मुंबईच्या गिरणगाव मधील
पहिली मिल कोणती ?
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 19/9/2026 :
आजच्या पिढीला माहिती नसेल की कधी एके काळी मुंबईत तब्बल १३० गिरण्या होत्या, यामुळे मुंबईला ‘गिरणगाव’ असेही म्हटले जाते. इथला कष्टकरी मराठी माणूस मोठ्या प्रमाणावर गिरणीत कामाला होता व अफाट मेहनत करून भरघोस पगार घेऊन आनंदी होता. पण तुम्हाला माहिती आहे का या गिरणगावातील सर्वात पहिली मिल कोणती?
१९ व्या शतकात मुंबई शहर कापूस उद्योगासाठी महत्त्वाचे ठिकाण होते. इथे खूप मोठ्या प्रमाणावर कापसाची आवकजावक होत असे. इथून मोठ्या प्रमाणावर कापूस ब्रिटनला निर्यात केला जात असे. अशातच भारतातील कापड उद्योगाला कलाटणी देणारी एक गोष्ट घडली. कावासजी नानाभाई दावर या पारसी श्रीमंत कुटुंबातील उद्योगपतीने २२ फेब्रुवारी १८५४ रोजी देशातील पहिल्या टेक्स्टाईल मिलचा मुंबईच्या ताडदेव येथे पाया रचला. देशातील या पहिल्या मिलचे नाव ‘द बॉम्बे स्पिनिंग अँड विव्हींग कंपनी’ होते. या मिलचा आराखडा ‘सर विल्यम फेअरबेम’ यांनी तयार केला. दोन वर्षांनी ७ फेब्रुवारी १८५६ रोजी या मिल मध्ये प्रोडक्शनला प्रत्यक्ष सुरुवात झाली.
यानंतर मुंबईने कधी पाठी फिरून पाहिलेच नाही. या मिलच्या यशस्वी सुरुवाती नंतर मुंबईत एकामागोमाग एक अनेक कापड गिरण्या सुरू झाल्या. प्रामुख्याने ताडदेव, परळ, लालबाग, वरळी, भायखळा या परिसरात गिरण्यांचे जाळे पसरले, ज्या भागाला पुढे 'गिरणगाव' (गिरण्यांचे गाव) म्हणून ओळखले जाऊ लागले. आणि देश कापड उद्योगात भरारी घेऊ लागला. या मिल्सने मुंबईचे आर्थिक महत्त्व वाढवले. तेव्हा पासून आजवर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

0 टिप्पण्या