वैष्णवी कदम यांची कर सहाय्यकपदी निवड; बिजवडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार


वैष्णवी कदम यांची कर सहाय्यकपदी निवड; बिजवडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 23/8/2026 :

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) गट-क सेवा परीक्षा २०२४ अंतर्गत जाहिरात क्र. ११८/२०२५ नुसार कु. वैष्णवी दादासाहेब कदम  यांची कर सहाय्यक (Tax Assistant) पदावर निवड झाल्याबद्दल पवार वस्ती, बिजवडी  येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार व महिला भगिनींनी वैष्णवी कदम यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

वैष्णवी कदम यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासात सातत्याने मेहनत घेत हे यश संपादन केले. त्यांचे प्राथमिक शिक्षण सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज येथे सन २००६ ते २०१२ या कालावधीत झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण जिजामाता विद्यालय, सराटी येथे २०१३ ते २०१८ या कालावधीत पूर्ण केले. उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज येथून विज्ञान शाखेत २०१९-२० मध्ये पूर्ण केले.

त्यानंतर त्यांनी पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन राज्यशास्त्र विषयातून बी.ए. पदवी  २०२१ ते २०२३ या कालावधीत पूर्ण केली. शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करत त्यांनी कठोर परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली.

आपल्या यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना वैष्णवी कदम यांनी, माझ्या यशाच्या प्रवासात सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा, आशीर्वाद, विश्वास, सहकार्य आणि प्रोत्साहन हेच माझे खरे बळ ठरले. प्रत्येकाच्या शब्दांनी मला आणखी मेहनत करण्याची प्रेरणा मिळाली,” असे सांगितले.

या सत्कार समारंभास अण्णासाहेब शिंदे, युवक प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना , तसेच दादासाहेब कदम, नागनाथ कदम, भीमराव यादव, आर्यन शिंदे यांच्यासह महिला भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वैष्णवी कदम यांच्या या यशाबद्दल परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या यशाने अकलूज परिसरातील विद्यार्थ्यांना व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवक-युवतींना निश्चितच प्रेरणा मिळाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या