🟣 कर्जमाफीसाठी माळशिरस तालुक्यातील २,३४८ शेतकरी पात्र; आधार प्रमाणीकरण वेग वाढविण्याचे आवाहन
🟢 १०६ गावांतील लाभार्थी यादी प्रसिद्ध; 'आपले सरकार' सेवा केंद्रांवर e-KYC सुरू
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 6/8/2026 :
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६' अंतर्गत माळशिरस तालुक्यातील कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, पात्र शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाला वेग आला आहे. सद्यस्थितीत प्रसिद्ध दुसऱ्या यादीअखेर तालुक्यातील १०६ गावांतील २,३४८ शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत,अशी माहिती सहायक निबंधक श्री पुष्पक सारडा यांनी दिली.
त्यामध्ये सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संलग्न ८३ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांतील ७२६ सभासद शेतकऱ्यांचा, तसेच राष्ट्रीयकृत बँकांच्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांचाही समावेश आहे.
लाभार्थी यादीत प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या नावासमोर विशिष्ट क्रमांक आणि थकीत कर्जाची रक्कम नमूद करण्यात आली आहे. कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण बंधनकारक असून, त्यासाठी माळशिरस तालुक्यातील 'आपले सरकार' सेवा केंद्रांवर पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी आधार कार्ड, कर्ज खाते व बचत खात्याचे पासबुक, लाभार्थी यादीतील नावासमोरील विशिष्ट क्रमांक तसेच अँग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करून आधार प्रमाणीकरण करून घेणे गरजेचे आहे.
सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाच्या माहितीनुसार, कर्जमाफीची पात्र लाभार्थी यादी संबंधित ग्रामपंचायती, बँक शाखा, गटसचिव तसेच सहाय्यक निबंधक कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तसेच सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करूनही माळशिरस तालुक्यातील शेतकरी आपल्या नावाची खात्री लाभार्थी यादीत करू शकतात,असे श्री. सारडा यांनी सांगितले तसेच पात्र शेतकऱ्यांनी तात्काळ आधार प्रमाणिकरण करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
0 टिप्पण्या