पिके शेतात असतानाच पंचनामे करा; कृषिमंत्री भरणे यांची मागणी
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 12/9/2026 :
राज्यातील १९ जिल्ह्यांतील ८३ तालुक्यांमध्ये २० दिवसांहून अधिक काळ पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे खरीप पिके धोक्यात आली असून, काही ठिकाणी पिके वाया जाण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर पीकविमा कंपन्यांनी तातडीने पंचनामे करून भरपाईची रक्कम निश्चित करावी, अशी मागणी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी (ता. ८) केली.
पिके शेतात असतानाच पंचनामे झाले नाहीत, तर नंतर पिकेच शेतात नसल्यामुळे पंचनामे करण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे पीकविमा कंपन्यांना तातडीने निर्देश द्यावेत, अशी मागणी भरणे यांनी केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपन्यांना याबाबत निर्देश देणारे पत्र तातडीने दिले जाईल, असे सांगितले.
दरम्यान, १३ सप्टेंबरपासून पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र सध्या छत्रपती संभाजीनगर, सांगली, नाशिक, लातूर आणि पुणे परिसरातील काही भागांत २० दिवसांहून अधिक काळ पावसाचा खंड आहे. त्यामुळे या भागातील परिस्थिती चिंताजनक असल्याची माहिती कृषी विभागाच्या सादरीकरणादरम्यान कृषी सचिव परिमल सिंह यांनी दिली.
राज्यात ‘एल निनो’च्या प्रभावामुळे ८३ तालुक्यांत २० दिवसांहून अधिक काळ पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे तेथील पिके धोक्यात आली आहेत. शेतकरी मदतीची मागणी करत असून, पीकविम्याबाबतही चिंताक्रांत आहेत.
कृषिमंत्री भरणे यांनी पीक कापणी प्रयोगाबाबतही चिंता व्यक्त केली. कंपन्यांचे पीक कापणी प्रयोगाबाबतचे धोरण स्पष्ट नसल्याचे त्यांनी म्हटले. पिके पक्व होण्याआधीच करपून जाण्याचा धोका असल्याने आत्ताच पीक कापणी प्रयोग करावा, अशी मागणी त्यांनी केली.
काही कंपन्या पीकच शेतात नसल्याचा दावा करून पीक कापणी प्रयोग करत नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. अशा कंपन्या दाद देत नसल्याने त्यांना आताच पत्र लिहून पीक कापणी प्रयोग करण्याबाबत निर्देश द्यावेत, अशी मागणी भरणे यांनी केली.
यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पीकस्थिती आणि पीकविम्याचा आढावा घेतला. त्यानंतर कंपन्यांना तातडीने पत्र लिहून कळविले जाईल, असे सांगितले.
📊 जिल्हानिहाय पावसाचा खंड
कृषी विभागाच्या जिल्हानिहाय आकडेवारीनुसार, २.५ मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झालेला कालावधी पावसाचा खंड म्हणून ग्राह्य धरला आहे.
३० दिवसांपेक्षा अधिक खंड असलेले ११ जिल्हे :
अहिल्यानगर (३८), पुणे (३८), बुलडाणा (३७), नाशिक (३७), सांगली (३७), सातारा (३७), बीड (३४), छत्रपती संभाजीनगर (३४), धाराशिव (३४), सोलापूर (३४), परभणी (३०).
२५ ते ३० दिवसांचा खंड :
धुळे (२६), जळगाव (२६), जालना (२६).
२० ते २५ दिवसांचा खंड :
अकोला (२३), वाशीम (२३), अमरावती (२२), वर्धा (२१), नागपूर (२०).
* तालुकानिहाय पावसाचा खंड
३८ दिवस : अहिल्यानगर – कर्जत, पुणे – शिरूर.
३७ दिवस : बुलडाणा – खामगाव, नाशिक – नांदगाव, येवला, पुणे – बारामती, दौंड, पुरंदर, सांगली – आटपाडी, सातारा – फलटण, माण.
३५ दिवस : अहिल्यानगर – संगमनेर, नाशिक – देवळाली, कळवण.
३४ दिवस : अहिल्यानगर – शेवगाव, बीड – गेवराई, छत्रपती संभाजीनगर – पैठण, धाराशिव – परांडा, पुणे – इंदापूर, सोलापूर – माळशिरस.
३३ दिवस : सोलापूर – सांगोला.
३१ दिवस : सोलापूर – बार्शी, मोहोळ.
* शेतकरी चिंतेत
दीर्घकाळ पाऊस न झाल्याने जमिनीतील ओलावा कमी होण्याची शक्यता आहे. खरीप पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात पावसाचा खंड पडल्याने पिकांना पाण्याचा ताण बसू शकतो. विशेषतः हलक्या जमिनीतील पिकांवर त्याचा परिणाम अधिक जाणवण्याची शक्यता आहे.
त्यामुळे पुढील काही दिवसांत पाऊस कुठे आणि किती प्रमाणात होतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. खरीप हंगाम वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत आहेत.
0 टिप्पण्या