🍀 रानभाजी - चिंचेचा पाला  🍀

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 06/9/2026 :

चिंचेच्या पानात कफ-वात कमी करण्याचे, पचन सुधारण्याचे आणि जळजळ घटवण्याचे गुणधर्म असतात. ही पाने व्हिटॅमिन-सी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, विविध संसर्गांपासून दूर ठेवण्यास, तसेच सांधेदुखीत वेदना कमी करण्यास मदत करतात. चिंचेची पाने अपचन, अ‍ॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करतात. या पानात दाहक विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे सांधेदुखी आणि शरीराची जळजळ कमी होते. चिंचेच्या पानांचा चहा किंवा काढा घेतल्याने वजन आटोक्यात ठेवण्यास आणि रक्तातील साखर नियंत्रणास मदत होते. या पानांची पेस्ट किंवा रस लावल्यास जखम लवकर भरून येण्यास मदत होते.

*याचे कसे सेवन करावे?* : चिंचेची पाने स्वच्छ धुवून पाण्यात उकळून त्याचा चहा बनवून घेऊ शकता. काही भागांत चिंचेची पाने डाळ, आमटी किंवा रसम मध्ये आंबटपणा आणि चव वाढवण्यासाठी वापरली जातात. याच्या कोवळ्या पानांची चटणी, भाजी सुद्धा छान लागते. कोणत्याही भाजीला आंबटपणा आणण्यासाठी त्यात चिंचेची पाने घालू शकता.

*चिंचेच्या पानांची भाजी* : ही एक पारंपरिक, आंबटसर आणि चवदार गावरान भाजी आहे. कोवळी चिंचेची पाने आरोग्यासाठी चांगली असतात.

*साहित्य*- कोवळी चिंचेची पाने, बारीक चिरलेला कांदा, लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या किंवा तिखट, जिरे, मोहरी, हळद, हिंग, तेल, मीठ.

*कृती*- चिंचेची कोवळी पाने स्वच्छ धुऊन घ्या. कढईत तेल गरम करा.त्यात जिरे, मोहरी, हिंग, ठेचलेला लसूण घाला. कांदा, हिरवी मिरची घालून परतून घ्या. धुवून घेतलेली पाने टाका. चवीनुसार मीठ आणि थोडे पाणी घालून भाजी शिजवून घ्या. गरमागरम भाकरी किंवा चपाती सोबत खावीत.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

संदर्भ : इंटरनेट

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या