‼️ मुंबईचा वडापाव ‼️

 


‼️  मुंबईचा वडापाव  ‼️

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 20/9/2026

मुंबईचा वडापाव म्हणजे फक्त खाणं नाही, तर मुंबईकरांच्या जिभेवरची एक वेगळीच भावना. याच मुंबईच्या अस्सल वडापावच्या चवीने दिल्लीतील एका तरुण कंटेंट क्रिएटरला चक्क विमान पकडून मुंबईत आणलं आहे. दिल्लीत वडापाव खाल्ल्या नंतर त्याची चव तिला फारशी आवडली नाही. मात्र, मुंबईच्या वडापावची अस्सल चव अनुभवायचीच, असा तिने निर्धार केला. मग काय, वेळ न दवडता तिने थेट दिल्ली ते मुंबई विमानप्रवास केला.

या भन्नाट वडापावसाठी विमानप्रवास, मुंबईतील कॅब, हॉटेल आणि इतर खर्च मिळून तिने १५ हजार रुपयांहून अधिक पैसे खर्च केले. पण एवढा सगळा खर्च करून ती मुंबईत आली कशासाठी? तर फक्त २० रुपयांचा वडापाव खाण्यासाठी. मुंबईत पोहोचल्या नंतर तिने एका प्रसिद्ध रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर जाऊन गरमागरम वडापावचा आस्वाद घेतला. वडापाव खाल्ल्या नंतर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्या सारखा होता. आतापर्यंत खाल्लेल्या वडापाव मध्ये हा सर्वोत्तम आहे, अशा शब्दांत तिने मुंबईच्या वडापावचं कौतुक केलं.

तिच्या या अनोख्या खाद्यप्रेमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. २० रुपयांच्या वडापावसाठी १५ हजारांचा प्रवास पाहून अनेकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. कुणी तिच्या वडापावप्रेमाचं कौतुक केलं, तर कुणी 'मुंबईचा वडापाव एवढा भारी आहे की विमानाचं तिकीटही स्वस्त वाटलं' अशा मजेशीर कमेंट्स केल्या. एक मात्र खरं, मुंबईच्या वडापावची चव लागली की माणूस मुंबई पासून कितीही लांब असला, तरी मन मात्र पुन्हा मुंबईतच येतं.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या