भारतात सर्वात पाहिले.. आधार कार्ड कोणी काढले ?

 

भारतात सर्वात पाहिले..  आधार कार्ड कोणी काढले ? 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 14/9/2026 :

भारतातील सर्वात पहिले आधार कार्ड महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यामधील शहादा तालुक्यातील टेंभली गावच्या रंजनाताई सदाशिव सोनावणे यांना २९ सप्टेंबर २०१० रोजी मिळाले होते. त्या आधार कार्ड या ऐतिहासिक योजनेच्या पहिल्या लाभार्थी ठरल्या असून, टेंभली हे देशातील पहिले आधार कार्ड मिळालेले गाव म्हणून प्रसिद्ध झाले आहे. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते हे कार्ड त्यांना सुपूर्द करण्यात आले होते. 

देशातील प्रत्येक नागरिकाला एक विशिष्ट ओळख मिळावी आणि सरकारी योजनांचा लाभ थेट त्यांच्या पर्यंत पोहोचावा या उद्देशाने केंद्र सरकारने आधार कार्ड योजना सुरू केली. मात्र, या ऐतिहासिक योजनेच्या पहिल्या लाभार्थी महिलेच्या जीवनात मात्र आजही संघर्ष कायम आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातल्या टेंभली या एका छोट्याशा पाड्यावर राहणाऱ्या रंजनाताई सदाशिव सोनवणे या देशातील पहिल्या आधार कार्ड धारक ठरल्या होत्या. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना हे कार्ड प्रदान करण्यात आले. मात्र, या घटनेला १५ वर्षांहून अधिक काळ उलटूनही, देशातील या पहिल्या आधार कार्ड लाभार्थी महिलेच्या परिस्थितीत आजही कोणताही लक्षणीय बदल झालेला नाही.

एका मोठ्या सरकारी योजनेचा 'चेहरा' बनूनही, आज रंजनाताई सोनवणे यांना 'आधार कार्ड तर भेटले, पण आधार भेटला नाही' अशी भावना व्यक्त करावी लागत आहे. त्यांच्या या शब्दात सरकारी योजनांच्या अंमलबजावणुकीतील त्रुटी आणि सामान्यांचे आजही सुरू असलेले दुर्लक्षित जीवन अधोरेखित होते.

आधार कार्ड हे सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी महत्त्वाचे ओळखपत्र बनले आहे. असे असतानाही, देशातील पहिल्या लाभार्थी असलेल्या रंजनाताईंना आजही त्यांच्या स्वतःच्या नावावर घरकुल मिळालेले नाही. त्यांना मिळालेले घरकुल मुलांच्या नावावर आहे. आजवर अनेक सरकारी योजना आल्या आणि गेल्या, पण त्यातील कोणतीही योजना रंजनाताईंच्या जीवनात 'आधार' देऊ शकली नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे.

रंजनाताईंनी अत्यंत कष्ट करून आपल्या मुलांना मोठे केले, त्यांना शिक्षण दिले. आपल्या कुटुंबाला दारिद्र्याच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले. मात्र, आजही त्यांच्या मुलांना नोकरी मिळालेली नाही. बेरोजगारी आजही त्यांच्या कुटुंबासमोर एक मोठे आव्हान म्हणून उभी आहे. मुलांना चांगले शिक्षण देऊनही नोकरी नसल्यामुळे, रंजनाताई सोनवणे आजही शेतात मजुरीचे काम करून आपल्या घराचा गाडा हाकत आहेत. पहिल्या आधार कार्ड लाभार्थीचा सन्मान मिळाल्या नंतरही, त्यांना आजही आपल्या उदरनिर्वाहासाठी कठोर परिश्रम करावे लागत आहेत.

रंजनाताई सोनवणे यांचे हे उदाहरण आहे की, योजना कितीही चांगल्या असल्या तरी त्या प्रभावीपणे आणि योग्य व्यक्ती पर्यंत पोहोचणे किती महत्त्वाचे आहे. देशातील पहिल्या आधार कार्ड लाभार्थीला पंधरा वर्षा नंतरही मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत असेल, तर कोट्यवधी सामान्य नागरिकांची काय अवस्था असेल, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. सरकारने रंजनाताईंच्या समस्येकडे लक्ष देऊन त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला खऱ्या अर्थाने 'आधार' द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्रशांत जव्हेरी, नंदुरबार

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

संदर्भ : इंटरनेट *═━═━═━═━═━═━═━═━═━═━═*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या