हरतालिका व्रत; पत्नीत्वाची हत्या

 हरतालिका व्रत; पत्नीत्वाची हत्या

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 13/9/2026 :

आज स्री जास्त काळजी करतांना दिसते पुरुषांची.कालही करीत होती.कारण ती प्रेम करते पुरुष नावाच्या आपल्या मित्रावर.या प्रेमासाठी ती स्वार्थपण न ठेवता सर्वस्व अर्पण करते पुरुषांना.बदल्यात पुरुष काय देतो तिला.असे म्हटले तर त्याचं उत्तर काहीच नाही असे येईल.

    नारदमुनी जेव्हा हिमवानाकडे विष्णुचा विवाहाचा प्रस्ताव घेवुन गेले.तेव्हा हिमवानाने आपली मुलगी पार्वतीला विचारलं,

       "बाळ तुला जगप्रतिपालक विष्णुची पत्नी व्हावं हे निमंत्रण आलं आहे.तुझं मत काय?"

        त्यावर पार्वती नम्रपणे म्हणाली,

        "तात,मी शिवाला वरले आहे.तेच माझे पती आहेत."

       "त्यांना हे माहीत आहे काय?"

       "नाही."

        "अगं,त्यांना माहीत हवं.निदान माहीत तरी करुन टाक."

       "कसं माहीत करु पिताश्री,ते तर निरंतर तपश्चर्याच करीत असतात.काही उपाय असेल तर सांगा.मी नक्कीच करेल."

        "बाळ तपश्चर्या कर.हवं तर व्रत कर.त्याने भगवान शंकर प्रसन्न होतील."

      यालाच हरिततालिका व्रत म्हणतात.हरित म्हणजे हरण करणे अर्थात इच्छेनुसार पती मिळवणे.आणि आलिका अर्थात सहाय्याने मैत्रीणींच्या सहाय्याने पती मिळवणे.पार्वती मैत्रीणीसमवेत जंगलात गेली.तिथे तपश्चर्या करु लागली.भगवान शंकराला पती म्हणुन खुश करण्यासाठी.....

        हिमवानाने सांगितलं की माझी मुलगी ज्यांच्याशी लग्न करेल तोच तिचा पती.नारदमुनी परत गेले.आजही समाजात पत्नी बनलेल्या या स्रिया हरितालिका व्रत करतात.पार्वतीची आठवण म्हणुन.कारण त्या पतीवर जास्त प्रेम करतात.पण बदल्यात तिला काय मिळतं.तेच काटे,तेच डोंगर,तेच शंकरासारखं पावसात भिजणं,तिचं सुखदुख न पाहता वर्षभर तपश्चर्येत लिन असल्यासारखं पुरुषांचं वागणं.नव्हे तर तिला मारझोड करणं.तसेच शुल्लक गोष्टीवरुन तिला सतत बोलणं.ही पत्नीत्वाची हत्या नाही तर काय?

    पुर्वी मातृसत्ताक कुटूंबपद्धती होती. स्रियांचे स्वयंवर होत. मुलीला मुलगा आवडीने पसंत करता यायचा.पण कालांतरानं काळ बदलला. बदलत्या काळानुसार मुलगी बघतांना बाप कधीच मुलीची पसंती विचारत नव्हता.जसा येईल वर त्याला मुलगी देत असे.कारण हुंडा पद्धती रुढ झाली होती.हा हुंडा म्हणुन मुलीच्या मेण्यामागे भरपुर द्रव्य दिल्या जात होतं.तेव्हा विनिमयाची पद्धत पैसा नसल्यानं ह्या गोष्टी.

  आजही समाजात कायद्यानुसार हुंडा देणे मागणे गुन्हा जरी असला तरी राजरोषपणे ही पद्धती सुरु आहे.पण एवढा हुंडा देवुनही वरपक्ष समाधानी राहात नाही.त्यांना अजुन लोभ सुटतो. त्यातच पुन्हा तिच्यामागे तगादा लावुन त्या वधुपित्याने अजुन पैसा न दिल्यास तिला सर्रास जाळुन टाकलं जातं.जरी ती हरितालिका व्रत करीत असेल तरीही..........

     आजची स्री बिचारी खुप प्रेम करते पुरुषावर.त्याच्या सुखासाठी झटते त्याच्यावर जीव ओवाळुन टाकते.दोघेही जरी एकच नोकरी करीत असतील तरी स्वयंपाकही घरी तिच करते.तो मात्र गप्प बसतो किंवा झोपतो.ही पुरुषी मानसिकता.तिच्यासाठी वर्षभराचे सारे व्रत असतात.तिने मदिरापान करु नये.तिने जुव्वा खेळु नये.तिने पुरुषांपुढे चार चौघात बोलु नये.सारीच बंधणं तिच्या वाट्याला.तो मात्र मोकाट जनावरांसारखा.......

      काही अपवाद सोडल्यास आजही मुलगी पाहायला आलेल्या मुलांला ती स्री चक्क नकार देवु शकत नाही.ती होकारच देते.कारण तिच्यापुढे बापाचा लाचार चेहरा ऊभा राहतो.तिच्यापुढे आजही हा बेगडा समाज ऊभा राहतो.ज्या समाजाने जातीच्या मुसक्या आवळुन त्या बापाला लंगडं केलं असतं.ती जेव्हा सासरी जाते.तेव्हा तिला विश्वकोटीचा त्रास असुनही ती बापाला सांगत नाही.तर निमुटपणे सगळं सहन करते.हा तिच्या मनाचा मोठेपणा असतो.

      मित्रांनो,स्री लाचार झाली म्हणुन काय झाले.तिला लाचार बनवलं कोणी....तुम्ही आम्हीच ना.तिलाही शिकु द्या.समान अधिकार द्या.हवं तर तिला स्वावलंबी बनवा.तिलाही तुमच्या बरोबरीने ऊभे राहु द्या.ती तुमचा आधारस्तंभ आहे हे लक्षात ठेवा.ती व्रत करते तुमच्या साठीच मला चांगला पती मिळावा म्हणुन पतिने केलेले हरितालिका व्रत.अन् जेव्हा तुमच्यासारखा बेवडा,जुवारी नवरा तिला त्या व्रतःनंतर लाभला तर तिनं कोणाला दोष द्यायचा.स्वतःच्या कर्माला की या हरितालिका व्रतःला......ह्या हरितालिका व्रतःच्या निमित्यानं सर्व पुरुषजातीनं निर्धार करायला हवा की ज्या स्रीनं आपल्याला मिळविण्यासाठी हरितालिका व्रत केलं.त्या पत्नी म्हणुन लाभलेल्या स्रिचा मी कधीच अपमान करणार नाही.हवं तर तिचा पदोपदी सम्मानच करीन.त्याशिवाय तिच्या हरितालिका व्रतःला महत्व प्राप्त होणार नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०(संस्कार)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या