फसव्या कॉल्सना आळा घालण्यासाठी TRAIचा मोठा निर्णय; आता ‘१६०१’ नंबरवरून येणार कॉल

 


फसव्या कॉल्सना आळा घालण्यासाठी TRAIचा मोठा निर्णय; आता ‘१६०१’ नंबरवरून येणार कॉल 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 11/8/2026 :

अनोळखी नंबरवरून येणारे कॉल्स आणि डिजिटल फसवणुकीपासून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. १० ऑगस्ट २०२६ रोजी ट्रायने एका नवीन प्रणालीची सुरुवात केली आहे. या नवीन सुविधेमुळे ग्राहकांसाठी खरा कॉल आणि बोगस कॉल यांमधील फरक ओळखणे अत्यंत सोपे होणार आहे.

दररोज अनेकांना अनोळखी मोबाईल नंबरवरून विविध प्रकारचे कॉल येतात. गॅस, वीज, कुरिअर किंवा इतर सेवा कंपन्यांच्या नावाने केले जाणारे काही कॉल फसवणुकीचे माध्यम ठरतात. याल आळा घालण्यासाठी TRAI ने नवीन व्यवस्था आणली आहे. या व्यवस्थेअंतर्गत १६०१ पासून सुरू होणारी विशेष नंबर सिरीज सेवा आणि व्यवहाराशी संबंधित व्हॉइस कॉल्ससाठी वापरली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना एखादा कॉल अधिकृत संस्थेकडून आला आहे की फसवणूक करणाऱ्याकडून, हे ओळखणे तुलनेने सोपे होण्याची अपेक्षा आहे.

फसव्या कॉल्सवर नियंत्रणासाठी ‘१६०१’ नंबर सिरीज

सध्या अनेक फसवणूक करणारे सामान्य १० अंकी नंबरचा वापर करून मोठ्या कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे भासवतात आणि ग्राहकांना जाळ्यात ओढतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी १६०१ नंबर सिरीजचा पहिला टप्पा लागू करण्यात आला आहे. या सिरीजमधील नंबर केवळ पात्र संस्थांना पडताळणीनंतर देण्यात येणार आहेत. दूरसंचार सेवा पुरवठादारांना प्रत्येक संस्थेची योग्य पडताळणी करणे बंधनकारक आहे. तसेच १६०१ सिरीजमधून मिळालेला नंबर केवळ सेवा आणि व्यवहाराशी संबंधित व्हॉइस कॉल्ससाठीच वापरण्याचे संस्थेकडून हमीपत्र घेतले जाणार आहे.

कोणत्या सेवांसाठी वापरला जाणार १६०१ नंबर?

या नवीन व्यवस्थेच्या पहिल्या टप्प्यात BFSI आणि सरकारी क्षेत्र वगळता इतर क्षेत्रांतील पात्र संस्थांचा समावेश करण्यात आला आहे. विशेषतः युटिलिटी आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील कंपन्यांसाठी याचा वापर महत्त्वाचा ठरणार आहे. यामध्ये प्रामुख्याने..

वीज वितरण कंपन्या

पाणीपुरवठा आणि जलसेवा संस्था

शहर गॅस वितरण कंपन्या

LPG वितरण संस्था

कुरिअर कंपन्या

एक्सप्रेस लॉजिस्टिक्स कंपन्या

पार्सल डिलिव्हरी सेवा पुरवठादार

यांचा समावेश होतो.

दरम्यान, बँकिंग, वित्तीय सेवा, विमा आणि संबंधित नियामकांच्या अखत्यारितील वित्तीय संस्थांसाठी १६०० नंबर सिरीजची व्यवस्था कायम आहे. ही सिरीज सेवा आणि व्यवहाराशी संबंधित कॉल्स ओळखण्यासाठी यापूर्वीच लागू करण्यात आली आहे.

कंपन्यांना ९० दिवसांची मुदत

नवीन व्यवस्था लागू करण्यासाठी दूरसंचार सेवा पुरवठादारांना पात्र संस्थांचे मायग्रेशन आणि ऑनबोर्डिंग ९० दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, १६०१ सिरीजमधील नंबर योग्य पडताळणीनंतर थेट पात्र संस्थांनाच दिले जाणार आहेत. नंबरचे वाटप करताना मध्यस्थ किंवा एग्रीगेटरचा सहभाग टाळण्याची तरतूद करण्यात आली आहे.

१६०१ नंबरवरून प्रचारात्मक कॉल करता येणार नाही

१६०१ नंबर सिरीजचा उद्देश ग्राहकांना महत्त्वाचे सेवा आणि व्यवहाराशी संबंधित कॉल ओळखणे हा आहे. त्यामुळे या नंबरचा वापर प्रचारात्मक किंवा मार्केटिंग कॉलसाठी करता येणार नाही. दूरसंचार कंपन्यांना नंबर देण्यापूर्वी संबंधित संस्थेकडून याबाबत हमीपत्र घेणे आवश्यक आहे. १६०१ सिरीजचा वापर केवळ TCCCPR, २०१८ अंतर्गत परवानगी असलेल्या सेवा आणि व्यवहाराशी संबंधित व्हॉइस कॉल्ससाठीच करता येईल.

ग्राहकांना काय फायदा होणार?

या व्यवस्थेमुळे ग्राहकांना अधिकृत सेवा कंपन्यांचे कॉल आणि सामान्य अनोळखी नंबरवरून येणारे कॉल यामध्ये फरक करण्यास मदत होऊ शकते. विशेषतः वीज बिल, गॅस सेवा, कुरिअर किंवा पार्सल डिलिव्हरीसारख्या सेवांशी संबंधित कॉलमध्ये फसवणूक करणाऱ्यांकडून कंपनीचे नाव वापरण्याचे प्रकार कमी करण्याचा प्रयत्न यामागे आहे. मात्र, १६०१ नंबर दिसला म्हणजे प्रत्येक कॉल १०० टक्के सुरक्षित आहे असे गृहीत धरू नये. TRAIच्या नियमांनुसार नंबर देण्यापूर्वी पडताळणी केली जाणार असली, तरी ग्राहकांनी OTP, PIN, पासवर्ड किंवा बँकिंगची संवेदनशील माहिती फोनवर शेअर न करण्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या