‼️  आयर्विन पुलाची कहाणी  ‼️

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 16/9/2026 :

सांगलीच्या पटवर्धन राजांनी ठरवलं, कृष्णेच्या महापुराला तोंड देईल असा महाप्रचंड पूल उभारायचा. आज महापुराने अख्ख्या सांगली कोल्हापूर जिल्ह्यांना झपाटलंय. कित्येक वर्षात कित्येक पिढ्यांमध्ये बघितलेल्या मध्ये हा सर्वात मोठा पूर आहे. गेला आठवडाभर लोक पूर कधी ओसरणार याकडे डोळे लावून आहेत. या भागात पूर किती वाढलाय हे कळण्याचे एकच माप आहे, आयर्विन पूल. 

हा आहे सांगली गावचा नव्वद वर्षापूर्वीचा पूल. या पूलावर पाणी किती चढलय याचं माप दिलं आहे. पण फक्त इथलीच नाही तर कोल्हापूरवाली माणस सुद्धा आयर्विन पुलावर पाणी किती चढलय हे विचारतात आणि त्यावरून महापुराचा अंदाज लावतात. हा पूल बनला या मागे सुद्धा एक महापूर आहे.

गोष्ट आहे १९१४ सालची. तेव्हा अख्ख्या भारतावर इंग्रजांच राज्य होतं. सांगली संस्थानात चिंतामणराव पटवर्धन (दुसरे) गादीवर होते. त्यावर्षी कृष्णेला महापूर आला. तसंही दरवर्षी पावसाळ्यात सांगलीहून नदी पार करून जाणे अशक्य असायचं. कृष्णेचा पूर ही तेव्हाही डोकेदुखीच होतीच. पण यावेळचा पूर हा न भुतोनभविष्यती असा होता. गावाचा संपूर्ण संपर्क तुटला. अनेक घरे पाण्याखाली गेली. कोणतीही मदत पोहचणे अशक्य होतं.

सांगली गावाला पाण्याने वेढल होतं. राजाने ठरवलं यावर कायमचा तोडगा काढायचा. कोणत्याही महापुराला तोंड देईल असा पूल उभारायचा. त्यांनी आपल्या दरबारातल्या इंग्रज अधिकाऱ्याशी चर्चा केली आणि सांगलीच्या स्टेट असेंब्लीत एका पुलाचा प्रस्ताव मांडण्यात आला. राजाच्या मनात महाप्रचंड पूल बांधायचं होतं. त्यासाठी खर्च देखील मोठा होता. पण हा प्रस्ताव पास व्हायला अनेक वर्षे गेली.

प्रस्ताव मंजूर होऊन निधी उभा राहून काम सुरु व्हायला १९२७ साल उजाडले. खर्च साधारणपणे ६ लाख ५० हजार रुपये इतका अंदाजित होता. बांधकामाचे कंत्राट पुण्यातील रानडे अँड सन्स या कंपनीकडे दिले गेले. सांगली संस्थानचे चीफ इंजिनियर श्री. भावे हे या बांधकामाचे प्रमुख होते. प्रमुख सल्लागार म्हणून तत्कालीन मुंबई इलाख्याचे निवृत्त झालेले चीफ इंजिनियर श्री. व्ही.एन. वर्तक यांना नेमण्यात आले.

पायाखुदाई चिंतामणराव पटवर्धन यांच्या हस्ते १७ फेब्रुवारी १९२७ रोजी करण्यात आली, व १६ एप्रिलला चिंतामणराव आणि राणीसाहेब यांच्या हस्ते बांधकामाचा पहिला दगड ठेवण्यात आला. पुढे २ वर्षे ९ महिन्यात हा भव्य आणि सुंदर पूल बांधून तयार करण्यात आला.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण *═━═━═━═━═━═━═━═━═━═━═*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या