भाकीत खरे ठरले त्याची गोष्ट !
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 24/9/2026 :
जंगले नष्ट केल्यावर जमिनीची पाणी शोषून घेण्याची नैसर्गिक क्षमता संपते. पावसाचे पाणी जमिनीत न जिरता पर्वतांच्या उतारावरून थेट माती आणि दगड वाहून नेऊ लागते, ज्यामुळे नद्यांना अचानक विनाशकारी पूर येतात, हे जर्मन वैज्ञानिक अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट ने दोन शतकांपूर्वी जगाला सांगितलेले. निसर्गाचे नियम साहसी प्रयोगातून जाणून घेणार्या हम्बोल्ट यांनी वर्तविलेली सारी पर्यावरण-भाकिते खरी ठरली. या महान शास्त्रज्ञाच्या कार्याचा आजच्या हवामान-भय काळात उजाळा.
नेपाळ मध्ये अलीकडेच झालेल्या भीषण महापुराने आणि हिमनद्यांच्या अनियंत्रित वितळण्याने संपूर्ण जगाला पुन्हा एकदा निसर्गाच्या रौद्र रूपाची जाणीव करून दिली. हिमालयाच्या कुशीत वसलेली गावेच्या गावे वाहून गेली, नद्यांनी आपली पात्रे बदलून विनाश घडवला. या घटनांना आज आपण ‘मानवनिर्मित हवामान बदल’ म्हणून ओळखतो. परंतु ज्या संकटाने संपूर्ण जग सध्या भयभीत झाले, त्याचा अचूक वैज्ञानिक इशारा २०० वर्षांपूर्वी एका द्रष्ट्या माणसाने जगाला दिला होता. याच आठवड्यात जयंती साजरी झालेल्या या महान जर्मन वैज्ञानिकाचे नाव अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट. विज्ञानाच्या इतिहासातील हा विलक्षण योगायोग, कारण याच वर्षात फ्रान्सचे नेपोलियन बोनापार्ट आणि ब्रिटनच्या वेलिंग्टनचे ड्यूक ज्यांनी नेपोलियनचा पराभव केला यांचाही जन्म झाला. म्हणूनच इतिहासकार गमतीने म्हणतात की, १७६९ या एकाच वर्षाने जगाला दोन मोठे युद्धखोर आणि त्याच वेळी निसर्गाचे रक्षण करणारा एक महान वैज्ञानिक हम्बोल्ट ही दिला.
हम्बोल्ट हा केवळ शास्त्रज्ञ नव्हता, तर निसर्गाकडे अखंड जिवंत जाळे म्हणून पाहणारा जगातील पहिला पर्यावरणवादी विचारवंत होता. प्रसिद्ध लेखिका अँड्रिया वुल्फ यांनी लिहिलेल्या ‘द इन्व्हेन्शन ऑफ नेचर’ या गाजलेल्या पुस्तकात हम्बोल्ट यांच्या अद्भुत निसर्गदृष्टीचा आणि त्यांच्या रोमांचक प्रवासाचा इतिहास मांडला आहे.
अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट च्या या जागतिक यशाची पाळेमुळे त्याच्या बालपणातील संघर्षात आहेत. त्याचा जन्म श्रीमंत घराण्यात झाला असला तरी त्याचे बालपण सुखाचे नव्हते. वडील लहानपणीच वारले आणि आई अत्यंत शिस्तप्रिय. अलेक्झांडर आणि त्याचा मोठा भाऊ विल्हेम यांना शिकवण्यासाठी घरी खाजगी शिक्षक ठेवण्यात आलेले. विल्हेम हा लहानपणा पासूनच हुशार, कुशाग्र बुद्धीचा आणि अभ्यासात अत्यंत वेगवान होता. पुढे तो जर्मनीचा महान भाषाशास्त्रज्ञ आणि मुत्सद्दी बनला. याउलट, लहानगा अलेक्झांडर अभ्यासात संथ होता. शिक्षकांना आणि त्याच्या स्वत:च्या जन्मदात्या आईलाही असे वाटायचे की, अलेक्झांडर मंद बुद्धीचा आहे. आपल्या तेजस्वी बुद्धीच्या भावासोबत सतत होणार्या तुलनेमुळे लहानग्या अलेक्झांडरच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला. तो देखील स्वत:ला विल्हेम पेक्षा खूप निकृष्ट समजे. त्याला पुस्तकी पाठांतराचाच कंटाळा, पण निसर्गाचे वेड होते. तो तासनतास जंगलात भटकून कीटक, दगड आणि वनस्पती करी, म्हणूनच घरचे त्याला गमतीने छोटा फार्मसिस्ट म्हणायचे. आईच्या इच्छेखातर त्याने सुरुवातीला अर्थशास्त्र आणि प्रशासनाचा अभ्यास केला, पण आईच्या मृत्यू नंतर जेव्हा त्याला पूर्वजांची संपत्ती मिळाली, तेव्हा त्याने आपल्या मनातील न्यूनगंड कायमचा झटकून टाकला आणि आपल्या आवडीच्या विश्वात मनसोक्त विहार करण्यासाठी युरोपच्या बाहेर पडला.
हम्बोल्ट हा प्रयोगशाळेत किंवा बंद खोलीत बसून संशोधन करणारा शास्त्रज्ञ नव्हता. तो एक अथक प्रवासी होता, ज्याला निसर्गाचे नियम प्रत्यक्ष जाऊन मोजायचे होते. वयाच्या तिसाव्या वर्षी, म्हणजेच १७९९ मध्ये तो दक्षिण अमेरिकेच्या दुर्गम जंगलांचा आणि पर्वतांचा अभ्यास करण्यासाठी निघाला. त्याचा हा प्रवास प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यासाठी नव्हता, तर तो आपल्या सोबत वैज्ञानिक मोजमापांच्या साधनांची प्रयोगशाळाच घेऊन जात असे. हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर, तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर, अक्षांश रेखांश मोजण्यासाठी सेक्सटंट आणि आकाशाच्या निळाईची अचूक तीव्रता मोजणारे सायनोमीटर यांसारखी संवेदनशील उपकरणे त्याच्या बरोबर असायची. त्याच्या भ्रमंतीत लागणार्या प्रत्येक डोंगर, प्रत्येक नदी आणि प्रत्येक वनस्पतीची नोंद तो या उपकरणांच्या साहाय्याने अचूकपणे करीत असे.
हम्बोल्टच्या कारकीर्दीत त्याचा दक्षिण अमेरिकेतील पाच वर्षांचा (१७९९ते १८०४) प्रवास हा अंगावर काटा आणणारा ठरला. ॲमेझॉन आणि ओरिनोको नद्यांच्या घनदाट जंगलामधून प्रवास करताना त्याला आणि त्याच्या सहकार्यांना मलेरिया, विषारी साप, मगरी आणि हिंस्र प्राण्यांचा सामना करावा लागला. अनेक दिवस त्यांना केवळ जंगलातील मुंग्या आणि रानटी फळे खाऊन जगावे लागे. या मोहिमे दरम्यान हम्बोल्टने इक्वेडोर मधील चिम्बोराजो या तब्बल २०,००० फूट उंच, बर्फाच्छादित ज्वालामुखी पर्वतावर चढाई करण्याचा धाडसी प्रयत्न केला. त्या काळी हे जगातील सर्वोच्च शिखर मानले जाई. हम्बोल्ट च्या काळात माऊंट एव्हरेस्ट परमोच्च शिखर आहे हे कोणालाही माहीत नव्हते. आधुनिक गिर्यारोहणाची कोणतीही साधने नसताना, केवळ थर्मामीटर आणि बॅरोमीटर हातात घेऊन हम्बोल्ट ने या पर्वतावर चढाई केली. हवेचा दाब कमी झाल्यामुळे त्याच्या नाकातून आणि हिरड्या मधून रक्त येऊ लागले, पायाला जखमा झाल्या, तरीही तो टोकापर्यंत पोहोचला. पर्वताच्या उंचीनुसार वनस्पतींचे प्रकार कसे बदलतात, हा जगातील पहिला वनस्पती भौगोलिक नकाशा त्याने यातून बनविला.
याच प्रवासा दरम्यान व्हेनेझुएला मधील लेक व्हॅलेन्सिया सरोवराच्या परिसरात हम्बोल्ट ने धक्कादायक वास्तव पाहिले. तिथल्या स्पॅनिश आक्रमकांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी मूळची घनदाट नैसर्गिक जंगले अत्यंत निर्दयीपणे साफ तोडून टाकलेली. त्या जागी नीळ, साखर आणि कॉफी यांसारखी आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी किंमत मिळवून देणारी ‘नगदी पिके’ लावायला सुरुवात केली. या जंगलतोडीमुळे निसर्गाची अन्नसाखळी तुटलेली त्याच्या लक्षात आली. हम्बोल्ट ने तिथे आपले महत्त्वाचे वैज्ञानिक निरीक्षण नोंदवले. तो म्हणाला की, जेव्हा जंगले नष्ट केली जातात, तेव्हा जमिनीची पाणी शोषून घेण्याची नैसर्गिक क्षमता पूर्णपणे संपते. मुसळधार पाऊस पडल्यावर ते पाणी जमिनीत न जिरता पर्वतांच्या उतारावरून थेट माती आणि दगड वाहून नेऊ लागते, ज्यामुळे नद्यांना अचानक विनाशकारी पूर येतात. आज दोनशे वर्षांनंतर हिमालयात आणि नेपाळ मध्ये रस्ते, रिसॉर्ट्स आणि जलविद्युत प्रकल्पांसाठी जी अनियंत्रित जंगलतोड आणि उत्खनन सुरू आहे, त्याचे परिणाम हम्बोल्ट ने वर्तविलेल्या जुन्या निरीक्षणापर्यंत जाऊन पोहोचतात.
हम्बोल्ट च्या या अद्भुत निसर्गदृष्टीचे जगभरात कौतुक झाले. जर्मनीचे महान साहित्यिक आणि निसर्गप्रेमी गटे यांच्याशी त्याची घनिष्ठ मैत्री होती. गटे हम्बोल्टच्या ज्ञानाने इतके प्रभावित झाले होते की ते म्हणायचे, "हम्बोल्ट सोबत घालवलेला एक दिवस हा वर्षानुवर्षे पुस्तकी अभ्यास करण्यापेक्षा जास्त समृद्ध करणारा असतो." दोघांनी मिळून बेडकाच्या पायातील स्नायू आणि विजेचा संबंध तपासणारे प्रयोगही केले. इतकेच नाही तर पुढे उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारा चार्ल्स डार्विन हा तर हम्बोल्ट ला आपला आदर्श मानत असे. डार्विनने जेव्हा आपल्या ऐतिहासिक बीगल जहाजावरून जगाचा प्रवास सुरू केला, तेव्हा त्याच्या केबिन मध्ये हम्बोल्टचे पुस्तक नेहमी असे. डार्विनने स्वत: म्हटले होते की, "हम्बोल्टचे लिखाण वाचून माझ्या मनात जी निसर्गाबद्दलची जिज्ञासा निर्माण झाली, त्याशिवाय मी कधीही या प्रवासाला निघालो नसतो."
आज आपल्याला हवामानाचा अंदाज मोबाइलवर एका क्लिकवर मिळतो; परंतु हम्बोल्टच्या काळात कोणतीही आधुनिक संप्रेषण यंत्रणा नव्हती. लंडनहून अमेरिकेत किंवा युरोपमधून रशियात संदेश पोहोचायला कित्येक आठवडे लागत. अशा काळात त्याने इंग्लंड, अमेरिका आणि वयाच्या साठाव्या वर्षी रशियाचा हजारो मैलांचा प्रवास घोडागाडी आणि जहाजांद्वारे केला. सायबेरियाच्या अतिशय गोठवणार्या थंडीत त्याने तब्बल १५,००० किलोमीटरचे अंतर पार केले, ५३ नद्या ओलांडल्या आणि १२,०००हून अधिक घोडे वापरले. याच रशिया दौर्यात हम्बोल्टने एक अभूतपूर्व वैज्ञानिक भाकीत वर्तवले आणि शोधही लावला. रशियाच्या उरल पर्वतरांगांमध्ये सोन्याचे साठे सापडत होते. परंतु हम्बोल्टने दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलच्या जंगलांमध्ये केलेल्या भूगर्भीय अभ्यासावरून वेगळाच अंदाज लावला होता. त्याच्या निरीक्षणानुसार, निसर्गात जिथे जिथे सोन्याचे आणि प्लॅटिनमचे साठे विशिष्ट प्रकारच्या ज्वालामुखी खडकांसोबत आढळतात, तिथे हिरे असण्याची शक्यता दाट असते. उरल पर्वतातील सोन्याच्या खाणी मधील मातीची रचना ब्राझील सारखीच आहे हे लक्षात येताच त्याने रशियाच्या सम्राज्ञीला वचन दिले की, "मी या सोन्याच्या खाणींच्या परिसरातूनच तुम्हाला हिरे शोधून दाखवेन." त्याचे हे भाकीतही खरे ठरले आणि ५ जुलै १८२९ रोजी त्याच्याच मार्गदर्शनाखाली उरल पर्वताच्या पर्म भागात रशियातील पहिला मटारच्या दाण्याएवढा मोठा नैसर्गिक हिरा शोधण्यात त्याला यश आले. याशिवाय, त्याने संपूर्ण रशिया मध्ये हवामान मोजणार्या वेधशाळांचे जाळे तयार केले.
हम्बोल्ट केवळ निसर्गाचा अभ्यासक नव्हता, तर तो मानवी स्वातंत्र्याचा आणि मानवाधिकारांचाही पुरस्कर्ता होता. दक्षिण अमेरिकेच्या प्रदीर्घ प्रवासानंतर जेव्हा हम्बोल्ट पॅरिसला परतला तेव्हा त्याची भेट दक्षिण अमेरिकेला स्पॅनिश राजवटीतून मुक्त करण्याचे स्वप्न पाहणार्या महान क्रांतिकारक सायमन बोलिव्हार यांच्याशी झाली. या भेटी दरम्यान हम्बोल्टने बोलिव्हार यांना म्हटले की, "तुमची मातृभूमी ही कोणत्याही युरोपीय देशापेक्षा जास्त समृद्ध आहे आणि ती स्वत:चे स्वातंत्र्य टिकवण्यास पूर्णपणे सक्षम आहे." यामुळे प्रेरित झालेल्या सायमन बोलिव्हार यांनी पुढे दक्षिण अमेरिकेचा स्वातंत्र्यलढा यशस्वी केला.
पुढे जेव्हा हम्बोल्टने अमेरिकेचा प्रवास केला, तेव्हा त्यांनी राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांची भेट घेतली. वॉशिंग्टन मध्ये जेफरसन यांनी त्याचे मोठ्या आदराने स्वागत केले, कारण हम्बोल्टकडे दक्षिण अमेरिकेचा संपूर्ण नकाशा होता. अमेरिकेच्या याच प्रवासादरम्यान हम्बोल्टने अतिशय विदारक सत्य पाहिले. एका बाजूला स्वातंत्र्याची भाषा बोलणारे अमेरिकन नेते आणि दुसरीकडे त्यांच्याच कापसाच्या शेतात चाबकाचे फटके खात अहोरात्र राबणारे कृष्णवर्णीय गुलाम. थॉमस जेफरसन स्वत: अनेक गुलामांचे मालक होते हे पाहून हम्बोल्टला मोठा धक्का बसला. त्याने अमेरिकेतील या दुटप्पीपणावर आणि अमानुष गुलामगिरीवर जाहीरपणे अत्यंत कडक शब्दांत टीका केली.
या महान प्रवासी वैज्ञानिकाच्या मनात भारताविषयी आणि विशेषत: हिमालयाविषयी अत्यंत ओढ होती. त्याला हिमालयाची उंची, तिथले चुंबकीय क्षेत्र आणि तिथल्या वनस्पतींचा अभ्यास करून त्याची तुलना दक्षिण अमेरिकेच्या अँडीज पर्वतांशी करायची होती. परंतु त्याचे वसाहतवादाच्या विरोधातील क्रांतिकारक विचार पाहून भारतातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी प्रचंड घाबरली. हम्बोल्ट भारतात आल्यास तो ब्रिटिशांच्या शोषणावर लिहील, या भीतीने ब्रिटिश सरकारने त्याला भारतात येण्यासाठी आवश्यक असणारा परवाना देण्यास साफ नकार दिला. भारताला आणि हिमालयाला प्रत्यक्ष भेट न देता येणे, हे हम्बोल्टच्या आयुष्यातील सर्वात मोठे शल्य होते.
अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट यांच्या निसर्गदृष्टीची कमाल अशी की, हिमालयावर प्रत्यक्ष पाऊल न ठेवताही त्यांनी तिथल्या जैवविविधतेबद्दल १८०० सालाच्या सुरुवातीलाच अचूक वैज्ञानिक भाकीत वर्तवले होते. विज्ञानाच्या इतिहासात आज याला ‘हम्बोल्ट्स एनिग्मा’ किंवा ‘हम्बोल्टचे कोडे’ म्हणून ओळखले जाते. त्या काळी असा समज होता की, जास्तीत जास्त जैवविविधता फक्त भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या विषुववृत्तीय मैदानी जंगलांतच आढळू शकते. परंतु हम्बोल्टने दक्षिण अमेरिकेतील चिम्बोराजो पर्वतावरील निरीक्षणावरून या समजाला आव्हान दिले. त्यांनी स्पष्ट केले की पर्वतांवरील जैवविविधता ही केवळ त्यांच्या अक्षांशावर नसून, उंची, सूक्ष्म-हवामान आणि आर्द्रता यांच्या परस्पर संबंधांवर अवलंबून असते. पर्वत हे नवनवीन प्रजातींच्या उत्क्रांतीचा जणू पाळणा असतो आणि बदलत्या जागतिक हवामानात जुन्या प्रजातींना सुरक्षित ठेवणारे संग्रहालयही बनतात, हा हम्बोल्टचा सिद्धांत आजचा आधुनिक विज्ञान पूर्णपणे मान्य करतो. म्हणूनच, उष्णकटिबंधाच्या बाहेर असूनही आज पूर्व हिमालय हा जगातील सर्वात मोठा जैवविविधतेचा ‘हॉटस्पॉट’ मानला जातो. भारतातील मैदानी उष्णकटिबंधीय प्रदेशांपेक्षा, उदा. मध्य प्रदेश किंवा छत्तीसगड, यांच्या पेक्षाही पूर्व हिमालयातील पर्वतरांगांमध्ये जैविक विविधता कित्येक पटीने जास्त आढळते; जी थेट दोनशे वर्षे जुन्या ‘हम्बोल्ट्स एनिग्मा’ सिद्धांताला सिद्ध करते.
हम्बोल्ट यांच्या अचाट भाकितामागील वैज्ञानिक तर्क समजून घेतला की त्यांच्यातील जागतिक शास्त्रज्ञाची ताकद लक्षात येते. १८२९ च्या रशियन मोहिमे दरम्यान वयाच्या ६०व्या वर्षी हम्बोल्ट सायबेरिया ओलांडून थेट अल्ताय पर्वतरांगांपर्यंत आणि चिनी सीमेपर्यंत पोहोचले. तिथून त्यांना मध्य आशियाच्या पर्वतांची भव्यता दिसत होती, पण राजकीय कारणांमुळे ब्रिटिशांनी त्यांना हिमालयात येण्याची परवानगी नाकारली. परिणामी, ते हिमालयाला किंवा कराकोरमला प्रत्यक्ष भेट देऊ शकले नाहीत. परंतु त्यांची विचारशक्ती पाहा. दक्षिण अमेरिकेतील ज्या चिम्बोराजो पर्वताच्या अनुभवावरून त्यांनी हा सिद्धांत मांडला, तो चिम्बोराजो आणि हिमालय यांच्यात भौगोलिकदृष्ट्या तब्बल १४,५०० किलोमीटरहून अधिक अंतर आहे. इतक्या प्रचंड दूर अंतरावर असूनही आणि हिमालयाची माती पायाला न लागताही, हम्बोल्टने केवळ निसर्गाच्या नियमांचे जागतिक गणित मांडून हिमालयातील अफाट जैवविविधतेचे कोडे अचूकपणे सोडवले होते. हाच तो द्रष्टेपणा होता, ज्याने केवळ एका पर्वतावरून संपूर्ण पृथ्वीवरील निसर्गाच्या एकात्मतेचा नकाशा तयार केला आणि तात्पुरत्या फायद्यासाठी होणार्या जंगलतोडी विरुद्ध आवाज उठवला. जर आपल्याला पृथ्वीवर जैवविविधता राखायची असेल तर नेपाळ द्वारे हिमालयाचा आलेला आक्रोश हा केवळ नेपाळ पुरता नसून आपणा सर्वानाच धोक्याचा इशारा आहे असे समजायचे.
दक्षिण अमेरिका आणि रशियाच्या प्रवासानंतर हम्बोल्टने आपले अनुभव ग्रंथांच्या स्वरूपात मांडायला सुरुवात केली. त्याच्या ‘कॉसमॉस’ या पुस्तकांनी संपूर्ण जगात खळबळ उडवून दिली होती. या पुस्तकांमध्ये निष्कारण वैज्ञानिक आकडेवारी नव्हती, तर निसर्गाच्या सौंदर्याचे अत्यंत काव्यात्मक वर्णन होते. नवीन खंड बाजारात येताच काही तासातच त्याच्या हजारो प्रती विकल्या जायच्या. परंतु ज्या वैज्ञानिकाने संपूर्ण जगाला वैज्ञानिक विचारांची श्रीमंती दिली, त्याचे वैयक्तिक आयुष्य मात्र आर्थिकदृष्ट्या अत्यंत हलाखीचे राहिले. हम्बोल्टने आपल्या आयुष्यातील सर्व प्रवास आणि पुस्तकांचे महागडे मुद्रण स्वत:च्या पैशाने केले होते, ज्यामुळे त्याची संपत्ती संपली. जवळपास २० वर्षे पुस्तके छापण्यासाठी पॅरिस मध्ये घालवल्यानंतर, कर्जात बुडाल्यामुळे त्याला नाइलाजाने पॅरिस सोडावे लागले. तो आपले मूळ जन्मस्थान असलेल्या बर्लिन, जर्मनी येथे परतला. वयाची ऐंशी वर्षे पार केल्यानंतरही तो बर्लिन मधील एका छोट्या साध्या भाड्याच्या खोलीत राहून लेखन करत असे. ६ मे १८५९ रोजी, वयाच्या ८९व्या वर्षी या वैज्ञानिक किमयागाराने अत्यंत गरिबीत आणि एकटेपणात जगाचा निरोप घेतला.
नेपाळचा आक्रोश आणि हम्बोल्टचा विसरलेला संदेश आज दोनशे वर्षांनंतर जेव्हा नेपाळ मधील महापूर, हिमालयातील ढगफुटी किंवा उत्तराखंड मधील भूस्खलनाच्या बातम्या वाचतो, तेव्हा आपण निसर्गाच्या नावाने खडे फोडतो. परंतु ही निसर्गाची चूक नाही, तर आपणच त्याच्या जिवंत जाळ्यातील धागे तोडल्याचा हा अटळ परिणाम आहे. ज्या वैज्ञानिकाने संपूर्ण जगाला निसर्गाचा आदर करायला शिकवले, त्याला ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पाऊलही ठेवू दिले नाही. कदाचित तो हिमालयात आला असता, तर त्याने दोनशे वर्षांपूर्वीच आपल्या या अतिसंवेदनशील पर्वतरांगांचे रक्षण कसे करायचे याचा वस्तुपाठ आपल्याला दिला असता. अलीकडेच झालेल्या त्याच्या जयंती निमित्त, नेपाळच्या या पुराच्या पार्श्वभूमीवर या द्रष्ट्या वैज्ञानिकाच्या विचारांचे स्मरण करणे आणि निसर्गाशी पुन्हा नाते जोडणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
©️ डॉ. सुलभा कुलकर्णी
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
====================

0 टिप्पण्या