मारुतीनाना कुलकर्णी प्राथमिक विद्यालयात समित्यांची संयुक्त बैठक संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
माळशिरस (प्रतिनिधी) : मारुतीनाना कुलकर्णी प्राथमिक विद्यालय, माळशिरस येथे सखी सावित्री समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती व महिला तक्रार समिती यांची संयुक्त बैठक शुक्रवार, दि. १२ सप्टेंबर रोजी मुख्याध्यापिका कांता सुनील कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी मुख्याध्यापक सुरवसे होते.
यावेळी डॉ. कविता पवार यांनी विद्यार्थ्यांना ‘गुड टच–बॅड टच’, योगासने, संतुलित आहार तसेच आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण बाबींवर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आरोग्याची व वैयक्तिक सुरक्षिततेची काळजी कशी घ्यावी, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. तर ॲड. रेश्मा टेळे यांनी विद्यार्थ्यांना विविध कायदेविषयक बाबी, विद्यार्थ्यांचे अधिकार तसेच बालसुरक्षेसंदर्भातील कायदेशीर तरतुदी याबाबत मार्गदर्शन केले.
या सभेस श्री हनुमान शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक धनंजय मस्के यांची प्रमुख उपस्थिती लाभली. समितीच्या कामकाजाचे आयोजन व नियोजन करण्यास अश्विनी देसाई यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या बैठकीस ॲड. कुलकर्णी, प्रा. संतोष माने , अंगणवाडी शिक्षिका व पत्रकार सुजाता गाडगीळ, शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, पालक आणि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांची सुरक्षितता, आरोग्य, शिक्षण आणि सर्वांगीण विकास याबाबत विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना आरोग्य, सुरक्षितता व कायदेविषयक बाबींची उपयुक्त माहिती मिळाली.
खेळीमेळीच्या, आनंददायी व उत्साहपूर्ण वातावरणात ही संयुक्त बैठक यशस्वीरीत्या संपन्न झाली.

0 टिप्पण्या