क्रांतीचे धगधगते यज्ञकुंड – क्रांतिसिंह नाना पाटील
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन :आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 3/8/2026
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात ज्या मोजक्या क्रांतिकारकांनी आपल्या ज्वलंत विचारांनी आणि अदम्य धैर्याने जनतेच्या मनात स्वातंत्र्याची मशाल पेटवली, त्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांच्या जयंतीनिमित्त या महान क्रांतीवीराला मानाचा मुजरा!
नाना पाटील यांची सभा म्हणजे जनतेच्या मनातील गुलामगिरीची राख उधळून स्वातंत्र्याची ज्वाला चेतवणारा जाज्वल्य सोहळाच असे. त्यांच्या ओजस्वी भाषणांनी महाराष्ट्र अक्षरशः पेटून उठत असे. इंग्रजांच्या हाती कधीही सापडायचे नाही, असा निर्धार करून ते भूमिगत झाले. काही निवडक सहकाऱ्यांसह ते गावोगावी अचानक सभा घेत असत. कोणतीही जाहिरात नसे, तरी त्यांच्या आगमनाची चाहूल लागताच हजारो स्त्री-पुरुष, तरुण आणि शेतकरी क्षणात सभास्थळी जमायचे.
इंग्रज पोलीस त्यांना पकडण्यासाठी सतत टपून बसलेले असत. भाषण सुरू असताना जनतेच्या रोषामुळे त्यांना हात घालण्याची हिंमत पोलिसांना होत नसे. म्हणून सभा संपल्यानंतर त्यांना पकडण्याचे डाव आखले जात.
असाच एक प्रसंग देवराष्ट्र येथील श्रावण सोमवारच्या कुस्ती मैदानावर घडला. हजारो लोक कुस्ती पाहण्यासाठी जमले होते. धनगर समाजाचे गजा नृत्य सुरू असतानाच सागरेश्वरच्या खिंडीतून शंभर–दीडशे सहकाऱ्यांसह नाना पाटील मैदानात दाखल झाले. कोणीतरी जोरात घोषणा दिली – "अरे, नाना पाटील आले!"
क्षणात संपूर्ण मैदान घोषणांनी दणाणून गेले. नानांनी छाती ठोकून गर्जना केली –
"छत्रपती शिवाजी महाराज की जय!"
"महात्मा गांधी की जय!"
"भारत माता की जय!"
त्यानंतर तब्बल दोन तास त्यांनी आपल्या रांगड्या, जाज्वल्य भाषेत स्वातंत्र्याची मशाल चेतवणारे भाषण केले.
भाषण संपताच फौजदार सावंत यांनी त्यांना अटक करण्याचा डाव आखला होता. परंतु हजारो लोकांच्या प्रचंड गर्दीत नानांचे शंभर–दीडशे सहकारी एकदम पुढे सरसावले. घोषणांचा प्रचंड गजर झाला आणि त्या गर्दीतून नाना क्षणात अदृश्य झाले. मैदानाबाहेर तयार ठेवलेल्या घोड्यावर ते स्वार झाले आणि वाऱ्याच्या वेगाने सागरेश्वरच्या खिंडीत नाहीसे झाले. इंग्रज पोलीस फक्त पाहतच राहिले.
गावोगावी तिरंगा फडकावण्याचे अभियानही त्यांनी सुरू केले होते. पुनदी गावाजवळ झेंडा फडकवल्याची माहिती इंग्रजांना मिळताच पोलिसांनी पाठलाग सुरू केला. समोर दुथडी भरून वाहणारी कृष्णा नदी होती. मागे शस्त्रसज्ज पोलीस! थांबणे म्हणजे मृत्यू निश्चित. क्षणाचाही विलंब न करता नाना आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतःला कृष्णामाईच्या प्रवाहात झोकून दिले. प्रचंड प्रवाहाशी झुंज देत त्यांनी नदीचा पैलतीर गाठला आणि इंग्रजांच्या विळख्यातून पुन्हा एकदा सुटका करून घेतली.
क्रांतिसिंहांना सुरक्षित ठेवण्यासाठी सामान्य जनताही स्वतःचा जीव धोक्यात घालत होती. जाती-पातीच्या सर्व भिंती त्यांच्या देशभक्तीपुढे कोसळल्या होत्या. पोलीस येत असल्याची खबर देण्यापासून ते सुरक्षित आश्रय देण्यापर्यंत हजारो सामान्य माणसे त्यांच्या पाठीशी उभी होती.
कुंडल गावातील प्रसंग तर त्यांच्या लोकाधाराचे जिवंत उदाहरण आहे. गिल्बर्ट नावाचा इंग्रज अधिकारी तब्बल दोन हजार पोलिसांसह पहाटे गावात घुसला. प्रत्येक घराची झडती घेण्यात आली. पुरुषांना चावडीवर उभे केले गेले. मारहाण झाली. परंतु त्याच वेळी एका धनगर बांधवाने नाना पाटील यांना आपल्या पडक्या घराच्या माळ्यावर लपवून बाहेरून कुलूप लावले.
दुपारचे कडक ऊन पडले. पत्र्याचे छप्पर तापून निघाले. उकाडा असह्य झाला. तेवढ्यात जवळच्या बिळातून एक भला मोठा नाग बाहेर आला. त्याने फणा काढला. मृत्यू समोर उभा होता. पण नाना डगमगले नाहीत. काही क्षण दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले. जणू त्या नागालाही जाणवले असेल—हा साधा माणूस नाही; भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची बाजी लावणारा धगधगता अंगार आहे. नाग शांतपणे निघून गेला आणि क्रांतीचा तो दीप पुन्हा प्रज्वलित राहिला.
क्रांतिसिंह नाना पाटील हे केवळ स्वातंत्र्यसैनिक नव्हते; ते जनतेच्या मनातील स्वाभिमान, धैर्य आणि बंडखोरीचे प्रतीक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली उभा राहिलेला प्रतिसरकार हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अभिमानास्पद अध्याय आहे. त्यांच्या त्यागामुळे आणि संघर्षामुळेच स्वातंत्र्याची पहाट उजाडली.
"नाही मरणाची आम्हा भीती रे,
भरली अंगात स्वराज्य स्फूर्ती रे!"
अशा या अद्वितीय क्रांतीसूर्याला, स्वातंत्र्याच्या धगधगत्या यज्ञकुंडाला, कोटी कोटी प्रणाम!
क्रांतिसिंह नाना पाटील यांना मानाचा मुजरा!
अतुल पाटील, अंकलखोप
0 टिप्पण्या