निळ्या गोळ्यांची जन्म कहाणी

निळ्या गोळ्यांची जन्म कहाणी 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 15/9/2026 :

औषध शोधत होते हृदयविकारासाठी, पण मामला काही वेगळाच निघाला. विज्ञानाच्या इतिहासात काही शोध असे असतात की त्यामागे मोठी योजना असते, प्रचंड संशोधन असतं, शेकडो प्रयोग असतात, आणि शेवटी मिळतं ते अगदी अपेक्षे पेक्षा वेगळंच. पण या एका औषधाचा इतिहास इतका भन्नाट आहे की त्याची कहाणी ऐकताना विज्ञान, नशीब आणि विनोद तिन्ही एकाच टेबलावर बसल्या सारखे वाटतात.

सन १९८९. फायझरच्या प्रयोगशाळेत वैज्ञानिक एका नवीन औषधावर काम करत होते. त्याचं सांकेतिक नाव होतं UK-92,480. हृदयविकारात जाणवणाऱ्या छातीतल्या वेदना कमी करणे हा या औषधाचा उद्देश होता. हृदयाच्या आसपासच्या रक्तवाहिन्या रुंद करून, रक्तदाब कमी करायचा आणि अंगीना मुळे होणारी छातीतली वेदना कमी करायची. असा अगदी सरळ हिशेब होता. प्रयोग सुरू झाले. पण औषधाने वैज्ञानिकांच्या अपेक्षांना फारसं महत्त्व दिलं नाही. औषध संशोधनाच्या भाषेत सांगायचं तर, प्रोजेक्ट जवळ जवळ फेल. १९९३साली Pfizer ने या  औषधावर काम बंद करण्याचा विचार सुरू झाला. आणि इथेच खरी गंमत सुरू झाली.

चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्या पुरुष रुग्णांकडून उरलेल्या गोळ्या परत घेण्यासाठी नर्स गेल्यावर अनेक पुरुषांनी गोळ्या परत करण्यास नकार दिला. आता प्रश्न पडला, गोळ्या काम करत नाहीत, मग हे गृहस्थ एवढे हट्टाला का पेटले? वैज्ञानिकांनी थोडं अधिक बारकाईने निरीक्षण केलं. आणि त्यांना औषधाचा कपाळावर हात मारावा असा एक साईड इफेक्ट नजरेस आला, ज्याची कल्पना करताना कदाचित त्या औषधाच्या मूळ संशोधकांनाही नव्हती. औषध हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर अपेक्षित परिणाम करत नव्हतं, पण शरीराच्या आणखी एका म्हणजे कमरेखालच्या रक्तवाहिन्यांच्या व्यवस्थेवर त्याचा लक्षणीय परिणाम होत होता.

आता संशोधकांसमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला, आपण अपयशी ठरलेल्या औषधाला निरोप द्यायचा की त्याने कुठे यश मिळवलंय ते पुन्हा निरखून पाहायचं? Pfizer ने दुसरा पर्याय निवडला. आणि वैद्यकीय संशोधनाने अक्षरशः दिशा बदलली. हृदयासाठी तयार केलेलं औषध आता एका अगदी वेगळ्या समस्येवर उपयोगी पडू शकतं, हे लक्षात आलं. त्यानंतर या नव्या उपयोगासाठी स्वतंत्र क्लिनिकल चाचण्या घेण्यात आल्या. यावेळी निकालांनी वैज्ञानिकांना निराश केलं नाही. उलट या वेळी औषधाने अपेक्षेपेक्षा जास्तच काम केलं. 

आणि मग २७ मार्च १९९८. अमेरिकेच्या FDA ने या औषधाला मान्यता दिली. औषधाचं नाव? आता एवढी प्रस्तावना केल्यानंतर नाव लपवून काय उपयोग? या औषधाचं नाव Viagra. जवळ जवळ रद्दीच्या टोपलीत जाणारं औषध एका वेगळ्याच कारणासाठी जगप्रसिद्ध झालं.

आणि Pfizer चं काय? त्यांच्या प्रयोगशाळेतला हा ‘अपयशी’ प्रयोग बाजारात गेल्यानंतर प्रचंड यशस्वी ठरला. अवघ्या दोन वर्षांत Viagra ची जागतिक विक्री एक अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडून गेली. म्हणजे विज्ञानाने वैज्ञानिकांना एक भन्नाट धडा शिकवला, प्रत्येक अपयश खरंच अपयश असतंच असं नाही. आणि म्हणूनच Viagra ची कथा आपल्याला सांगते, विज्ञानात प्रयोग कधीच वाया जात नाहीत. कधी अपेक्षित परिणाम मिळतो, तर कधी अनपेक्षित परिणाम मिळतो. आणि कधी कधी तर परिणाम इतका अनपेक्षित असतो की त्यासाठी औषधाचं नवीनच नाव ठेवावं लागतं.

©️ बोभाटा

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 ═━═━═━═━═━═━═━═━═━═━═

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या