ वारंवार खाल्ल्याने किंवा पेये प्यायल्याने अन्ननलिकेच्या आतील नाजूक आवरणावर उष्णतेचा परिणाम होऊ शकतो. वारंवार इजा आणि त्यानंतर होणारी भरपाईची प्रक्रिया दीर्घकाळ सुरू राहिल्यास पेशींवर परिणाम होण्याची शक्यता असते.
चहासोबत ‘हे’ ५ पदार्थही अती गरम खाता? सावधान
१. तव्यावरची गरम पोळी आणि पराठा
तव्यावरून थेट ताटात आलेली पोळी किंवा पराठा खाण्याची अनेकांची सवय असते. गरम पोळीची चव वेगळी असली तरी ती थोडी थंड होऊ देणे चांगले. तोंड, ओठ किंवा घशाला चटका बसेल इतकी गरम पोळी खाणे टाळा.
२. समोसा आणि कचोरी
बाहेरून कुरकुरीत आणि आतून अक्षरशः धगधगता बटाटा, वाटाणा किंवा डाळीचा मसाला! समोसा-कचोरी खाताना हा धोका लक्षात येत नाही. समोसा किंवा कचोरी तोंडात टाकण्यापूर्वी मधून फोडून काही वेळ वाफ बाहेर जाऊ द्या. बाहेरचा भाग थंड झाला असला तरी आतले सारण प्रचंड गरम असू शकते.
३. गरमागरम डाळ, सांबार आणि आमटी
डाळ, सांबार, आमटी किंवा रसम हे भारतीय जेवणातील नेहमीचे पदार्थ. गॅसवरून उतरवल्यानंतर लगेच वाटीत घेऊन खाण्याऐवजी काही मिनिटे थांबणे योग्य. उकळत्या अवस्थेतील पदार्थापेक्षा आरामात खाता येईल इतका कोमट पदार्थ निवडा.
४. सूप आणि रसम
पावसाळा किंवा थंडीच्या दिवसांत गरम सूप अथवा रसम प्यायला छान वाटते. पण वाटीच्या वरचा भाग थोडा थंड दिसत असला तरी आतले द्रव खूप गरम असू शकते. त्यामुळे पहिल्यांदा एक छोटा घोट किंवा चमचाभर घेऊन तापमान तपासा.
५. इडली, ढोकळा आणि इतर वाफवलेले पदार्थ
इडली, ढोकळा आणि इतर वाफवलेले पदार्थ मऊ असल्यामुळे पटकन खाल्ले जातात. मात्र, नुकतेच वाफवून काढलेले पदार्थ आतूनही चांगलेच गरम असू शकतात. ताटात वाढल्यानंतर काही मिनिटे थांबून मग खाणे तोंड आणि घशाला होणारी उष्णतेची जळजळ टाळण्यास मदत करू शकते.
♻️
0 टिप्पण्या