🍀 रानभाजी - पेव 🍀
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 20/9/2026
पेव ही आल्याच्या कुटुंबातील वनस्पती आहे. आल्या सारखे याचे कंद जमिनीत पसरतात. त्यातुन फ़ुटणारी झुडूपं आजुबाजूची जमिन व्यापून टाकल्याने इतर वनस्पतीना त्याठिकाणी वाढायला वाव मिळत नाही, त्यामुळे 'पेवचं बेट' दिसायला लागतात. दरवर्षी जुलै महिन्यात जमिनीत असलेल्या कंदा मधून पेव उगवतं. सप्टेंबर मध्ये त्याला फुलं येतात आणि नोव्हेंबर मध्ये हे झाड सुकून जाते. जेमतेम ४ ते ५ महिन्याचं आयुष्य असलेलं हे झुडूप आहे. पेवची रोपे कोवळी असताना त्याची भजी व भाजी करतात. २ ते ३ मीटर उंच वाढणारी ही वनस्पती दाट सावलीत वाढते. पानं १५ ते ३० सेंमी लांब असतात. दाट झाडीखाली वाढणार्या या झुडूपाच्या पानांना झाडीतून झिरपणारा सूर्यप्रकाशाचा कवडसा पकडता यावा याकरीता पेवच्या पानांची रचना मुख्य दांड्याभोवती सर्पीलाकार गोल जिन्या सारखी असते. याच्या एका पानाची सावली दुसर्या पानावर पडत नाही. पेवच्या बेटाकडे लक्ष वेधले जाते ते त्याच्या नरसाळ्या सारख्या दिसणार्या पांढर्या फुलांमुळे. या फुलांच्या खालच्या बाजूस किरमिजी लाल रंगाची रुपांतरीत पाने दिसतात. पूर्ण फुललेलं फुलाचं तोंड खालच्या बाजूला झुकलेलं असतं. फुल पांढर्या रंगाचे असून आतल्या बाजूस मध्यभागी पिवळा रंग असतो. पेवच्या कंदांचा उपयोग ताप, दमा, खोकला आणि जंत यावरील औषधात होतो.
*संदर्भ : डोंगर भाऊ*
*पाककृती : पानांची भजी*
# साहित्य- पेवची कोवळी पाने, बेसन १ वाटी, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, १ चमचा लाल तिखट, थोडे धना जिरा पावडर (नसली तरी चालते), गरजे नुसार मीठ, तळण्यासाठी तेल.
# कृती- वरील तेल व पाने सोडून सगळे साहित्य एकत्र करावे व थोडे थोडे पाणी टाकून इडलीच्या पिठाप्रमाणे पीठ भिजवावे. त्यात धुतलेली पाने बुडवून घ्यावीत. बुडवलेली पाने गरम तेलात सोडावीत. पाने खालून थोडी शिजली वाटली म्हणजे रंग बदलला कि झाऱ्याने पलटावीत. आता बुडबुडे कमी झाले, पाने आत जाऊ लागली कि भजी काढावी. तयार आहे पेवची भजी.
संदर्भ : मायबोली
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण *━═━═━═━═━═━═━═━═━═━═*
'

0 टिप्पण्या