ज्येष्ठा गौरींचा आशिर्वाद
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 20/9/2026
नुकतेच घरचे गौरी गणपती येऊन गेलेत. जाताना आशिर्वाद आणि सकारात्मक ऊर्जा देऊन जातात. ही ऊर्जा आपल्याला त्यांच्या पुढील आगमनापर्यंत पुरते. एक अनुभवले तर गौरी गणपती, महालक्ष्मी ह्यांचे आगमन आपल्याला सगळ्यांना फलदायी असत. ह्या दरम्यान संसारात कुठल्याही अडचणी आल्यात तरीही आपले हे उत्सव ह्या संकटाना अडचणींना दूर सारून उत्साहात आनंदात साजरे होतात. हा अनुभव जवळपास आपल्या सगळ्यांनाच येतो.
संसारावरून आठवले, संसार म्हणजे एक आनंददायी पण खाचखळग्यातून होणारा प्रवास. ह्या प्रवासात आनंद, सुख, समाधान, सरळसोट प्रवासाबरोबरच कधी कधी दुःख अडचणी घाटासारखा नागमोडी कठीण प्रवास हा अटळच. ह्यावरून अमिताभ बच्चन ह्यांच्या तोंडून एका शायरीच्या दोन ओळी आठवल्या.
अमिताभ बच्चन ह्यांना हा कलात्मक साहित्याचा वारसा त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच हरिवंशराय बच्चन ह्यांच्या कडूनच मिळाला. हरिवंशराय ह्यांना त्यांच्या साहित्यिक प्रवासामुळे न ओळखणारा माणूस सापडणारच नाही.
हरिवंशराय बच्चन ह्यांची शायरी ऐकली की "व्वा" हे शब्द आपल्या तोंडून लगेच बाहेर. पडतात. मातापित्यातील कौशल्य, सद्गुण आपोआपच मुलांमध्ये झिरपत येतातच. त्यामुळे त्यांचे सुपुत्र अमिताभ बच्चन ह्यांनी नुकत्याच मस्त शायरीच्या लिहिलेल्या दोन ओळी वाचनात आल्यात.
अमिताभ बच्चन म्हणजे एक अतिशय संयमित, परिपक्व व्यक्तिमत्त्व. त्यांनी लिहीलेल्या शायरीच्या दोन ओळी पुढीलप्रमाणे.
"झरनोंसे इतना मधूर संगीत कभी न सुनाई देता
अगर राहोंमे उनके पत्थर न होते।।।
संसाराच्या ह्या प्रवाहात सुखदुःख, अनंत अडीअडचणी ह्या येतात आणि जातात. वळवाच्या पावसासारखा किंवा उनपावसासारखा ह्यांचा खेळ चालूच असतो. बरेचदा आपण ह्या अडचणींना आणि त्यातून उद्भवणाऱ्या अनंत समस्यांना कंटाळून जातो. मनोमन खूप उद्वेग निर्माण होतो.शेवटी एक भलेमोठे प्रश्नचिन्ह स्वतः समोर आपण तयार करतो आणि मनातून देवाला वा नियतीला विचारतो , "हे माझ्याच वाट्याला का?"
खरतर हा प्रश्नच तसा निरर्थकच. कारण आपले विधीलिखीत, आपले कर्म ,आपले नशीब ह्यांचा आधीच आखलेला लेखाजोखा तयार असतो फक्त तो हिशोब टप्प्याटप्प्याने आपल्यासमोर येतो. अर्थात ह्या गोष्टी मानल्या तर किंवा ह्यावर विश्वास असला तर ख-या. परदुःख नेहमीच प्रत्येकाला शीतल वाटत असतं आणि आपली संकट खूप मोठी हा सतत भास होत असतो. पण हे सगळं सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत घडतं.
कणखरं,ताकदवान, संयमी लोक मात्र ह्याकडे वेगळ्याच दृष्टीकोनातून बघत असतात. आपण सगळे तोलण्यास समर्थ म्हणून हे झेलायला सगळ्यांमधून आपली निवड झाली असा सहजसुलभ खाक्या असतो त्यांचा. शिवाय भोग हे कुणालाच चुकले नाही म्हणून सगळ्यातून तावूनसुलाखून बाहेर पडायचे हा ह्या विचारवंत लोकांचा मोठेपणा.
"टाकीचे घाव सोसल्याखेरीज देवपण येत नाही" ह्या म्हणीवर विश्वास ठेवून ही मंडळी सगळी संकट, सगळी आव्हानं लिलया पेलतात.त्यांचा हा बाणा मला खूप भावून जातो.
सरासरी माणसाचं जीवन म्हणजे औटघटकेचं. काही वर्षांचा काळ आपल्याला ह्या रंगमंचावर वेगवेगळया भुमीका करीत काढायचा असतो. मी मनाशी एक खूणगाठ नेहमी बांधून ठेवते ,फक्त आपल स्वतः च वागणं माझ्या हाती आहे, इतरांच वागणं माझ्या हाती नाही त्यामुळे वाट ही माझीच मला शोधायची आहे. मग हा काळ आपण रडूनभेकून, कुरकुरून काढण्यापेक्षा दिलखुलासपणे प्रसंगी हसतखेळत दुःख झेलत काढला तर हे दुःख आपल्याला मोठ्या हिमालयाएवढं न वाटता छोट्याश्या टेकडीएवढंच भासेल.
कुठलीही संकट झेलून, आव्हानं स्विकारून त्यानंतर मिळालेलं यश, सुखाचे दिवस आपल्याला खूप काही देऊन जातात हे नक्की. अळणी जीवन जगण्यापेक्षा कधी खारट, कधी तिखट, कधी आंबट तर कधी गोड हे जीवन जगतांना आपल्याला खूप सारे अनुभव मिळतात, खूपसारी जिवाभावाची माणसे जोडल्या जातात. आपल्यातला कणखरपणा वाढून आपणच आपल्याला शिकवायला लागतो, मार्ग कसा काढायचा ह्याची जाण देतो.
"दु:ख देऊ नकोस अस,
मी कधीच म्हणणार नाही,
माझीच निवड का केलीस
हा प्रश्नही विचारणार नाही,
मागणं एकच देवा तुझ्यापाशी,
पंखात माझ्या बळ दे,
हसतखेळत दुःख झेलण्याची
ताकद मात्र मला दे, ताकद मात्र मला दे.
कल्याणी बापट(केळकर)
9604947256 बडनेरा,अमरावती
================
0 टिप्पण्या