चांदीच्या वस्तु गुलाबी कागदात का गुंडाळून देतात?
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन :आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 4/8/2026
आपण जेव्हा कधी सोनाराच्या दुकानातून चांदीची नवीन भांडी, पैंजण, नाणी किंवा मूर्ती खरेदी करतो, तेव्हा सोनार ती वस्तू गुलाबी रंगाच्या कागदात गुंडाळून बॉक्स मध्ये ठेवतात. सोनार यासाठी लाल, पिवळ्या, पांढऱ्या किंवा काळ्या रंगाचा कागद वापरत नाहीत. यामागे वैज्ञानिक कारण आणि व्यावसायिक गुपित दडले आहे.
चांदी हा असा धातू आहे जो दिसायला अत्यंत सुंदर आणि चमकदार असतो. पण, चांदीची एक समस्या म्हणजे ती हवेच्या संपर्कात आल्यावर खूप लवकर काळी पडू लागते. सोनार आपल्या चांदीच्या वस्तूंचा हाच चमकदारपणा टिकवून ठेवण्यासाठी या गुलाबी कागदाचा वापर करतात. चांदी हवेत असलेल्या हायड्रोजन सल्फाईड आणि आर्द्रतेशी खूप वेगाने रासायनिक प्रक्रिया करते. या प्रक्रियेला 'सिल्व्हर टार्निशिंग' म्हणतात. यामुळे चांदीच्या वरच्या थरावर सिल्व्हर सल्फाईड चा एक काळा थर जमा होतो आणि चांदीची चमक नाहीशी होते.
सोनार जो गुलाबी कागद वापरतात, तो कोणताही साधा कागद नसतो. त्याला 'अँटी-टार्निश पेपर' किंवा 'सिल्व्हर प्रोटेक्टिव्ह टिश्यूपर' म्हटले जाते. हा कागद हवेतील ओलावा आणि सल्फरचे घटक स्वतः मध्ये शोषून घेतो आणि त्यांना चांदीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचू देत नाही. हा कागद संपूर्णपणे आम्लमुक्त (Acid-Free) असतो. सामान्य पांढऱ्या किंवा रंगीत कागदात रासायनिक प्रक्रिया करताना अॅसिडचे प्रमाण असू शकते, जे चांदीला अधिक वेगाने काळे करू शकते.
लाल, पिवळ्या किंवा गडद रंगाच्या कागदांना रंगवण्यासाठी जास्त प्रमाणात रासायनिक रंगांचा वापर केला जातो. या रंगात सल्फर आणि इतर रसायने असतात. शुद्ध पांढरा कागद बनवण्यासाठी तो 'ब्लीच' केला जातो. ब्लीचिंग प्रक्रियेत वापरलेले क्लोरीन किंवा अॅसिड चांदीसाठी हानिकारक असते. जर चांदी या कागदांच्या संपर्कात आली, तर ती रसायने चांदीवर प्रक्रिया करून तिला काही दिवसातच काळी आणि डागाळलेली बनवतात.
चांदी सुरक्षित ठेवण्यासाठी बनवले जाणारे विशेष मऊ टिश्यूपेपर जागतिक स्तरावर गुलाबी रंगातच जास्त प्रमाणात तयार केले जातात. त्यामुळे ती सोनार व्यवसायातील एक मानक ओळख बनली आहे. सोनाराने दिलेला तो गुलाबी कागद कधीही फेकून देऊ नका. जेव्हा तुम्ही घरी चांदीचे दागिने किंवा भांडी कपाटात ठेवता, तेव्हा ती त्याच गुलाबी कागदात गुंडाळून ठेवा. यामुळे चांदी वर्षानुवर्षे अगदी नवीन सारखी चमकतील.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

0 टिप्पण्या