🩺हेल्थ मंत्रा | आरोग्य मंत्र |🩺
साठी ओलांडलीय? मग अल्झायमरची ‘ही’ लक्षणं तुम्हाला माहित असायलाच हवीत!
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 22/9/2026 :
वय वाढले की विसरभोळेपणा आपोआपच येतो, असे म्हणतात, परंतु एखादी गोष्ट तुमच्या लक्षात आहे आणि तरुणवयातही ती तुम्ही चटकन विसरत असाल, तर तुमची ‘अल्झायमर’ आजाराशी मैत्री होत असल्याचे समजा.
पूर्वी हा आजार वयाची ऐंशी ओलांडलेल्या वृद्धांमध्ये आढळून येत होता. अलीकडे साठीजवळ पोहोचलेल्या व्यक्तींमध्ये अल्झायमर (स्मृतिभ्रंश) आजार दिसून येतो. स्मृतिभ्रंश हा स्मृती, विचार, भावना आणि वागणुकीत अडचणी निर्माण करणारा मेंदूचा आजार आहे.
देशात वयाची साठी-पासष्टी उलटलेल्या एकूण व्यक्तींच्या १० टक्के व्यक्ती या आजाराच्या विळख्यात सापडल्या आहेत. जसजसे वय वाढते, तसतशी या आजाराची टक्केवारी दुपटीने वाढते. जागतिक आरोग्य संघटनेने १९९४ मध्ये या आजाराची दखल घेतली.
अल्झायमर नावाच्या जर्मन मानसोपचार तज्ज्ञाने १९०१ मध्ये सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ‘ऑगस्टी डिटर’ नावाच्या ५० वर्षीय महिलेचे सर्वांत प्रथम स्मृतिभ्रंशाचे निदान केले, तेव्हापासून दरवर्षी २१ सप्टेंबर रोजी अल्झायमर दिवस जगभरात पाळला जातो.
सरासरी लोकसंख्येच्या १२ टक्के व्यक्ती वयाची साठी ओलांडलेल्या आहेत. त्यापैकी तीन टक्के ज्येष्ठ नागरिक या आजाराने त्रस्त आहेत. जगभर २०३० पर्यंत हा आकडा दुपटीने वाढेल असे संकेत जागतिक आरोग्य संघटनेने दिले आहेत. राज्यात २००६ मध्ये २ लाख ७ हजार ज्येष्ठ नागरिक अल्झायमरने त्रस्त होते. दर ३ सेंकदात एकाला स्मृतिभ्रंश होत असल्याचे दिसून येते.
अशी आहेत लक्षणे
घराचा पत्ता विसरणे
नातेवाइकांची नावे विसरणे
नवीन गोष्टी शिकण्यात अडचण
कपडे व्यवस्थित न घालणे
महिलांना जोखीम अधिक
बाळंतपण, पाळी, हल्लीचा ताणतणाव, स्पर्धा यांसारख्या बाबींमुळे महिलांमध्येही ताण वाढत आहे. उतारवयात त्याचे परिणाम दिसू लागतात. स्मृतिभ्रंश हा त्यातील एक आजार आहे. यात अगदी क्षुल्लक गोष्टीदेखील लक्षात रहात नाहीत. पुरुषांच्या तुलनेत महिलांना या स्मृतिभ्रंशाची जोखीम दीडपट अधिक असते.
अशी आहेत कारणे
मेंदूपेशींच्या क्रयशक्तीचा ऱ्हास
मेंदू आकुंचन पावणे
मेंदूपेशी खराब होणे
मेंदूला रक्तपुरवठा वाहिन्यांत अवरोध
विज्ञान युगात गोळ्या-औषधांनी म्हातारपण लांबविले असली तरी आजार कायम आहेत. स्मृतिभ्रंश (अल्झायमर) हा त्यापैकीच एक बेजार करणारा आजार आहे. ज्यांनी वयाची साधारणपणे पन्नाशी गाठली आहे आणि ज्यांना स्मरणशक्तीत बदल जाणवू लागला असेल, स्वभावात बदल दिसून आला असेल त्यांनी मानसोपचार अथवा मेंदूविकारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. चंद्रशेखर मेश्राम, ज्येष्ठ मेंदूरोग तज्ज्ञ, नागपूर
♻️ ♻️
0 टिप्पण्या