🇺🇳 राजकीय सेक्स-स्कँडल अर्थात How a सेक्स scandal dashed Jagjivan Ram's PM hopes.

 🇺🇳 राजकीय सेक्स-स्कँडल अर्थात How a सेक्स scandal dashed Jagjivan Ram's PM hopes. 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 22/8/2026 :

१९७७ मध्ये भारताच्या राजकारणात एक विलक्षण बदल घडला. आणीबाणी संपली, काँग्रेस सत्तेतून बाहेर फेकली गेली आणि मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले. देशाला या सरकारकडून वेगळ्या राजकीय संस्कृतीची अपेक्षा होती.

 आणीबाणीतील सत्तेच्या केंद्रीकरणानंतर पारदर्शकता, साधेपणा आणि नैतिकता यांचे नवे पर्व सुरू होईल, अशी आशा होती. पण या नव्या सरकारच्या सुरुवातीच्या काळातच एक नाव दिल्लीच्या राजकीय वर्तुळात वारंवार ऐकू येऊ लागले—कांती देसाई.

ते पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे पुत्र होते. स्वतः कोणतेही घटनात्मक किंवा सरकारी पद त्यांच्याकडे नव्हते. तरीही पंतप्रधानांच्या जवळच्या वर्तुळात त्यांचा प्रभाव असल्याची चर्चा सुरू झाली. हाच पुढे जनता सरकारसाठी मोठा राजकीय डोकेदुखीचा विषय बनला.

       कांती देसाई प्रकरणाला सर्वाधिक राजकीय धार मिळाली ती समाजवादी नेते मधु लिमये यांच्या भूमिकेमुळे.

लिमये यांनी मोरारजी देसाईंना पत्र लिहून कांती देसाईंना पंतप्रधानांच्या निवासस्थानातून दूर करण्याची मागणी केली. कांती देसाई यांनी जनता पक्षासाठी मोठ्या प्रमाणावर निधी गोळा केला असल्याचा आरोप त्या वादाच्या केंद्रस्थानी होता. वृत्तांतांमध्ये ही रक्कम ₹८० लाख असल्याचे नमूद झाले. त्याचबरोबर पंतप्रधानांचा मुलगा या नात्याने मिळणाऱ्या प्रभावाचा गैरवापर झाल्याचा आरोपही करण्यात आला. हे पत्र प्रसारमाध्यमांत लीक झाले आणि त्यानंतर प्रकरण सार्वजनिक झाले. या आरोपाची एक गंमत म्हणजे रकमेबाबतच पुढे वेगवेगळे आकडे समोर आले. ऑगस्ट १९७८ मधील संसदीय चर्चेत ₹८० लाख, ₹९० लाख आणि त्याहूनही मोठ्या रकमेचे उल्लेख झाले. 

         कांती देसाई प्रकरण इतके गंभीर झाले की ते संसदेत पोहोचले. राज्यसभेतील चर्चांमध्ये मोरारजी देसाई आणि तत्कालीन गृहमंत्री चरणसिंह यांच्या कुटुंबीयांवर करण्यात आलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याचा प्रश्न उपस्थित झाला. कांती देसाईंचे नाव या संपूर्ण संघर्षाच्या केंद्रस्थानी होते.

         काही सदस्यांनी कांती देसाई यांच्याशी संबंधित व्यवहारांना थेट shady deals आणि आर्थिक गैरव्यवहारांशी जोडले. ही केवळ विरोधकांची बाहेरची टीका नव्हती. जनता पक्षाच्या अंतर्गत संघर्षातही कांती देसाई हे एक संवेदनशील आणि स्फोटक नाव बनले होते.

            कांती देसाई यांच्याभोवतीच्या आरोपांचा आवाका केवळ पक्षनिधीपुरता मर्यादित नव्हता. एअर इंडियाच्या मंडळावरील नेमणुका, बोइंगशी संबंधित कथित आर्थिक व्यवहार, अहमदाबादमधील मालमत्ता, परदेश दौरे आणि काही व्यावसायिक व्यवहार यांचा उल्लेख संसदीय चर्चेत झाला.

        कांती देसाईंच्या वादग्रस्त प्रतिमेला पुढच्या काळात आणखी एक महत्त्वाचा संदर्भ मिळाला—जॅक्वार लढाऊ विमानांचा करार. भारताने ब्रिटनकडून जॅक्वार लढाऊ विमाने घेण्याचा निर्णय घेतला त्या काळात कांती देसाईंच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित झाले. विशेषतः ब्रिटनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जुलै १९७८ मध्ये लंडन भेटीदरम्यान त्यांना दिलेले कथित महत्त्व नंतर चर्चेत आले.

           कांती देसाई प्रकरणात सर्वात महत्त्वाचा राजकीय पैलू म्हणजे त्यांच्या वडिलांची भूमिका. मोरारजी देसाई हे वैयक्तिक प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध असलेले नेते होते. त्यामुळे त्यांच्या मुलावर होणारे आरोप त्यांच्या स्वतःच्या नैतिक प्रतिमेलाही धक्का देत होते. १९७८ मध्ये मोरारजी देसाई आणि चरणसिंह यांच्यातील संघर्ष वाढताना कांती देसाईंचा मुद्दा अधिकच तीव्र झाला. त्या काळातील राजकीय चर्चेत मोरारजी देसाईंनी आपल्या मुलावरील आरोप मागे घेण्याची मागणी केल्याचा उल्लेखही आढळतो. परिणाम काहीही असो, या प्रकरणात मोरारजींची प्रतिमा डागाळली हे खरे.

                       *****

            याच काळात दुसऱ्या एका प्रभावशाली नेत्याच्या मुलाचे नाव पूर्णपणे वेगळ्या कारणाने देशाच्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले. ते नाव होते—सुरेश कुमार राम.

ते बाबू जगजीवन राम यांचे पुत्र होते. जगजीवन राम हे त्या वेळी मोरारजी देसाई सरकारमधील संरक्षणमंत्री आणि उपपंतप्रधान होते. १९७७ मध्ये पंतप्रधानपदासाठी त्यांचे नाव अत्यंत गांभीर्याने चर्चेत होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाशी संबंधित कोणतीही घटना केवळ कौटुंबिक बाब राहण्याची शक्यता कमीच होती. आणि ऑगस्ट १९७८ मध्ये जे घडले, त्याने भारतीय राजकारणाला हादरवून सोडले.

            १९७८ मध्ये 'सूर्या' या मासिकाने सुरेश राम आणि सुषमा चौधरी या 21 वर्षीय तरुणी यांची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रकाशित केली. 'सूर्या'च्या संपादिका त्या वेळी मेनका गांधी होत्या. छायाचित्रांचे प्रकाशन झाल्यानंतर प्रकरण देशभर गाजले. ही छायाचित्रे चरणसिंहांच्या निकटवर्तीयांकडून मासिकापर्यंत पोहोचल्याचा दावा केला गेला. त्या काळात आलेल्या वृत्तपत्रीय बातम्यांनुसार, राम एका तरुण महिलेसोबत कारमध्ये होते. दिल्लीजवळील मोहन नगर परिसरात कारचा अपघात झाला व हीच घटना पुढे भारतीय राजकारणातील सर्वात गाजलेल्या सेक्स-स्कँडलपैकी एका प्रकरणात बदलली. काही वृत्तांनुसार, जनता पक्षाशी संबंधित काही कार्यकर्ते सुरेश राम यांच्यावर आधीपासून लक्ष ठेवून होते. के. सी. त्यागी आणि ओमपाल सिंह यांची नावे या कथनात येतात. असे म्हणतात की, जगजीवन राम यांची पंतप्रधानपदाची शक्यता रोखण्यासाठी त्यांच्या मुलाच्या वैयक्तिक आयुष्याचा वापर राजकीय अस्त्र म्हणून करण्यात आला. India Todayने राज नारायण यांच्यासह चरणसिंह यांच्याशी संबंधित राजकीय कार्यकर्त्यांच्या भूमिकेचा उल्लेख केला आहे.

           जनता पक्षाने आणीबाणीविरुद्ध लढताना राजकीय नैतिकतेचा मोठा दावा केला होता.पण सत्तेवर आल्यानंतर त्याच सरकारमध्ये पंतप्रधानांच्या मुलावरील आर्थिक आरोप संसदेत चर्चिले जात होते आणि उपपंतप्रधानांच्या मुलाचे खासगी आयुष्य राजकीय संघर्षाचे अस्त्र बनत होते.

यामुळे जनता पक्षाच्या नैतिक दाव्यावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले. १९७७ मध्ये मोरारजी देसाई पंतप्रधान झाले असले तरी जनता पक्षात एकापेक्षा अधिक मोठे नेते पंतप्रधानपदाचे नैसर्गिक दावेदार होते. चरणसिंह एक मोठी शक्ती होते. जगजीवन राम यांचे राष्ट्रीय वजन प्रचंड होते. अशा परिस्थितीत प्रत्येक नेत्याच्या प्रतिमेला धक्का देणारी घटना ही केवळ वैयक्तिक घटना राहत नव्हती. सत्तेच्या सर्वोच्च पायरीवर पोहोचलेल्या नेत्याचे कुटुंब हे कधी कधी त्याचे सर्वात मोठे बळ असते; पण राजकीय युद्ध पेटले की तेच कुटुंब त्याची सर्वात मोठी कमजोरीही बनू शकते. जनता पक्षाचा प्रयोग शेवटी सत्तासंघर्षात अडकला. मोरारजी देसाई गेले, जनता पक्ष फुटला आणि १९८० मध्ये इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्या. जनता पक्षाचे सरकार कसे कोसळले, हा वेगळ्या लेखाचा विषय. 

                        *****

संदर्भ:1) A ringside seat to history by Pascal Alan Nazareth

        2) How Prime Minister's decide by Neeraja Chaudhary

==================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या